जालन्यात 'नकोशी'ला झुडपात टाकून माता फरार; मागील १५ महिन्यात आढळले १२ अर्भक

By विजय मुंडे  | Published: April 5, 2024 05:01 PM2024-04-05T17:01:28+5:302024-04-05T17:02:36+5:30

या प्रकरणात अज्ञात पालकांविरूद्ध कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mother absconding after leaving 'Nakoshi' girl child in the bushes in Jalna; 12 infants found in last 15 months | जालन्यात 'नकोशी'ला झुडपात टाकून माता फरार; मागील १५ महिन्यात आढळले १२ अर्भक

जालन्यात 'नकोशी'ला झुडपात टाकून माता फरार; मागील १५ महिन्यात आढळले १२ अर्भक

जालना : एका पाच दिवसांच्या स्त्री जातीच्या अर्भकाला झुडपात टाकून एक माता फरार झाली. ही घटना बुधवारी ३ एप्रिल रोजी दुपारी ४:५० वाजण्याच्या सुमारास समोर आली असून, त्या अर्भकावर जिल्हा स्त्री रूग्णालयात उपचार केले जात आहेत. या प्रकरणात अज्ञात पालकांविरूद्ध कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना शहरातील रेल्वे स्टेशन भागातील श्रीराम मंदिर परिसरातील झुडपात बुधवारी दुपारी एक बाळ रडत असल्याचा आवाज नागरिकांना आला. नागरिकांनी पाहिले असता एक स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. त्यानंतर तात्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कदीम पोलिस ठाण्याचे पोहकॉ. आशपाक दादामिया शहा, बीट अंमलदार पोना. पिराणे, चाईल्ड लाईनचे संतोष दाभाडे व इतरांनी नागरिकांच्या मदतीने त्या बालिकेला जिल्हा स्त्री रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या बाळाच्या पायावर व शरिरावर जखमा होत्या. शिवाय प्रकृती अत्यावस्थ असल्याने अतिदक्षता विभागात ठेवून उपचार करण्यात आले. त्या बालिकेला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. या प्रकरणात पोहेकॉ. आशपाक शहा यांच्या तक्रारीवरून कदीम पोलिस ठाण्यात अज्ञात पालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ महिन्यात आढळले १२ अर्भक
मागील १५ महिन्यात जिल्ह्यात १२ अर्भकं रस्त्यावर फेकून दिल्याचे समोर आले आहे. मागील वर्षभरात ८ तर चालू वर्षात ४ अर्भकं आढळली आहेत. त्यात स्त्री जातीचे ७ तर पुरूष जातीचे ५ अर्भक आढळले आहेत. संबंधित प्रकरणात गुन्हेही दाखल झाले आहेत.

मागील १५ महिन्यात १२ अर्भक आढळले आहेत. त्या बालकांवर उपचार करून पुढील काळजी संरक्षणासाठी छत्रपती संभाजी नगर येथील शिशुगृहात दाखल गेले आहे. कोठे अर्भक आढळून आले तर नागरिकांनी बाल कल्याण समितीकडे संपर्क करावे.
- एकनाथ राऊत, अध्यक्षबालकल्याण समिती जालना

Web Title: mother absconding after leaving 'Nakoshi' girl child in the bushes in Jalna; 12 infants found in last 15 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.