जळगावात अग्नितांडव : २० कुटुंबांच्या संसाराची क्षणात राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:43 PM2018-09-12T12:43:10+5:302018-09-12T12:44:27+5:30

७ अग्निशमन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात

Jalgaon Agni Mandov: In the moment of family life of 20 families, Jharkhandoli | जळगावात अग्नितांडव : २० कुटुंबांच्या संसाराची क्षणात राखरांगोळी

जळगावात अग्नितांडव : २० कुटुंबांच्या संसाराची क्षणात राखरांगोळी

Next
ठळक मुद्दे सिलिंडरचाही स्फोटजिवीतहानी टळली

जळगाव : राष्टÑीय महामार्गावरील इच्छादेवी मंदिरामागील फुकटपुरा भागात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता अचानक भीषण आग लागली़ आगीने रौद्ररूप धारण केल्याने एका पाठोपाठ २० घरे जळून खाक झाली़ याचवेळी एका सिलिंडरचा स्फोट झाल्याने हाहाकार उडाला़ जीव वाचविण्यासाठी नागरिक पळत सुटले़ सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र वित्तहानी प्रचंड झाली. २० घरांमधील दागिने, मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे, धान्य तसेच संसारपयोगी साहित्य व महत्वाची कागदपत्रे जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले़ तब्बल एक तासानंतर ७ अग्निशमन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले़ डोळ्यादेखत २० कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याने कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र घरांवरुन गेलेल्या वीज तारांच्या शार्टसर्कीटमुळे घरावर ठिणगी पडली व आग लागल्याचा प्राथमिक अंदाज रहिवाशांनी वर्तविला आहे.
जीवाची पर्वा न करता तांबापुरा, फुकटपुरा व परिसरातील रहिवाशांनी मिळेल त्या साहित्याद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अनेकांचा संसार आगीपासून वाचला व अनर्थ टळला.
अशी घडली घटना
ईच्छादेवी मंदिरामागील परिसरात फुकटपुरा हा भाग आहे़ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग वास्तव्य करतो. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता गौतम सोनू सुरवाडे यांच्या घराला मागील बाजूने अचानक आग लागली़ घराच्या समोर त्यांच्या पत्नी उज्वला सुरवाडे काही महिलांसह बसलेल्या होत्या़ त्यामुळे घरात कुणीही नव्हते़ घरातून धूर निघत असताना दिसला. हा प्रकार उज्वला यांना महिलांनी सांगितले़ धूर कोठून निघत आहे हे पाहण्यासाठी उज्वला या घरात जाताच त्यांना प्रचंड आग लागलेली दिसून आली़ आरडा-ओरड करताच नागरिकांनी धाव घेतली़ काही मिनिटातच आगीने रौद्ररूप धारण केले़ यामुळे घरातील सिलिंडरचा स्फोट झाला़ अन् सुरूवाडे यांच्या घराला लागून असलेल्या इतर घरांना आग लागली.
जीवाची पर्वा न करता विझविली आग
आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर परिसरातील नागरिक मदत कार्यासाठी सरसावले होते. हातात सापडेल ते भांडे घेऊन नागरिक आग विझवण्याचा तसेच आगीतून साहित्य वाचवण्याचा प्रयत्न करत होते. सर्व घरे एकमेकांना जोडून असल्याने आगीचा भडका वाढतच होता. तर घरांवरील पत्रे काढत असताना तरूणांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या. त्याची पर्वा न करता आग विझविण्यात आली.
बंबांना अडचणी
आग लागलेली घरे ही अरुंद गल्लयांमध्ये असल्याने त्या ठिकाणापर्यंत महापालिकेच्या अग्निशमन दलाचे व जैन इरिगेशनचे बंब जाण्यास अडचणी येत होत्या. एका कंपाउंडच्या मागे बंब उभे करून पाण्याचा मारा करण्यात आला़
शेळी जळाली
एका शेळीचा भाजून मृत्यू झाला. मात्र, इतर कुठलीही जीवीत हानी झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली़ या घटनेमुळे फुकटपुरा भागात प्रचंड गर्दी झालेली होती़ सोबतच जैन इरिगेशनचे चंद्रकांत नाईक देखील ४ अग्निशमन बंबांसह घटनास्थळी दाखल झाले होते़
वाहतूक विस्कळीत
या घटनेमुळेमहामार्गावर प्रचंड जमाव जमला होता़ त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती़
