पुणे- जबलपूर हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसची चैन ओढून प्रवाशांना लूटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:19 PM2018-09-19T12:19:21+5:302018-09-19T12:20:57+5:30

दोन बोग्यांमध्ये धुमाकूळ

Pune-Jabalpur Holiday Expedition Express looted the passengers | पुणे- जबलपूर हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसची चैन ओढून प्रवाशांना लूटले

पुणे- जबलपूर हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसची चैन ओढून प्रवाशांना लूटले

Next
ठळक मुद्देगेटमनच्या प्रसंगावधानाने पोलीस पोहचलेअज्ञात चोरटे पसार

रावेर, जि. जळगाव : भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर डाऊन ०१६५५ पुणे - जबलपूर हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसची चैन ओढून अज्ञात चोरट्यांनी दोन बोग्यांमधील प्रवाशांना लूटल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास तामसवाडी रेल्वे गेट ते वाघोड रेल्वे पुलाच्या दरम्यान खंबा क्रमांक ४८२ /२८ जवळ घडली. यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
डाऊन ०१६५५ पुणे - जबलपूर हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेस भुसावळ जंक्शन रेल्वे स्थानक सोडल्यानंतर खंडवा स्थानकाकडे जात असताना अज्ञात इसमांनी सदर गाडीची चैन ओढली व काही बोग्यांमधील आरडाओरडा करण्याचा आवाज आल्याने तामसवाडी रेल्वे गेडवरील गेटमन फारूख शेख खाटीक यांनी वाघोडा व रावेर स्टेशन स्थानक अधीक्षक व नियंत्रण कक्षाला तातडीने खबर दिली. तामसवाडी रेल्वे गेटच्या पुढे सुमारे एक किलोमीटर अंतरावर खंबा क्रमांक ४८२/२८ जवळ सदरची गाडी थांबवताच अज्ञात चोरट्यांनी बोगी क्रमांक डब्ल्यू सीआर १८२५२ व अन्य एका बोगीमधील प्रवाशांना धाक दाखवून लूटल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे २:४० ते २:५० वाजेपर्यंत तब्बल १० मिनिटे या एक्स्प्रेस गाडीचा खोळंबा झाला व त्या दरम्यान संबंधित अज्ञात चोरट्यांनी घटनास्थळावरून रात्री अंधारात पोबारा केला.
दरम्यान, चालक व गार्डच्या खबरीवरून वाघोडा स्थानक अधीक्षकांनी भुसावळ व खंडवा लोहमार्ग रेल्न्वे पोलीस तथा रावेर पोलिसात खबर दिली. भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप गढरी यांनी त्यांच्या पोलिस ताफ्यासह रावेर पोलिसांशी समन्वय साधून रात्रीपासूनच शेतीशिवारासह सर्व परिसर पिंजून काढला. दरम्यान, खंडवा रेल्वे पोलीस पथक संबंधित प्रवाशांची फिर्याद नोंदवण्यासाठी त्याच एक्स्प्रेस गाडीतून पुढील इटारसी थांब्यापर्यंत रवाना झाले असून अद्यापपावेतो एका प्रवाशाच्या बॅगमधील १५ हजार रुपये चोरून नेल्याची माहिती भुसावळ लोहमार्ग पोलिसांना मिळाली.
 

Web Title: Pune-Jabalpur Holiday Expedition Express looted the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.