पेट्रोल पंपांना सोमवारपासून भेटी : अनिल गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:45 AM2018-06-20T00:45:03+5:302018-06-20T00:45:03+5:30

 Anil Gurav receives petrol pumps from Monday | पेट्रोल पंपांना सोमवारपासून भेटी : अनिल गुरव

पेट्रोल पंपांना सोमवारपासून भेटी : अनिल गुरव

Next
ठळक मुद्दे लाल बावटा पेट्रोल पंप कामगार संघटनेसोबतच्या बैठकीत आश्वासन

कोल्हापूर : पेट्रोल पंप कामगारांना किमान वेतन द्यावे, या मागणीची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील २५४ पेट्रोल पंपांना सोमवार (दि. २५) पासून भेटी देऊ, असे आश्वासन सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी दिले.

ते लाल बावटा पेट्रोल पंप कामगार संघटनेच्या (सिटू) बैठकीत मंगळवारी बोलत होते. मात्र, या बैठकीकडे इंधन कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी व पेट्रोल पंपमालकांनी पाठ फिरविली. शाहूपुरी पहिली गल्ली, व्यापार पेठ येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात दुपारी लाल बावटा पेट्रोल पंप कामगार संघटनेची किमान वेतनप्रश्नी बैठक झाली. पेट्रोल पंप कामगारांना चार हजार ते सात हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो. मात्र, किमान वेतनाची अंमलबजावणी पेट्रोल पंप मालक करीत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी यावेळी पेट्रोल पंप कामगारांनी केली.

यावर गुरव यांनी, जिल्ह्यातील २५४ पेट्रोल पंप कामगारांना सोमवार (दि. २५) पासून भेटी देऊ, यासाठी महिनाभराचा कालावधी जाईल. पेट्रोल पंपावरील हजेरी कार्डे, पगारपत्रक तसेच ग्राहकांना मूलभूत सुविधा मिळतात का?, आदी कागदपत्रांची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस इम्रान जंगले, शिवाजी मगदूम, मधुकर येवलुजे,अर्जुन भोसले, राहुल माने, राजू शेलार, आदी उपस्थित होते.

इंधन कंपन्या अधिकारी-पंपमालकांचे संगनमत
पेट्रोल पंप कामगारांना किमान वेतनानुसार १४ हजारांपासून ते २० हजारांपर्यंत वेतन मिळायला पाहिजे; पण याची अंमलबजावणी होत नाही. यापूर्वीच्या बैठकांनाही इंधन कंपन्यांचे अधिकारी अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे या कंपन्यांचे अधिकारी व पेट्रोल पंप मालक यांच्यात संगनमत आहे का? असा आरोप यावेळी पेट्रोल पंप कामगारांनी केला.
 

पेट्रोल पंप कामगारांना न्याय मिळेल, ही अपेक्षा आहे; पण न्याय न मिळाल्यास आंदोलन करू.
- चंद्रकांत यादव,
जिल्हा कार्याध्यक्ष, सिटू, कोल्हापूर.

Web Title:  Anil Gurav receives petrol pumps from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.