जळगावात महारॅलीद्वारे अवयवदानाविषयी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:26 PM2018-09-19T12:26:41+5:302018-09-19T12:28:16+5:30

पथनाट्याने वेधले लक्ष

Public awareness about organism by the Maharaja in Jalgaon | जळगावात महारॅलीद्वारे अवयवदानाविषयी जनजागृती

जळगावात महारॅलीद्वारे अवयवदानाविषयी जनजागृती

Next
ठळक मुद्दे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने अयोजनजनजागृतीपर उपक्रम

जळगाव : अवयवदानामुळे इतर गरजूंना त्याचा उपयोग होऊन अनेकांना जीवदान मिळण्यास मदत होते, हा संदेश पोहचविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या महारॅलीद्वारे अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. या सोबतच सादर करण्यात आलेल्या पथनाट्याने लक्ष वेधून घेतले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने अवयवदानाचे महत्त्व कळावे यासाठी गेल्या आठवड्यापासून जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहे. यामध्ये रांगोळी, निबंध, पोस्टर स्पर्धा, विविध चर्चासत्र असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणून १८ सप्टेंबर रोजी अवयवदानाची जनजागृती व्हावी यासाठी रॅली, पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.
पथनाट्यातून जनजागृती
जिल्हा रुग्णालय परिसरात (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) पथनाट्य सादर करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुरेश भोळे, आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, नगरसेवक अमित काळे, अरविंद देशमुख उपस्थित होते. आमदार भोळे यांनी आपल्या मनोगतातून अवयवदानाविषयी माहिती दिली. डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी अवयवदान अभियान अंतर्गत महाविद्यालयाकडून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
या वेळी काढण्यात आलेल्या महारॅलीला आमदार सुरेश भोळे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. जिल्हा रुग्णालयापासून रॅलीला सुरुवात झाली व ही रॅली स्वातंत्र्य चौक, बस स्थानक, स्टेट बँक चौकमार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. या रॅलीमध्ये अवयवदानाविषयी संदेश देणारे विविध फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. त्यातून विविध संदेश देण्यात आले. या सोबत विद्यार्थ्यांनी अवयवदानाविषयी दिलेल्या विविध घोषणांनी परिसर दणाणून गेले होते. वैद्यकीय अभ्यासक्रम तसेच परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेत अवयवदानाची ही चळवळ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले.
केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढीचे डॉक्टर्स आणि कर्मचारीदेखील सहभागी होते. अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बिना कुरील व डॉ योगिता बावस्कर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी डॉ.मारोती पोटे, डॉ.अरुण कासोटे, डॉ. सईदा अफरोज, डॉ. संजय गायकवाड, डॉ.चंद्र शेखर डांगे, डॉ.जितेंद्र कोल्हे, डॉ.शुभांगी डांगे, डॉ.सौरभ कुलकर्णी, डॉ.वैभव सोनार, डॉ.लोखंडे आदी उपस्थित होते. डॉ. विलास मालकर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, बागुल यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
 

Web Title: Public awareness about organism by the Maharaja in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.