जालन्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:36 AM2019-03-14T00:36:47+5:302019-03-14T00:37:00+5:30

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आत वेगात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत

Congress leader from Jalna at Mumbai | जालन्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून

जालन्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आत वेगात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. गुरूवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील काँग्रेसचे हे सर्व नेते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
जालना लोकसभा मतदारसंघ हा आघाडीच्या धर्मात काँग्रेसला सुटलेला आहे. त्यातच १९९६ नंतर येथे काँग्रेस उमेदवाराला भाजपच्या विरोधात पराभवच पत्करावा लागला. यावेळी मात्र काँग्रेसला पोषक वातावरण असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. मध्यंतरी शिवसेनेचा बडा नेता काँग्रेसमध्ये येणार म्हणून जोरदार चर्चा होती, परंतु त्या चर्चेला आता जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसने उमेदवारी संदर्भात चाचपणी सुरू केली असून, आ. कल्याण काळे यांचे नाव आघाडीवर आहे.
असे असले तरी जालन्यातील नेते जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेस समितीचे केंद्रीय सदस्य तथा माजी सभापती भीमराव डोंगरे, माजी आ. कैलास गोरंट्याल, शहराध्यक्ष शेख महेमूद, प्रभारी मनोज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य कल्याण दळे आदी नेते मुंबईत तळ ठोकून आहेत.
आ. कल्याण काळे यांनी २००९ मध्ये खा. रावसाहेब दानवे यांना जबरदस्त टक्कर देत त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. काळे यांचा पराभव हा केवळ साडे आठ हजार मतांनी झाला होता. त्यामुळे त्यांच्या नावाला सर्वमान्यता असल्याचे बोललले जात आहे.
मात्र कल्याण काळे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. परंतु जर काँग्रेस हाय कमांडने सांगितल्यावर त्यांना मैदानात उतरावेच लागेल असे सांगण्यात येते. जर कल्याण काळे यांनी नकार दिल्यास पर्याय म्हणून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य तथा माजी सभापती भीमराव डोंगरे यांना उमेदवारी देण्याची मागणी जालन्यातील हे नेते प्रदेशाध्यक्ष चव्हाणांकडे करणार असल्याचे सांगण्यात आले.
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच माजी आ. अरविंद चव्हाण यांनी प्रवेश केला आहे. तर काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले अंबडचे माजी आ. अ‍ॅड. विलास खरात हे पुन्हा घर वापसीच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा असून, काँग्रेसकडून थेट खासदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी त्यांनी लॉबिंग सुरू केल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Congress leader from Jalna at Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.