रेल्वेत झाडू मारुन मोबाईलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:28 AM2019-02-14T11:28:25+5:302019-02-14T11:28:53+5:30

२०० मोबाईल लांबविले

Mobile burglary by broom climbing on the railway | रेल्वेत झाडू मारुन मोबाईलची चोरी

रेल्वेत झाडू मारुन मोबाईलची चोरी

Next
ठळक मुद्देगुन्हेगारास अटक



जळगाव : कोपरगाव ते भुसावळ या दरम्यान एक्सप्रेस गाड्यांमध्ये झाडू मारण्याचा बहाणा करुन मोबाईल व पाकीट मारणाऱ्या गणेश नारायण काळे (वय २०, रा.जवळका, ता. कोपरगाव, जि.अहमदनगर, मुळ रा. सैलानी, जि.बुलडाणा) या अट्टल गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी कोपरगाव येथून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. त्याने आतापर्यंत दोनशेच्यावर मोबाईल लांबविले आहेत.
रामानंद नगर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेश याला अटक केली आहे. अजय अशोक देशमुख (वय ३०, रा.शिवकॉलनी) या तरुणाचा ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल, ८०० रुपये रोख व एटीएम कार्ड ३ आॅगस्ट २०१८ रोजी घरातून लांबविण्यात आले होते.
या गुन्ह्याचा तपास सुरु असताना हा मोबाईल कोपरगाव येथे गणेश काळे याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांना स्वतंत्र पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रोहोम यांनी हेडकॉन्स्टेबल अनिल इंगळे, रमेश चौधरी, संतोष मायकल, मिलिंद सोनवणे यांचे एक तर विजय शामराव पाटील, प्रवीण हिवराळे, विजय पाटील, चंद्रकांत पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर व रवींद्र गिरासे यांचे दुसरे पथक तयार केले होते.
१४ वर्षाचा असताना पहिली चोरी
गणेश याच्याविरुध्द जळगाव शहर, रामानंद नगर, नाशिक, जिल्हा पेठ, भुसावळ येथे सात मोबाईल व सोने चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सात वर्षापूर्वी रमेश चौधरी यांनीच त्याला भुसावळ येथे पकडले होते. तेव्हा त्याच्याविरुध्द पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो सराईत गुन्हेगार झाला. जळगावमध्येच त्याच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. रेल्वेत मोबाईल व पैसे वगळता तो इतर कोणतीच वस्तू चोरत नाही, हे त्याचे खास वैशिष्टे आहे.
पोलीस स्टेशनमधून पळाल्याने दोन पोलीस निलंबित
गणेश काळे याला २०१६ मध्ये मध्यरात्री चोरी करताना विद्युत कॉलनीतील लोकांनी रंगेहाथ पकडले होते. तेव्हा इमारतीवरुन उडी घेऊन तो पसार झाला होता, मात्र पाठलाग करुन लोंकानी त्याला पकडलेच होते. त्यानंतर रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तेव्हा पोलिसांची नजर चुकवून तो पहाटेच्या सुमारास पळून गेला होता. या प्रकारामुळे तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांना निलंबित केले होते.
अटक झाल्याने पत्नीने सोडले
भुसावळ येथे चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्यामुळे पत्नीने त्याला सोडून दुसºयाशी संसार थाटला होता. आता त्याने कोपरगाव येथे नात्यातीलच मुलीशी विवाह केला आहे. पोलिसांनी त्याला रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले तेव्हा पत्नीने गोंधळ घालून त्याला घेऊन जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने तिला न जुमानता थेट जळगावात आणले.

Web Title: Mobile burglary by broom climbing on the railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर