महापारेषणच्या २२० केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात, पहिला टप्पा ३० एप्रिलपर्यंत कार्यान्वित

By अनिकेत घमंडी | Published: April 18, 2024 06:05 PM2024-04-18T18:05:59+5:302024-04-18T18:06:51+5:30

बदलापूर, अंबरनाथ, कात्रपला मोठा दिलासा मिळण्याचा दावा

Mahapareshan's 220 KV Jambhul Ultra High Pressure Substation in final stage, first phase commissioned by April 30 | महापारेषणच्या २२० केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात, पहिला टप्पा ३० एप्रिलपर्यंत कार्यान्वित

महापारेषणच्या २२० केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात, पहिला टप्पा ३० एप्रिलपर्यंत कार्यान्वित

अनिकेत घमंडी, डोंबिवली: महापारेषणच्या २२०/२२ केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून ३० एप्रिलपर्यंत ५० एमव्हीए क्षमतेचा पहिला ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार आहे. परिणामी महापारेषणच्या १००/२२ मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन महावितरणच्या बदलापूर, अंबरनाथ, कानसाई आणि कात्रपमधील ग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यात मोलाची मदत मिळणार असल्याचा दावा महावितरणने गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.

जांभूळ उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहेत. यातील पहिला ट्रान्सफॉर्मर १९ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरहून रवाना होईल आणि ३० एप्रिलपर्यंत तो कार्यान्वित करण्यात येईल. या उपकेंद्रातून निघणाऱ्या चारपैकी दोन उच्चदाब वीजवाहिन्यांचे काम पूर्ण झाले असून या वाहिन्या त्याचवेळी कार्यान्वित करण्यात येतील. त्यामुळे मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्यात मोठी मदत मिळणार आहे. सध्या या भागाला मोरीवली १००/२२ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. वाढते तापमान आणि रात्रीच्या वेळी विजेची वाढलेली मागणी यामुळे महापारेषणकडून लोड रिलिफ मागीतला जात आहे.

जांभूळ उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित होण्यापूर्वी स्थानिक स्तरावर उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात आवश्यकतेनुसार गोवेली स्विचिंगच्या गोवेली फिडरवर मोहन सबर्बिया फिडरचा भार, १७ नंबर स्विचिंगवर कानसाई फिडरचा भार आणि आनंदनगर स्विचिंगच्या पाले फिडरवर अंबरनाथ ६ नंबर फिडरचा भार फिरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून महापारेषणकडून रिलिफ मागितल्यानंतर महावितरणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होणार नाही असेही पत्रकात म्हंटले आहे.

Web Title: Mahapareshan's 220 KV Jambhul Ultra High Pressure Substation in final stage, first phase commissioned by April 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज