ठळक मुद्देपहिल्यांदा ३०००रुपये तर दोन महिन्यांनी १००रुपयेकुंभी कासारी कारखान्याचे सात लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट

कोपार्डे ,दि. ११ : कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याने सन २०१७/१८च्या हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसाला विनाकपात प्रतिटन पहिल्यांदा ३००० रुपये व दोन महिन्यानंतर १०० रुपये असे एकूण ३१०० रुपये उचल देण्याचे कारखान्याचे अध्यक्ष आ. चंद्रदिप नरके यांनी जाहीर केले.

पत्रकारांना माहिती देताना आ .चंद्रदिप नरके म्हणाले चालू गळीत हंगामात ऊस तोडणी वहातुक वजा जाता कारखान्याची निघत असलेल्या एफआरपी प्रमाणे ऊसाचा दर प्रतिटन २८८२ रुपये इतका बसत आहे. मात्र पालक मंत्री सर्व शेतकरी संघटना, व कारखान्याचे प्रतिनिधी यांच्या मध्ये झालेल्या चर्चेनुसार एफआरपी अधिक १०० रूपये देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

कुंभी कासारी कारखान्याची त्यानुसार एफआरपी २८८२ रूपये व अधिक १०० रूपये असे एकूण २९८२ रुपये द्यावे लागणार होते. मात्र संचालक मंडळाने एक मताने चालू हंगामासाठी पहिल्यांदा प्रतिटन ३००० रुपये विना कपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन महिन्यानंतर १०० रुपये असे एकूण ३१०० रुपये दर देण्यात येणार आहे.

सर्व सभासद बिगर सभासद ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण पीकवलेला ऊस कुंभी कासारी कारखान्यास पाठवून सात लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट गाठण्यास सहकार्य करावे असे आवाहन आ .नरके यांनी यावेळी केले.

या बैठकीला कारखान्याचे उपाध्यक्ष दादासो लाड ,सर्व संचालक, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, सचिव एम ए पाटील उपस्थित होते.