हजारो पोपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 02:54 PM2019-06-07T14:54:37+5:302019-06-07T14:54:51+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ललित लिहिताहेत ज्येष्ठ साहित्यिक माया दिलीप धुप्पड...

Thousands of parrots | हजारो पोपट

हजारो पोपट

googlenewsNext

‘‘अरे रुपक, थांब थांब, ते बघ त्या झाडावर कित्ती पोपट...’’
.... अरे बापरे, पोपटच पोपट.’’ ‘‘अरे ठेव, ठेव त्या बॅग्ज खाली, हा घे माझा मोबाइल, ते बघ त्या हिरव्या मोठ्ठ्या झाडावर, झाडाच्या आतापर्यंत ते गुब्बू गुब्बू पोपट. फोटो काढ त्याचा लवकर.’’ मीसुद्धा हातातल्या बॅग्ज खाली ठेवल्या. सगळं लक्ष वर, त्या झाडावरच्या पोपटांकडे. रुपकने दोन-तीन फोटो काढले. परत बॅग्ज घेऊन चालायला लागला आणि मी त्याला परत सामान खाली ठेवायला लावले. ‘‘बघ, बघ, शेजारच्या झाडावर पोपट, काढ फोटो.’’ त्या झाडावर पाने कमी. निष्पर्ण फांद्यावर ओळीने बसलेले पोपट लगेच दिसत होते. विशेष म्हणजे सगळे पोपट घरीच होते. हिरवे राघू सांभाळणारी ती हिरवी झाडे किती भाग्यवान होती. मी पहिल्यांदा त्या झाडांना सलाम केला. कारण एक जरी पोपट दिसला तरी मला खूप आनंद व्हायचा. आज या झाडांनी मला हज्जारो पोपटांचं दर्शन घडवलं. झाडांवर किंवा उडताना पोपट पाहायला वर्षानुवर्षे तरसलेल्या माझ्या दृष्टीला त्या हज्जारो पोपटांच्या दर्शनाने वर्षानुवर्षाचा आनंद मिळवून दिला. कुठे दिसते मला हे हज्जारो पोपट?
नांदेडला १५, १६ मार्च २०१९ ला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात बालसाहित्याचे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्या चर्चासत्रात मी साधन व्यक्ती म्हणून आमंत्रित होते. ‘बालसाहित्य आणि संगीत’ या विषयावर मी शोधनिबंध सादर केला. माझ्यासोबत माझा मुलगा अमीतचा असिस्टंट रुपक होता. नांदेड स्टेशनवर, लहान मुलांना आवडणाऱ्या पोपटांच्या दर्शनाने माझ्या ‘बालसाहित्य आणि संगीत’ या शोधनिबंधाची जणू सांगता झाली.
१६ मार्चला नांदेडहून जळगावला जाण्यासाठी आम्ही रात्री १० वाजताच नांदेड स्टेशनवर पोहोचलो. ११.३० वाजता रेल्वे होती. आम्ही रिक्षातून खाली उतरलो. मी चालताना सवयीप्रमाणे आकाश, झाडे पाहत होते. स्टेशन पसिरात अनेक मोठ-मोठी झाडे होती. एका डौलदार, हिरव्या, मोठ्ठ्या लिंबाच्या झाडामधून दोन पोपट थोडेसे बाहेर आले, परत आत गेले. ‘अरे व्वा! किती छान पोपट पहायला मिळाले.’ याचा मला खूप आनंद झाला. या आनंदात आणखी भर पडली, पडतच गेली. कारण मला तिथल्या सात-आठ झाडांवर हज्जारो पोपट बसलेले दिसले. आवळ्याच्या झाडाच्या फांदीफांदीवर, अगदी जवळ-जवळ आवळे लागलेले दिसतात तरी प्रत्येक फांदीला पोपट लागलेले होते. ते उडण्याच्या मूडमध्ये नव्हते. दिवसभर उडून रात्री त्यांच्या ठरलेल्या झाडांवर विसाव्याला आले असावेत. ते सगळे गोलमेज पोपट नांदेडच्या भूमीत ‘सुपोषित’ असावेत. संत नामदेवांच्या भूमीत, पवित्र गुरूद्वारा असलेल्या नांदेडच्या भूमीत, निसर्गाचा हा लोभसवाणा अविष्कार मनाला थक्क करून गेला.
रेल्वे स्टेशन म्हटलं तर माणसं, वाहनं यांची वर्दळ असणारच.
