Work not working without delay | जळगावातील कार्यशाळेत झिरो पेंडन्सीवर भर

ठळक मुद्देपुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले मार्गदर्शन झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल अभियानाचे सादरीकरणसर्व जिल्हा परिषदांपासून ते ग्रामपंचायत पातळीपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.७ : झिरो पेंडन्सी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजल (स्वच्छ कार्यालय व तत्पर प्रशासन) या उपक्रमामुळे प्रशासकीय कामात गती येऊन जनतेची कामे वेळेवर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा उपक्रम सामान्य माणसाला दिलासा देणारा ठरणारा आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाºयांनी कामे प्रलंबित न ठेवता कामकाज करावे, असे आवाहन पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.
ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार १ जानेवारीपासून राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गतच्या कार्यालयांसाठी झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल या कार्यप्रणालीसाठी नाशिक विभागातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी येथील कांताई सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुख्यत्वे दळवी यांंनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरन, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, प्रांताधिकारी जलज शर्मा, उपायुक्त (आस्थापना) सुकदेव बनकर, उपायुक्त (विकास) मित्रगोत्री आदी उपस्थित होते.
या वेळी दळवी म्हणाले की, झिरो पेंडन्सीची प्रमुख उद्दिष्टे ही कार्यालयातील अभिलेख व अभिलेख कक्ष अद्ययावत करणे, अनावश्यक कागदपत्रे नाश करणे, कार्यालय आणि कार्यालयाचा परिसर स्वच्छ करणे ही आहे. येत्या दोन महिन्यात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांपासून ते ग्रामपंचायत पातळीपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे. पुणे विभागात हा उपक्रम यशस्वीपणे राबविला गेला असल्याचे त्यांनी उदाहरणांसह सांगितले. तसेच कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. सोलापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी सोलापूर जि.प.मध्ये राबविलेल्या झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल अभियानाचे सादरीकरण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी केले. कार्यशाळेस नाशिक विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागप्रमुख, कक्ष अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक उपस्थित होते.