मर्यादेयं विराजते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:35 AM2017-10-04T01:35:02+5:302017-10-04T01:35:33+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये नामवंत वकील तथा लेखक अॅड.सुशील अत्रे गेल्या पाच महिन्यांपासून ‘प्रसंग असता लिहिले’ या सदरात लिहीत होते. आज त्यांच्या लेखमालेचा शेवटचा भाग.

Sangeetoye sarajayate! | मर्यादेयं विराजते !

मर्यादेयं विराजते !

Next

सर्व ज्ञात-अज्ञात वाचक मित्र हो, गेले पाच महिने आपण ‘प्रसंग असता लिहिले’ या सदराच्या माध्यमातून भेटतो आहोत. या लेखमालेला निमित्त झालं ते एका छोटय़ाशा ‘पोस्ट’चं. फेसबुकवरती मी ‘चंदाराणी’ नावाची एक पोस्ट टाकली होती. त्यानंतर एक-दोन दिवसातच ‘लोकमत’चे निवासी संपादक आणि माङो मित्र मिलिंद कुलकर्णी भेटले. ते म्हणाले, तीच पोस्ट थोडी आणखी सविस्तर लिहा. आपण छापू. मग मी तेच ‘लेख’ या स्वरुपात लिहून पाठवलं. त्यावर त्यांचा लगेच फोन आला, की एक स्वतंत्र लेख छापण्यापेक्षा आपण लेखमाला सुरू करू आणि मी लिहिता झालो. ‘प्रसंग असता लिहिले’ या सदरात लिहिण्यासाठी कोणताही विशिष्ट विषय नव्हता. तसं बंधनही नव्हतं. त्यामुळे मला हव्या त्या विषयावर मोकळेपणाने लिहिता आलं. ‘सोनू, तुझा माङयावर भरोसा नाय का?’सारख्या अल्पजीवी आणि तात्पुरत्या विषयापासून ‘जनरेशन गॅस’सारख्या सर्वकालीन, सार्वत्रिक विषयार्पयत मी इथे लिहिलं. केवळ लेखनाच्या माध्यमातूनही अनेक नवे मित्र मिळतात, हा अनुभव मी घेतला. काही मित्रांनी उत्साहाने आणि आपुलकीने विषयसुद्धा सुचवले. माङोच विषय आता मी वळून बघतो तेव्हा लक्षात येतं की अनेक लेखांमध्ये ‘आमच्या काळी असं होतं..’ हा मुद्दा येतोच येतो. बहुदा हा वयाचा आणि प्रचंड गतीने बदलत चाललेल्या जीवनमानाचा एकत्रित परिणाम असावा. आपल्या जेव्हा हे लक्षात येतं, की आपल्या लहानपणीचे साधेसुधे, मजेशीर दिवस आपण काही झालं तरी परत आणू शकत नाही आणि आणले तरी ते आता कुणालाच नको आहेत. तेव्हा मग अशा लेखांमधून ‘त्या’ दिवसांचं कौतुक करण्याचा अट्टाहास आपण करतो. अशा वेळी मूळ लेखाचा विषय काहीही असला तरी कुठेतरी चुकारपणे एखादं वाक्य ‘आमच्या काळी..’च्या धर्तीवर डोकावतंच. माङया लेखांवर ज्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या, त्यावरून हे लक्षात आलं, की केवळ लिहिणा:या मलाच नव्हे तर वाचणा:या अनेकांनाही त्यांचे ‘जुने दिवस’ आठवले. त्यात ते रंगून गेले. खरं तर असे लेख म्हणजे केवळ एक निमित्त होतं. त्यांचं महत्त्व तेवढंच ! कुठल्यातरी लेखाच्या निमित्ताने वाचणा:याच्या मनातली आठवणींची पोतडी उघडली जाते आणि त्यातून जादूसारख्या अनेक आठवणी बाहेर पडतात. मग तो लेख बाजूला पडतो आणि वाचक स्वत:मधेच गुंगून जातो. अशा निदान काही जणांच्या मनातल्या पोतडीची गाठ सोडवण्याचं काम माङया लेखांनी केलं असेल तरी त्याचा मला आनंद आहे. जिथे सर्वच प्रकारचे संवाद हळूहळू आटत चाललेत तिथे स्वत:शी संवाद तरी कुठे होतो आजकाल? त्याचीसुद्धा आता मुद्दाम, जाणीवपूर्वक सवय करून ठेवावी लागते. लेखन आणि वाचन हे स्वत:शी संवाद करण्याचे उत्तम मार्ग आहेत. अलिकडच्या काळात खरं तर लेखन खूप सोपं झालंय. म्हणजे असं की, त्या लेखनाला ‘आऊटलेट’ हमखास मिळतो. पूर्वी ‘लेखक’ म्हणजे एक स्वतंत्र वर्ग होता. ज्यांनी लिहिलेलं छापलं जातं किंवा इतर लोक वाचतात. असं काहीतरी लिहिणारे फारच थोडे होते. छपाईची साधनं, तंत्र या गोष्टी लक्षात घेता एखाद्याचं पुस्तक छापून ते प्रकाशित होणे हा दुर्मिळ योग होता. आपलं नाव कागदावर छापलेले याची देही याचि डोळा बघण्याची एकच संधी होती-लग्नपत्रिकेवरती ‘चि.’ किंवा ‘चि.सौ.कां.’च्या पुढे छापलं जाईल तेव्हाच ! पण आता तसं नाही. ‘छापणे’ याला उत्तम पर्याय आता उपलब्ध आहेत. फेसबुक किंवा व्हॉटस्अॅपवर आता कुणीही स्वत:ची मते ‘लिहू’ शकतो. त्याच्या कोणत्याही लेखनाला हा हक्काचा ‘आऊटलेट’ आता मिळू शकतो. कुणी ना कुणीतरी त्याचं लेखन वाचतंच ! पण अशा वेळी एक धोका कायम असतो. एखादी गोष्ट अति सोपी, अतिसुलभ झाली, की तिचा दर्जा आपोआपच घसरू लागतो. लेखनाचंही तेच होऊ शकतं. मग वाचणारा कुठेतरी, नकळत फेसबुक लेखनापेक्षा छापील मजकुराला जास्त पसंत करतो. जास्त विश्वासार्ह मानतो. बहुदा, त्यामुळेच वृत्तपत्रातल्या लेखमालेचं, पुरवणीचं महत्त्व आजही टिकून आहे- पुढेही राहीलच. शिरीष कणेकरांनी कुठल्याशा हिंदी चित्रपटाबद्दल लिहिलं होतं की त्या सिनेमाची एक गोष्ट खूप चांगली आहे, ती म्हणजे शेवटी तो (एकदाचा) संपतो. हे असलं काहीतरी ‘प्रसंग असता लिहिले’बाबत कोणी म्हणण्यापूर्वीच आपण थांबणे शहाणपणाचे आहे. विषय ‘लेखन’ असो की ‘राजकारण’.. वेळेवरती थांबणं फार महत्त्वाचं आहे अन्यथा आपला ‘अडवाणी’ होतो ! खरं की नाही? तेव्हा आता आपला सप्रेम निरोप घेतो आणि इथेच थांबतो. - मर्यादेयं विराजते !

Web Title: Sangeetoye sarajayate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.