भाजपाची उमेदवारी मिळाली आता एकीसाठी होणार कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:22 AM2019-03-24T11:22:38+5:302019-03-24T11:23:23+5:30

स्मिता वाघ यांच्यापुढे आव्हान

BJP has got the candidature for the same | भाजपाची उमेदवारी मिळाली आता एकीसाठी होणार कसरत

भाजपाची उमेदवारी मिळाली आता एकीसाठी होणार कसरत

Next
ठळक मुद्दे ‘भाऊंशी दुरावा’; ‘संकटमोचक’ नाराज

चंद्रशेखर जोशी।
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाची उमेदवारी कुणाला? याचीे उत्सुकता शिगेला पाहोचली असताना पक्षनेतृत्वाने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करून पक्षातील बड्या नेत्यांना धक्का दिला. उमेदवारी मिळाली आता मात्र पक्षांतर्गत दुरावा दूर करून ‘संकटमोचकां’चीही मदतीसाठी आरती ओवाळावी लागणार आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात २००९ व त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा ए.टी. पाटील यांनी बाजी मारली. २०१४ मध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी होती. शिवसेनेने बंड पुकारल्याची स्थिती होती. मात्र ए.टी. पाटील ‘मोदी’ लाटेने तरले. केवळ तरलेच नाही तर राज्यात सर्वाधिक मते मिळविण्यात ते दुसऱ्या स्थानी होते.
उमेदवारीसाठी सर्वाचीच कसरत
या मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून चार जणांमध्ये स्पर्धा होती. यात खासदार ए.टी. पाटील, आमदार स्मिता वाघ, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार व बांधकाम क्षेत्रातील तांत्रिक सल्लागार व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती प्रकाश पाटील यांचा समावेश होता.
सरळ दोन गट
या मतदार संघातील उमेदवारीसाठी सरळ दोन गट दिसून आले. ते म्हणजे स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे स्वत: अनुकुल होते.
मात्र जबाबदारी माझ्यावर टाकता मग उमेदवारी मी सांगेल त्यालाच द्या असे सांगत गिरीश महाजन यांनी प्रकाश पाटील यांचे नाव लावून धरले होते. थेट दिल्लीपर्यंत त्यांनी प्रयत्नही केले. मात्र यावेळी त्यांना अपयशच आले. याची काहीशी नाराजी महाजन यांची असल्याचेच त्यांच्या काही कृतीतून दिसून आले.
का मिळाली उमेदवारी ?
स्मिता वाघ यांना उमेदवारीच्या काही ठळक बाबी आहेत. त्यात त्यांचे संघटनात्मक योगदान निश्चितच पक्षाच्याही नजरेत भरेल असेच आहे. विद्यार्थी दशेपासून त्या विद्यार्थी परिषद आंदोलनांमध्ये वेळोवेळी सहभागी झाल्या आहेत. महिला जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्षा, प्रदेश चिटणीस, महिला प्रदेशाध्यक्षा अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. याबरोबरच संघ परिवाराशी असलेली जवळीक व सोपविण्यात आलेल्या जबाबदारीला न्याय देण्यात त्या यशस्वी ठरल्या. ही बाब लक्षात घेऊनच पक्षाने त्यांना संधी दिली हे नाकारून चालणार नाही.
या बाबी ठरू शकतात त्रासदायक
स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत. पत्नीला उमेदवारी मिळवून देण्यात त्यांनी बाजी मारली हे कोणीही नाकारू शकणार नाही. थेट महाजनांची ‘महाजनकी’ देखील कामी येऊ शकलेली नाही. पूर्वी ते खडसे समर्थक म्हणून परिचित होते. आता माजी मंत्री एकनाथराव खडसे त्यांच्यावर नाराज आहेत. आता महाजनांशीही काहीसे ताणले गेले हे गेल्या काही दिवसातील घटनांवरून समोर येत आहे. त्यातच जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना अनेक जण दुखावलेही आहेत. वाद टाळण्यासाठी त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वेळोवेळी भेटी घेतल्या त्याचप्रमाणे ‘मुक्ताईनगर’ वारी करून दोघांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली आता पक्षांतर्गत एकी साधण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
तीन महिला उमेदवार... दुसरी बाब म्हणजे ए.टी. पाटील यांच्या कथित वादाच्या मुद्यावर विरोधकांनी भांडवल करू नये खान्देशातील चार पैकी तीन लोकसभा मतदार संघात भाजपाने महिला उमेदवारांना संधी दिली आहे. यात नंदुरबारमधून डॉ. हीना गावीत, जळगावातून आमदार स्मिता वाघ व रावेरमधून खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

Web Title: BJP has got the candidature for the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.