जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक रुपयाचीही तरतूद नाही - एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:18 PM2018-03-22T12:18:04+5:302018-03-22T12:18:04+5:30

सरकारच्या कृपेने रोज माणसे मरत असल्याचा आरोप

No provision for Medical College | जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक रुपयाचीही तरतूद नाही - एकनाथराव खडसे

जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक रुपयाचीही तरतूद नाही - एकनाथराव खडसे

Next
ठळक मुद्देआरोग्याच्या धोरणाबाबत सरकारची ‘चिरफाड’माणसे मरतात आणि सरकार तोंडाला पाने पुसते

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २२ - जळगाव जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला असून येथे सरकारच्या कृपेने दररोज माणसे मरत आहे. जिल्हा रुग्णालय वैद्यकीय विभागाकडे असो की आरोग्य विभागाकडे, सुविधा कधी देणार ते सांगा असा खडा सवाल करीत जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक रुपयांचीही तरतूद नसल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी करीत केवळ गवगवा केला जात असल्याचाही आरोप केला.
जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून या बाबत आपण वारंवार आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत खडसे यांनी विधीमंडळात व्यक्त करीत आरोग्यमंत्र्यांवर चांगलीच आगपाखड केली.
सुविधांबाबत सभागृहातच उत्तर द्या
जिल्हा रुग्णालयात एआरआयची सुविधा नाही, सिटीस्कॅन, एक्स-रेसाठी तंत्रज्ञ नाही, त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. रुग्णांच्या उपचारासाठी सांगितले तर जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे, असे सांगितले जाते, ते कोणाकडेही असो, तेथे सुविधा द्या, अशी मागणी खडसे यांनी करीत केवळ वैद्यकीय महाविद्यालयाबाबत गवगवा आहे, मात्र त्यासाठी एक रुपयाचीही तरतूद नसल्याचा मुद्दाही त्यांनी विधीमंडळात मांडला. वैद्यकीय महविद्यालय होत असल्याचे स्वागत आहे, मात्र सुविधा कधी देतात, याचे उत्तर आपल्याला पाहिजे, असे त्यांनी ठासून सांगत यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली पाहिजे, अशी मागणी केली.
माणसे मरतात आणि सरकार तोंडाला पाने पुसते
पाच दिवसात मुक्ताईनगर मतदार संघातील दोन रुग्णांबाबत वाईट अनुभव आल्याचे सांगत यात केवळ सुविधांअभावी एका महिलेला जीव गमवावा लागला, याला जबाबदार कोण, असा सवाल करीत आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. केवळ लाखोचे आरोग्य शिबिर घेऊन ‘या मुंबईला...’ असे सांगितले जाते व येथे आल्यावर उपचाराची बोंब असल्याचे सांगून सरकार आमच्या तोंडाला पाने पुसत असल्याचा आरोप करीत त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाना साधला.
उपोषणाच्या इशा-यानंतर वैद्यकीय अधिकारी दिले, मात्र ते हजरच नाही
जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांबाबत आपण उपोषणाचा इशारा दिला होता, त्यानंतर ४० वैद्यकीय अधिकारी दिल्याचे सांगण्यात आले. त्यातील काही पाच दिवस आले व नंतर गायब झाले, त्याचा काय उपयोग, असे सांगत वैद्यकीय अधिकारी कधी देतात, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.
काय भोगावे लागते ते आम्हाला माहित
जळगाव जिल्ह्यात दररोज अपघात होऊन मृत व्यक्तींचे वैद्यकीय अधिकारी नसल्याने शवविच्छेदन करण्यास अडचणी येत असल्याचे सांगून जिल्ह्यातील आरोग्यविषयक वास्तव सभागृहात मांडले. सोबतच लोक मृतदेह घेऊन आमदारांच्या दारी येतात. त्यांच्या हाती त्या वेळी दगडं असतात, अशा वेळी आम्हाला काय भोगावे लागते, हे आम्हालाच माहित, असे गंभीर चित्रही मांडले. आरोग्यमंत्री जळगावला येऊन गेले, त्याबद्दल त्यांचा आभारी, असे उपरोधकपणे म्हणत आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याबद्दल आमची केवळ थट्टाच चालली असल्याचा आरोपही खडसे यांनी केला.

Web Title: No provision for Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.