पण हे पोपट तिथला सराव असेल म्हणून न घाबरता झाडांवर अगदी ऐटीत बसलेले होते़ शाळेतल्या मुलांच्या बेंचवरच्या जागांसारखी यांची जागा ठरलेली असेल का, पण तसे काही वाटले नाही़ त्यांचा मिट्ठू मिठ्ठू आवाज मला ऐकायला येत नव्हता, पण माझ्या मनात मिट्ठू मिठ्ठू सुरू झालं होतं़ एकाच वेळी हज्जारो पोपट पाहण्याचा योग मनाचा हिरवा रंग गहिरा करून गेला़
सध्या चिमण्या कमी झाल्या आहेत़ पण पोपटही दिसत नाहीत़ चिमणी उडाली भुर्र तसे पोपटही उडून गेले आहेत़ चिऊ-काऊ-पोपट यांचे पंख पकडून बालपण आकाशात उडत़ उडत, गिरक्या घेत पुढे सरकायचं़ पाठ्यपुस्तकातला राघू प्रत्यक्ष पाहायला बालमन उत्सुक असायचं़ आज्जीने विचारलेल्या कोड्यातील पोपट आजही आठवतो़ पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवं काथ नाही, चुना नाही, तोंड कसं रंगलं, या कोड्याचं उत्तर देताना बहीण भावांचा एकच मोठ्ठा सूर ‘पोपट’ या शब्दातून बाहेर पडला होता़ आज पोपटांची झाडावरची घरे कमी झाली असली तरी प्रत्येकाच्या मनात पोपटाने एक घरटं बांधलेलंच असतं़
पण बºयाच वेळा काही माणसं आपल्या कृत्रिम आनंदासाठी पोपटाला पिंजºयात बंद करतात़ त्याचं मोकळं आकाश बंदिस्त करणारी ही माणसं, त्याचं स्वच्छंदी उडणं कैद करणारी ही माणसं, त्याचं मिट्ठू मिठ्ठू आपल्या भाषेत (नमस्ते, हॅलो, बाय इ़) रुपांतरित करून पोपटपंची करायला लावणारी ही माणसं़़़ अहो़़़, कुणी पिंजरा देता का, मोठा पिंजरा़़़ या माणसांना त्या पिंजºयात कोंडून हॅलो हॅलो सोबत ‘हाय, हाय’ करायला लावलं तर,
अरे, कुणी त्या पोपटाचा पिंजरा उघडून देतं का रे, कित्ती मज्जा? किती मज्जा येईल जेव्हा त्याल त्याचे भरारीचे पंख परत मिळतील़ पोपटानेसुद्धा डाळिबांच्या दाण्यांना भुलू नये, पिंजºयात अडकू नये, बाहेर पडावं यासाठी पाठ्यपुस्तकात ‘पाळीव पोपटास’ ही छानशी कविता होती़ ती कविता काव्य बिहारी (धोंडो वासुदेव गद्रे) यांची होती़
- हे डाळींबाचे दाणे वेड्या घात तुझा करीतो
- पिंजºयात मेले किती अभागी पोपट या जगती
- हे डाळींबाचे दाणे वेड्याघात तुझा करीती
पिंजºयात पक्ष्यांना समज देणारे एक सुंदर गाणे आहे़़़
- आकाशी झेप घे रे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा
- घर कसले ही तर तारा, विषसमान मौक्तिक चारा
- तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने
या कवितेने स्वतंत्रतेचे स्तोत्र गायिले़ गुलामी न स्वीकारण्याची वृत्ती मनात रुजविली़ गुलामाला उंच उडण्याचे बळ मिळत नाही़ त्याचे असलेले बळही नष्ट होते़
बहिणाबाई चौधरी यांची स्फुट ओवी आहे़़़
हिरवे हिरवे पान लाल फय जशी चोच आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं
बहिणाबाईंनी कल्पनेने पाहिलेलं पोपटांचं पीक मी नांदेड स्टेशनच्या झाडांवर प्रत्यक्ष पाहिलं़ फक्त झाड वडाचं नव्हतं़ झाड बदललं तरी पक्ष्यांचं वागणं बदलत नसावं, जळगावच्या आमच्या वाड्यातलं आब्यांचं झाड तोडलं गेलं, वाईट वाटलं, आता कुहू कुहू बंद होणाऱ पुढच्या वर्षी घराच्या अगदी जवळच्या उंबराच्या झाडावर कुहू कुहू ऐकलं आणि मनाला आंब्याचा मोहोर आला़ (पूर्वार्ध)
- माया दिलीप धुप्पड, जळगाव

Web Title: Thousands of parrots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.