तासाभरानंतर आग आटोक्यात
रात्री ८ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले़ याबाबत गौतम सुरवाडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन आगीची नोंद करण्यात आली आहे़
नागरिकांना दिला धीर
घटनास्थळी राष्टÑवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, नगरसेवक सुनील महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह अशोक लाडवंजारी, अनिल अडकमोल, मिलिंद सोनवणे या लोकप्रतिनिधींनी भेट देऊन नागरिकांना धीर दिला.
पोलिसांची तत्परता
जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्यासह सहाही पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक व कर्मचारी घटनास्थळावर काही मिनीटात दाखल झाले़ दत्तात्रय शिंदे यांनी आगग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
कुणाचे लग्नाचे दागिने जळाले तर कुणाचे औषधीचे पैसे
अग्नितांडवात मुलीच्या लग्नासाठीचे दागिने, पैसे, प्लॉटच्या व्यवहाराचे पैसे, औषधी, मुलाच्या पोलिस भरतीची कागदपत्रे, संसारोपायोगी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे महिलांना धक्का बसला़ शबाना आरीफ हिचे चार महिन्यापूर्वीच लग्न झाले होते़ घरातील साहित्यासह लग्नात मिळालेले संपूर्ण साहित्य, दागिने आगीत जळून भस्म झाल्यामुळे त्यांना धक्का बसला़
आशाबाई रमेश गोपाळ यांनी मुलगी किरण हिच्या लग्नासाठी पै-पै जमवून दागिने व काही संसारपयोगी साहित्य जमवले होेते. ते या आगीत जळाल्याने त्यांना जबर धक्का बसला. आगीत घरातील काहीच उरल्यामुळे गोपाळ कुटूंबीय आक्रोश करीत होते़
विजया लक्ष्मण बोदडे, इरफान इब्राहीम तडवी, नजमा सलीम शेख, निर्मला भरत मोती यांच्यासह सात ते आठ जणांनी मोलमजुरी करून खरेदी केलेल टीव्ही, फ्रीज, कपाट, कपडे आदी साहित्य खाक झाले. मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची बघितलेली स्वप्नेही धुळीस मिळाली. मोठ्या कष्टाने उभा केलेला त्यांचा संसार मोडून पडला आहे.
डोळ्यासमोर संसार खाक
आगीत संसार जळून खाक होत असल्याचे भयावह चित्र पाहून महिला आक्रोश करीत होत्या. गर्दी झाल्यामुळे पोलीस जमावाला पांगवत होते. आगीमुळे आजूबाजूच्या घरांमधील ३० ते ४० सिलिंडर घराबाहेर काढून इतरत्र हलविण्यात आले. काहींनी तर चक्क नाल्यांमध्ये सिलिंडर फेकले. तर कुणी महामार्गावर सिलिंडर घेऊन पळत सुटले़
जीव मुठीत धरून नागरिक पळाले
सुरवाडे यांच्या घराच्या बाजूलाच असलेली घरे पार्टिशनची असल्याने आगीने तीव्र भडका घेतला. एक एक करता-करता २० घरे आगीत भस्मसात झाली़ नागरिक घरांची पत्रे काढून साहित्य आगीतून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. अक्षरश: आगीचे प्रचंड लोळ उठत होते. जीव वाचविण्यासाठी परिसरातील नागरिक पळत होते़
शॉर्टसर्किटमुळे लागली आग
गौतम सुरवाडे यांच्या घरावरुन विद्युत तारा गेलेल्या आहेत़ शार्टसर्कीटमुळे आग लागली असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे़ आगीमुळे घटनास्थळा जवळील वायर्स जळून खाक झाल्या. महावितरणकडून वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. दरम्यान आग विझल्यानंतर त्या राखेत नागरिक बराचवेळ वस्तू शोधत होते. हे चित्र पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.
या कुटुंबीयांची जळाली घरे
आगीत गौतम सुरवाडे, शबाना आरीफ, आशाबाई रमेश गोपाळ, विजया लक्ष्मण बोदडे, इरफान इब्राहीम तडवी, नजमा सलीम शेख, निर्मला मोती यांच्यासोबत आणखी १३ कुटुंबीयांची घरे जळून खाक झाली़

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र माझ्याकडे आलेल्या अहवालानुसार ७ घरे जळून खाक झाली आहेत. फायर आॅडीट झाल्यावर आगीचे कारण समजू शकेल. आगग्रस्तांना मदत दिली जाईल.
-किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी.

Web Title: Jalgaon Agni Mandov: In the moment of family life of 20 families, Jharkhandoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.