काही राजकीय प्रवृत्तींमुळे जळगावातील ‘केसीई’ला वैद्यकीय महाविद्यालय मिळाले नाही - एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:55 AM2018-09-15T11:55:13+5:302018-09-15T11:56:25+5:30

‘आनंदयात्री’ डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाच्या प्रकट कार्यक्रमात शास्त्रीय गायनाने जिंकले मन

KCI did not get medical college due to some political tendencies - Eknathrao Khadse | काही राजकीय प्रवृत्तींमुळे जळगावातील ‘केसीई’ला वैद्यकीय महाविद्यालय मिळाले नाही - एकनाथराव खडसे

काही राजकीय प्रवृत्तींमुळे जळगावातील ‘केसीई’ला वैद्यकीय महाविद्यालय मिळाले नाही - एकनाथराव खडसे

Next
ठळक मुद्दे‘आनंदयात्री’ व ‘आठवणींची ह्रद्द पाने’चे प्रकाशनकुलगुरुंकडे दिला स्वायत्ततेचा प्रस्ताव

जळगाव : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या (केसीई) वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मी सत्तेत असताना विधानसभेत १९९५मध्येच करण्यात आला होता, मात्र जिल्ह्यातील अशा काही प्रवृत्ती होत्या की त्यांच्यामुळे हे काम मार्गी लागले नाही, अशा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला.
‘आनंदयात्री’ डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाच्या प्रकट कार्यक्रमानिमित्त व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने ‘आनंदघनस्मृती’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी रात्री मू.जे.महाविद्यालयातील विवेकानंद भवनाच्या प्रांगणात करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री एकनाथराव खडसे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील, केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, उपाध्यक्ष अ‍ॅॅड. प्रकाश पाटील, प्रख्यात गायक राहुल देशपांडे (पुणे), छबिलभाई शहा, संघपती दलूभाऊ जैन, डॉ.अरुणाताई पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्ज्वालन करून उद््घाटन करण्यात आले.
प्रस्ताविक नंदकुमार बेंडाळे यांनी केली. त्यात ते म्हणाले, माझे पिता डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या प्रेरणेने मी खंबीरपणे उभा असल्याचे सांगून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. या वेळी संस्थेच्या वाटचालीचा प्रवास त्यांनी सांगितला.
वारस म्हणून कुठलीही घराणेशाही राहणार नाही
गेली १० वर्षे मी संस्थेचा अध्यक्ष असलो तरी मार्च २०२३ पर्यंतचा कालावधी पूर्ण करून संस्थेपासून अलिप्त होणार असून माझ्या नंतर वारस म्हणून कुठलीही घराणेशाही, सत्ताशाही व कुटुंबातील कोणीही असणार नाही, असे नंदकुमार बेंडाळे यांनी यावेळी जाहीर केले. शिवाय, उच्च विचारसरणीच्या, भारतीय संस्कृतीच्या ऋषितुल्य व्यक्तीने संस्था अध्यक्षपद सक्षमपणे सांभाळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढील काळात खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी आणि गौतम बुद्ध तत्वज्ञान अशा २ व्याख्यानमाला घेणार असल्याचे त्यांनी घोषित केले.
‘आनंदयात्री’ व ‘आठवणींची ह्रद्द पाने’चे प्रकाशन
अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जीवनचरित्रावरील चंद्रकांत भंडारी लिखित ‘आनंदयात्री’ या स्मृतिग्रंथासह ‘आठवणींची ह्रद्द पाने’ या शशिकांत वडोदकर आणि चंद्रकांत भंडारी यांनी संपादित केलेल्या पुस्तकांचा परिचय लेखकांनी करून दिला व त्यानंतर पुस्तकांचे प्रकाशन झाले.
‘श्रीगणपती म्युरल’ निर्मिती करून केसीई संस्थेचे नाव जागतिक पातळीवर पोहोचविल्याबद्दल प्रातिनिधीक स्वरुपता प्राचार्य अविनाश काटे यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. जी.डी.बेंडाळे यांचा कर्मयोग गुण अंगीकारावा - अरुणभाई गुजराथी
अरुणभाई गुजराथी यांनी संस्थेच्या वाटचालीबाबत सदिच्छा व्यक्त करीत विद्यार्थी आणि शिक्षक करीत असलेल्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले. तसेच, अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्याविषयी गौरवोदगार काढत त्यांच्या काही स्मृती जागविल्या. डॉ. जी.डी.बेंडाळे यांचे जीवन प्रेरणादायी असून खान्देशाचे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेत. कर्मयोग हा त्यांचा मोठा गुण सर्वांनी अंगीकारावा व त्यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राजकीय भाषणात मी वरचढ
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला खडसे म्हणाले की, अरुणभाई गुजराथी व मी एकाच व्यासपीठावर असल्यानंतर ते अगोदर बोलले की माझी पंचायत होते. अरुणभाई, राजकीय भाषणात मी तुमच्यापेक्षा वरचढ आहे, मात्र साहित्य, सामाजिक क्षेत्राचा विषय आला तर तुमचे शब्द उच्च असतात त्यामुळे माझी नंतर पंचायत होते, असे खडसे म्हणताच हशा पिकला. या वेळी त्यांनी डॉ. जी.डी. बेंडाळे यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचा उल्लेखही केला. अण्णासाहेबांनी १९८४मध्येच लेवा पाटील समाजातील अनिष्ट चालीरीती बंद करण्यासाठी पुढाकार घेतला व समाजाला बळ देण्याचे काम केल्याचेही खडसे म्हणाले.
स्वायत्तेसाठी सहकार्य करणार
कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी केसीई संस्थेचे कौतुक करीत खान्देशाच्या नव्हे तर देशाच्या शैक्षणिक विकासात महत्त्वाचे योगदान दिल्याचे सांगत स्वायत्ततेसाठी सहकार्य करणार असल्याची ग्वाही देत स्वायत्ततेनंतर विकासाची अधिक गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कुलगुरुंकडे दिला स्वायत्ततेचा प्रस्ताव
मू.जे.महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान करावी असा प्रस्ताव प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध
गायक राहुल देशपांडे यांनी सुगम संगीत, शास्त्रीय गायन आणि सुश्राव्य भक्ती गीते सादर केली. यामध्ये त्यांनी ‘बेसूल बन फूल...’, लागी कलेजवा कट्यार या विविध गीते सादर केली. तसेच रसिकांची फर्माईशही पूर्ण केली.
यावेळी खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी प्राचार्य अनिल राव, जीवन झोपे, केसीई संस्थेचे सदस्य, संचालक, समन्वयक, डॉ.बेंडाळे यांच्या परिवारातील सदस्य, विविध शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.भाग्यश्री भलवतकर यांनी केले तर आयएमआर संस्थेच्या संचालिका डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी आभार मानले.

Web Title: KCI did not get medical college due to some political tendencies - Eknathrao Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.