पटले कुटुंबाची किमया, ओसाड डोंगरात फुलवली फळबाग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 09:39 AM2019-01-16T09:39:56+5:302019-01-16T10:00:11+5:30

डोंगरावरील नैसर्गिक झऱ्यात एक हजार ७०० फूट लांब नळी टाकून या पाण्यातून वनपट्ट्यात आंबे, पेरू, सिताफळ या फळबागा फुलविण्याची किमया सातपुड्यातील आदिवासी पटले कुटुंबाने केली आहे.

farmer Patale agriculture jalgaon positive story | पटले कुटुंबाची किमया, ओसाड डोंगरात फुलवली फळबाग

पटले कुटुंबाची किमया, ओसाड डोंगरात फुलवली फळबाग

ठळक मुद्देडोंगरावरील नैसर्गिक झऱ्यात एक हजार ७०० फूट लांब नळी टाकून या पाण्यातून वनपट्ट्यात आंबे, पेरू, सिताफळ या फळबागा फुलविण्याची किमया सातपुड्यातील आदिवासी पटले कुटुंबाने केली.अथक परिश्रमातून ओसाड डोंगरात हिरवं नंदनवनच फुलल्याचे चित्र आहे.उंच डोंगरातील त्यांचे पाणी व्यवस्थापन खरोखरच कौतुकास्पद आहे.

वसंत मराठे

तळोदा : डोंगरावरील नैसर्गिक झऱ्यात एक हजार ७०० फूट लांब नळी टाकून या पाण्यातून वनपट्ट्यात आंबे, पेरू, सिताफळ या फळबागा फुलविण्याची किमया सातपुड्यातील आदिवासी पटले कुटुंबाने केली आहे. त्यांच्या अथक परिश्रमातून ओसाड डोंगरात हिरवं नंदनवनच फुलल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे उंच डोंगरातील त्यांचे पाणी व्यवस्थापन खरोखरच कौतुकास्पद आहे.

सातपुड्यातील कुंभरी हे ३०० लोकवस्ती असलेल छोटसं गाव. वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे शासनाकडून मिळालेल्या वनपट्ट्यावर ग्रामस्थांचा उदरनिर्वाह करावा लागतो. गावातील १०० जणांना शासनाकडून सामूहिक वनपट्टे देण्यात आले आहेत. डोंगरावरील मिळालेल्या सामूहिक वनपट्ट्यात लावण्यासाठी गेल्या वर्षी जून महिन्यात जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते साधारण दीड ते दोन हजार आंबा, पेरू, सिताफळ, बोर, महू, साग अशी रोपे मिळाली होती. ही सगळी रोपे राजा बोरखा पटले, सोमा बोरखा पटले या बंधूंनीदेखील आपल्याला मिळालेल्या वनपट्ट्यात लावली. तथापि, ही रोपे जगविण्यासाठी त्यांच्यापुढे पाण्याचा यक्ष प्रश्न होता. कारण मिळालेला वनपट्टादेखील उंच टेकडीवरच आहे. त्यामुळे साहजिकच पाणी पोहचणे अशक्य होते. मात्र त्यांच्यातील मेहनत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी त्यांच्या शेतापासून एक हजार ७०० फूट लांब उंचीवरील नैसर्गिक झऱ्याचे पाणी आणण्याची युक्ती लढविली. या झऱ्याच्या ठिकाणी मोठी विहीर खोदून तेथून तेवढ्याच लांबीची नळी टाकून या नळीद्वारे दररोज झाडांना पाणी घालत आहेत. जवळपास दीड वर्षांची ही फळबाग झाली आहे. आंबे २५०, पेरू २३०, बोर २५०, सिताफळ २५० या फळ पिकांबरोबरच महू १५०, साग १०० व साग २५० अशी साधारण दीड-दोन हजार झाडे जगविली आहेत. त्यामुळे ओसाड रानावर हिरवे नंदनवन फुलविण्याची किमया या पटले बंधूंनी केली आहे. विशेष म्हणजे पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापनातून आपल्या वनपट्ट्यात मेथी, टमाटर, वांगे, मिरची व वालपापडी या सारखी भाजी पाल्याची आंतरपिकेदेखील ते घेत आहेत. त्याच्या विक्रीतून ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. सातपुड्यातील झऱ्याच्या पाणी व्यवस्थापनासाठी त्यांना साधारण २५ हजार रुपये खर्च आल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. या पैशातून २० फुटाचे ९० पाईप लागल्याचे ते म्हणाले. छोट्याशा पाण्याच्या स्त्रोतात एकही थेंब वाया न जावू देता प्रत्येक झाडाला आपल्या अथक प्रयत्नातून पाणी पुरवित असल्याचेही सेगा पटले सांगतात.

पर्यावरण बचावाच्या नावाखाली वर्षानुवर्षे दऱ्याखोऱ्यात, जंगलात राबणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा दर्जा नाकारला जात असताना पटले बंधूंनी आपल्या कौशल्यातून ओसाड, खडकाळ टेकडीवर फळबाग लावून हिरवे नंदनवन फुलविण्याची किमया साधली आहे. एकीकडे वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी वनविभाग करोडो रुपये खर्च करूनही सातपुडा अजून हरित झाला नसल्याचे चित्र आहे. मात्र कुंभरीकरांनी कमी खर्चात आपला परिसर हरित करून दाखविला. त्यामुळे या गावकºयांचे परिसरात कौतुक केले जात आहे.

शासनाकडून मिळालेल्या अडीच हेक्टर वनपट्ट्यात पारंपरिक शेती न करता फळबाग घेण्याचा निर्णय घेतला होता. गेल्यावर्षी लोकसमन्वय प्रतिष्ठानकडून आंबे, पेरू, सिताफळ, बोर अशी रोपे मिळाली होती. या रोपांबरोबरच साग, महू रोपेही लावलीत. परंतु पाण्याचाही प्रश्न होता. परंतु शेतापासून लांब असलेल्या नैसर्गिक झऱ्याचा विचार आला. तेथे लहान विहीर खोदली. या विहिरीतून साधारण एक हजार ७०० फुट लहान लाईप टाकून फळबागेस पाणी देत आहोत. या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून भाजीपालादेखील घेत आहोत. पाण्याच्या या व्यवस्थापनेतून फळबागही फुलली आहे.

- सेगा राज्या पटले, शेतकरी, कुंभरी, ता.धडगाव

Web Title: farmer Patale agriculture jalgaon positive story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.