माझा संघर्षच हिच खरी माझी लेखनाची प्रेरणा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:19 PM2018-11-29T13:19:26+5:302018-11-29T13:19:43+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत भुसावळ येथील शिक्षिका सौ.सीमा भारंबे...

My struggle is the only inspiration for my writing ... | माझा संघर्षच हिच खरी माझी लेखनाची प्रेरणा...

माझा संघर्षच हिच खरी माझी लेखनाची प्रेरणा...

googlenewsNext

शिक्षिका म्हणून नुकतीच सुरू झालेली माझी नोकरी, शिक्षण सेवकाचे मानधन, १२ वर्षांचा कुमार वयातील मुलगा, नऊ महिन्याची मुलगी आणि बिघडलेली संसाराची आर्थिक घडी. या संपूर्ण लवाजम्यासह माझी संघर्षयात्रा सुरू झाली. एकदा मानसिक स्थिती खूप वाईट असताना मी कवितेच्या चार ओळी लिहिल्या, अन्....
‘माय स्ट्रगल मेड इन राईटर’ असे मी म्हटले तर चुकीचे होणार नाही. माझ्या संघर्षाने मला लेखनाची प्रेरणा दिली. प्रत्येक स्त्रीचं सुखी संसाराचं स्वप्न असतं. तसं माझही होतं. पण नियतीने माझ्यासाठी काही वेगळाच डाव मांडून ठेवला होता. माझे पती चेतन बोरोले यांचा वरून म्हणजे १६-१७ फुटावरून खाली पडून अपघात झाला. अपघातात त्यांचा पाठीचा कणा मोडला, त्यांच्या मज्जारज्जूला बारीक भेगा पडल्या. ते कायमचे १०० टक्के अपंग होऊन अंथरुणाला खिळले. त्यांना ‘पॅराप्लेझिया’ झाला होता. ‘माझ्या मनात व मेंदूत
नेहमी भांडण असतं
मेंदू म्हणे मनाला बघ ! नसे हा योग
प्रश्नच प्रश्न सारे, उत्तर काही सापडेना
असे हा रोग .....
या ओळी लिहित असताना माझ्या तासावर जाण्याची घंटा झाली. तो कागद तसाच पर्समध्ये टाकून मी वर्गावर गेले.
संध्याकाळी शाळा सुटल्यावर तो कागद नकळत खाली पडला आणि आमच्या शाळेचे पर्यवेक्षक के.के.नेहेते यांनी उचलून मोठ्याने वाचला. तो माझा आहे हे मी सांगितल्यावर त्यांनी ती कविता पूर्ण करण्याचा मला आग्रह केला. त्या आधीही काही कविता लिहिलेल्या होत्या. अशा एकूण ३५ सामाजिक विषयांवरील कवितांचा माझा ‘मोगऱ्याची फुले’ हा पहिला काव्यसंग्रह सहकारी के.के.नेहेते, डी.पी.ढाके, डॉ.जगदीश पाटील, एल.एन.फिरके यांच्या सहकार्याने साधना करत माझ्या दु:खाला त्या साहित्यातून वाट मोकळी करून दिली. ‘मोगºयाची फुले’ ‘गुलमोहर’ हे दोन काव्यसंग्रह ‘नियती’ ‘चंद्रग्रहण’ हे दोन कथासंग्रह. ‘लढा’ ही कादंबरी. ‘रुक्मिणी’ हे नाटक आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित ‘भारतीयांच्या हृदयाचे सरदार’ हा चरित्रग्रंथ इत्यादी पुस्तकांचे लेखन केले.
वाचकांनी माझ्या वास्तववादी लेखनाला भरभरून प्रतिसाद दिला. ‘चंद्रग्रहण’ व ‘लढा’ ही दोन पुस्तके विशेष पसंद केली गेली, अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
- सौ.सीमा भारंबे, भुसावळ, जि.जळगाव

Web Title: My struggle is the only inspiration for my writing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.