Lok Sabha Election 2019 : भाजप जिल्हाध्यक्षांच्या अमळनेर तालुक्यातच संघटन झालय खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:53 PM2019-04-13T12:53:03+5:302019-04-13T12:53:30+5:30

नगरपालिकेत भाजपकडून निवडून आलेला मूळ सदस्य एकच

Lok Sabha Election 2019: BJP district president unleashed in Sangrur in Amalner taluka | Lok Sabha Election 2019 : भाजप जिल्हाध्यक्षांच्या अमळनेर तालुक्यातच संघटन झालय खिळखिळी

Lok Sabha Election 2019 : भाजप जिल्हाध्यक्षांच्या अमळनेर तालुक्यातच संघटन झालय खिळखिळी

googlenewsNext

जळगाव : भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे मूळ गाव असलेल्या अमळनेर तालुक्यात पक्ष संघटना तर खिळखिळी झालीच असून विधानसभेसह अन्य निवडणुकांमध्ये या पक्षाला अपयशच पदरी पडल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यात या पक्षापासून मतदार दूर जात असल्याचेच लक्षात येते. या तालुक्यात ‘कार्यकर्ते, पदाधिकारी फुललेले मात्र कमळ कोमेजलेले’ अशी परिस्थिती असल्याचे जिल्हा स्तरावर बोलले जात असते.
भाजपाने जिल्हाध्यक्ष म्हणून उदय वाघ यांना २०१३ मध्ये संधी दिली. पक्षाचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे विरोधी पक्षनेते असताना उदय वाघ हे त्यांचे कट्टर समर्थक होते. खडसे यांनी वाघ यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली. तिच पुनरावृत्ती नंतरच्या टर्मला म्हणजे २०१६ मध्ये झाली.
उदय वाघ यांना पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली. एवढेच नव्हे तर २०१४ मधील निवडणुकीत यश मिळाल्यानंतर उदय वाघ यांना अमळनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदही खडसे यांनी आमदार शिरीष चौधरी यांची समजूत घालून देऊ केले. त्यांच्या राजकीय वाटचालीचा हा वाढता आलेखच. मात्र त्या दृष्टीने तालुक्यात पक्षाचा विस्तार होऊ शकला नाही.
अनेक पातळ्यांवर अपयश
अमळनेर तालुक्यात जि.प.च्या पाच गटांपैकी भाजपचे २ सदस्य आहेत. नगरपालिकेत सध्या पक्षाची सत्ता आहे. मात्र जेव्हा निवडणूक झाली तेव्हा पक्षाचा केवळ एकच सदस्य निवडून आला होता. नगराध्यक्षांसह नगरसेवकांना प्रवेश देऊन भाजपची सत्ता आली आहे. विधानसभेत २००९ त्यानंतर २०१४ असे सलग दोन टर्म म्हणजे दहा वर्षात पक्षाला अपयश आले. पक्षापासून मतदार दूर जात असल्याचे चित्र आहे.
गटबाजी जणू पाचवीला पूजलेली
तालुक्यातील भाजपच्या वाटचालीचा आढावा घेता गेल्या काही वर्षात ‘यश कणभर पण गटबाजी मनभर’ अशीच परिस्थिती येते. माजी नगराध्यक्ष, कापूस फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष चौधरी हे यामुळे दूर गेले. माजी आमदार डॉ. बी.एस. चौधरी, अनिल भाईदास पाटील, उदय वाघ, राष्टÑवादीतून भाजपात आलेले माजी आमदार साहेबराव पाटील व पक्षाचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी आदी नेत्यांचे एक ना अनेक गट येथे आहेत.
नेते बदलले की प्यादेही बदलतात
पक्षात पूर्वी केवळ माजी मंत्री एकनाथराव खडसे हे सांगतील ती पूर्व दिशा होती. त्यानंतर आता गिरीश महाजन हे सांगतील ती पूर्व असते. त्या बरोबरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही एक गट कार्यरत आहेच. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडूनच जणू डोंबाऱ्याचा खेळ सुरू असून नेते बदलले की प्यादेही बदलत गेल्याचे लक्षात येते. विद्यार्थी परिषदेतून उदयास येऊन मोठे झालेले राजेश पांडे, उदय वाघ व आता आमदार स्मिता वाघ यांचा हा तालुका म्हणून परिचित पण संघटन पातळीवर काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांनाही पडतो.
अनेकांचे मोठे योगदान... संत सखाराम महाराज, सानेगुरूजी यांच्या कर्मभूमीत जनसंघ ते भाजप या वाटचालीत संघटन वाढविण्यात काही जणांचे पूर्वी मोठे योगदान होते. प्र.स.पंडीत, माजी नगराध्यक्ष स्व.देसराज अग्रवाल, शुभदा करमरकर, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, शाम लुल्ला, हिरामण खानझोडकर, कमलाबाई पाटील, बजरंग अग्रवाल यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हा पक्ष वाढविला, फुलविला. पण आजची स्थिती पाहता राज्यात सत्ता असली तरी विविध पातळ्यांवर येणारे अपयश लक्षात घेता जिल्हाध्यक्षांच्या तालुक्यात भाजप संघटन हे खिळखिळे होत असल्याचेच लक्षात येत आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: BJP district president unleashed in Sangrur in Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.