कार्यालयीन कामावर हजर राहताना अनेकांची त्रेधातिरपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:21 AM2020-03-04T00:21:31+5:302020-03-04T00:21:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जालना जिल्हा हा अप-डाऊन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातच सलग ...

Many people suffer while attending office work | कार्यालयीन कामावर हजर राहताना अनेकांची त्रेधातिरपीट

कार्यालयीन कामावर हजर राहताना अनेकांची त्रेधातिरपीट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्हा हा अप-डाऊन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातच सलग तीन सुट्या लागून आल्या. त्यामुळे चौथ्या दिवशी कार्यालयीन कामावर हजर राहताना अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा लागू झाला आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९.४५ तर कार्यालय सोडण्याची वेळ ही ६.१५ मिनिटे ही निश्चित करण्यात आली आहे. असे असताना मंगळवारी जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये लोकमतच्या चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अधिकारी, कर्मचा-यांचे उशिरा येण्याचे प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ९.३० वाजताच आमचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी अनेकजण पावणेदहाची वेळ साधण्यासाठी लगबगीने कार्यालयात येताना दिसले. खुद्द जिल्हाधिकारी हे ९.४५ मिनिटाला कार्यालयात पोहोचले. त्यांच्या आधी अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा सहकार निबंधक चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, एनआयसीचे प्रमुख रवींद्र पडूळकर, उपजिल्हाधिकारी दीपाली मोतियाळे यांच्यासह जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक गिरी, खेडेकर हे देखील कार्यालयात वेळेच्या आत पोहोचले होते.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कार्यालयात येताच बरोबर दहा वाजता विविध विभागांना भेटी दिल्या. त्यात पाणी टंचाई विभाग, नैसर्गिक आपत्ती विभागात कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले तर भूमी अधीक्षक कार्यालयात तुरळक कर्मचारी उपस्थित होते. या विभागाची रेकॉर्डरूम देखील बंद होती. दरम्यान नगर रचना विभागात जिल्हाधिकाºयांनी भेट दिली असती सेवकाव्यतिरिक्त एकही अधिकारी आणि कर्मचारी हजर नव्हता. याची गंभीर दखल जिल्हाधिकाºयांनी घेतली आहे. जालना तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील अस्वच्छतेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करून तातडीने सर्व विभाग स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. एवढ्या अस्वच्छतेमध्ये तुम्ही काम कसे करता, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान मुद्रांक शुल्क विभागात निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी भेट दिली असता ११ पैकी ५ कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले. अनेकांनी दिलेल्या रजा मंजूर नव्हत्या. परंतु हजेरी पत्रकात ठेवलेल्या दिसून आले. मुद्रांक विभागातही अनेक जण गैरहजर होते.
बहुतांश कर्मचारी वेळेआधी...अधिकारी मात्र ‘लेट’
जालना : मंगळवारी सकाळी ९.३० वाजता जिल्हा परिषदेच्या गेटमधून अनेक कर्मचारी येत होते. जवळपास ९.४० पर्यंत बहुतांश कर्मचारी हजर होते. ९.३० ला सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे आले. पुशसंवर्धन विकास अधिकारी गुंठे ९.३५ वाजता आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर ९.४५ ला कार्यालयात दाखल झाल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना उशीर झाला. वित्त विभागाचे वित्त अधिकारी उत्तम चव्हाण ९.५० वाजता हजर होते. वित्त विभागात ४८ पैकी ३० कर्मचारी उपस्थित होते. १० वाजता सर्व विभागांचा आढावा घेतला असता, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगळे कार्यालयात नव्हते. या पंचायत विभागात ६ कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ हे कार्यालयात हजर होते. प्राथमिक शिक्षण विभागात १६ कर्मचारी उपस्थित होते. समाज कल्याण विभागात १३ पैकी ६, पशुसंवर्धन ८ पैकी ८, सामान्य प्रशासन विभागात १९, बांधकाम १२, पाणीपुरवठा १२, लघु पाटबंधारे विभागात १२ पैकी ७, महिला व बालकल्याण विभागात ८ असे अनेक विभागामध्ये कर्मचारी गैरहजर होते.
हे अधिकारी आले विलंबाने
पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगळे, लघुपाट बंधारे विभागाचे एक्तपुरे, पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डाखुरे, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, कृषी अधिकारी रनदिवे हे अधिकारी विलंबाने आल्याचे आढळून आले.
बांधकाम विभागात केवळ १२ कर्मचारी
जालना जिल्हा परिषदेचा अत्यंत महत्वाचा असलेल्या बांधकाम विभागात ३८ पैकी केवळ १२ कर्मचारी उपस्थित होते. या विभागाचा अतिरिक्त कारभार पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाखुरे यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डाखुरेच विलंबाने आल्याचे दिसून आले.
प्रशासन म्हणतंय २६ कर्मचा-यांना उशीर
जालना जिल्हा परिषदेत ३३१ कर्मचारी कार्यरत आहे. मंगळवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी सर्व कर्मचाºयांची उपस्थिती पाहिली. यात ३३१ पैकी ३०५ जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. केवळ २६ कर्मचारी गैरहजर असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यात वित्त विभागाचे ३, कृषी २, बांधकाम ११, शिक्षण २, आरोग्य २, माध्यमिकचे ३ कर्मचारी उशीरा आले होते.

Web Title: Many people suffer while attending office work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.