ठळक मुद्देसध्या सोशल मीडियावर नो शेव्ह नोव्हेंबरचे हॅशटॅग आणि कॅप्शन व्हायरल झालेत. प्रत्येकजण त्यांच्या वाढलेल्या दाढींचे फोटो अपलोड करत हा नो शेव्ह महिना साजरा करत आहेत.नो शेव्हिंग नोव्हेबर साजरा करण्यामागे नेमका काय उद्देश आहे आणि त्याचा इतिहास तरी काय आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न. 

मुंबई : सध्या सोशल मीडियावर नो शेव्ह नोव्हेंबरचे हॅशटॅग आणि कॅप्शन व्हायरल झालेत. प्रत्येकजण त्यांच्या वाढलेल्या दाढींचे फोटो अपलोड करत हा नो शेव्ह महिना साजरा करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंडच भारतातील लोकं वापरताना दिसत आहेत. अगदी महाविद्यालयीन तरुणांपासून ते कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सगळेचजण हा महिना एखाद्या सणासारखा साजरा करतात. पण हा महिना साजरा करण्यामागे नेमका काय उद्देश आहे हेच कित्येकांना माहित नाहीए. एका सामाजिक उद्देशासाठी सुरू झालेला हा उपक्रम अनेकांनी एखादा फेस्टिव्हल म्हणून साजरा करायला सुरूवात केलीय. नो शेव्हिंग नोव्हेबर साजरा करण्यामागे नेमका काय उद्देश आहे आणि त्याचा इतिहास तरी काय आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न. 

नो शेव्ह नोव्हेंबर या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ‘हिल या कुटुंबियांवर २००७ साली मोठं आभाळ कोसळलं होतं. मॅथ्यू हिल यांचं २००७ साली कोलेन या कॅन्सरने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आठ मुलं होती. वडिलांच्या  अचानक जाण्याने त्यांना धक्काच बसला. पण त्यांनी हार न मानता अशी परिस्थितीती इतरांवर ओढावू नये याकरता त्यांनी एक सामाजिक उपक्रम राबवायचं ठरवंल. कॅन्सरमुळे अनेकांचे केस गळायला लागतात. आणि आपण केस कापण्यासाठी शेकडो रुपये खर्च करतो. त्यापेक्षा एक महिना शेव्हिंग न करता त्यातून साठणारे पैसे नो शेव्हींग नोव्हेंबर या संस्थेला दान करायचे. जेणेकरून ते हे पैसे कॅन्सर रिसर्च सेंटरला देतील. जेणेकरून कॅन्सरवर योग्य उपचार शोधून काढता येतील आणि कॅन्सरमुळे जीव गमवणाऱ्यांची संख्या कमी होत जाईल.’ 

त्यानुसार २००७ साली या उपक्रमाला सुरुवात झाली तेव्हा फार कमी प्रतिसाद मिळाला. मात्र २००९ साली त्यांनी नो शेव्ह  नोव्हेंबर नावाचं संकेतस्थळ तयार केलं आणि बघता बघता त्यांना प्रतिसाद वाढत गेला.  सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना सहकार्य केलं. हा उपक्रम इतका व्हायरल होत गेला की जवळपास २१ देशांतून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. एका सर्वेक्षणानुसार, आता जवळपास २५ देशातील तरुण या संस्थेला मदत करतात. या उपक्रमाला मोव्हेंबर असंही म्हटलं जातं. त्यामागे असं कारण आहे की, मो म्हणजे मुस्टॅच म्हणजेच मिशा आणि व्हेंबर म्हणजे नोव्हेंबर महिना. हे दोन्ही शब्द एकत्र करत मोव्हेंबर असा शब्द तयार करण्यात आला. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.