रोहिंग्यांना परत घेण्यास म्यानमारची अजून पूर्ण तयारी नाही- रेडक्रॉस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 12:48 PM2018-07-02T12:48:51+5:302018-07-02T12:57:04+5:30

बांगलादेशातील 7 लाख रोहिंग्यांना परत घेण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगत म्यानमारने रोहिंग्यांच्या आगमनासाठी दोन केंद्रे तयार केली आहेत. या जागा रखाइन प्रांताच्या सीमेवर आहेत.

RED CROSS CHIEF SAYS MYANMAR NOT READY FOR ROHINGYA RETURNS | रोहिंग्यांना परत घेण्यास म्यानमारची अजून पूर्ण तयारी नाही- रेडक्रॉस

रोहिंग्यांना परत घेण्यास म्यानमारची अजून पूर्ण तयारी नाही- रेडक्रॉस

Next

चाकमरुल निर्वासित छावणी, बांगलादेश- गेल्या वर्षी लष्करी कारवाईला कंटाळून बांगालदेशात पळालेल्या रोहिंग्यांना परत सामावून घेण्यासाठी म्यानमारची अजून पूर्ण तयारी झालेली दिसत नाही असे मत रेडक्रॉसच्या अध्यक्षांनी व्यक्त केले आहे. रोहिंग्यांच्या परतीसाठी सुरु होणार असलेल्या मोहिमेच्या आधी रेडक्रॉसचे अध्यक्ष पीटर मॉरर यांनी म्यानमारच्या रखाइन प्रांताला भेट दिली. त्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे.




बांगलादेशातील 7 लाख रोहिंग्यांना परत घेण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगत म्यानमारने रोहिंग्यांच्या आगमनासाठी दोन केंद्रे तयार केली आहेत. या जागा रखाइन प्रांताच्या सीमेवर आहेत. मात्र पीटर मॉरर यांनी अजूनही म्यानमारतर्फे योग्य तयारी झालेली नाही असे निरीक्षण नोंदवले आहे.




रोहिंग्यांचे माघारी येणे प्रत्यक्षात येण्यासाठी अजून भरपूर काम होणे अपेक्षित आहे. त्यांना आश्रय देण्यासाठी योग्य इमारतींचे बांधकाम व्हायला हवे असे मॉरर यांमी सांगितले. मॉरर यांनी बांगलादेशातील रोहिंग्या छावण्यांना भेट दिली तसेच म्यानमारमधील ओस पडलेल्या खेड्यांच्या स्थितीचीही पाहणी केली. रेड क्रॉसने आजवर रोहिंग्यांना सर्वाधीक मदत पुरवली आहे. रेडक्रॉसच्या रखाइन प्रांतातील कार्याला गती यावी यासाठी आपण म्यानमार सरकार्चाय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेटलो असेही पीटर मॉरर यांनी सांगितले.

म्यानमारमधील हिंदूंवरही छावणीत राहण्याची वेळ
रखाइन प्रांतामध्ये रोहिंग्यांबरोबर हिंदू कुटुंबेही राहात होती. त्यांना रोहिंग्या हिंदू असे संबोधले जाते. मुस्लीम रोहिंग्यांबरोबर या हिंदूंनाही जीव मूठीत धरुन बांगलादेशात यावे लागले. सध्या बांगलादेशातील कॉक्स बझारच्या जगातील सर्वात मोठ्या निर्वासीत छावणीमध्ये 101 हिंदू कुटुंबे राहात आहे. लष्करी कारवाईमुळे त्यांची मोठी फरपट झालेली आहे. कॉक्स बझारमधील मोठ्या छावणीच्या बाहेर हिंदू कुटुंबांना ठेवण्यात आले आहे. कॉक्स बझारमधील या छावणीमध्ये 11 लाख लोक राहात असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी 26 ऑगस्ट रोजी म्यानमारमध्ये लष्कराने रोहिंग्यांवर कारवाई सुरु केली. या कारवाईमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले तसेच लष्कराकडून महिलांवर बलात्कार होण्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे रोहिंग्यांबरोबर हिंदूही पळून गेले. बांगलादेशातील छावणीत हिंदूंच्या वसाहतीजवळ सतत पोलीस पहारा ठेवण्यात आलेला आहे. रंगीत साड्या नेसलेल्या तसेच बांगड्या व कुंकू लावलेल्या महिलांमुळे यांचा परिसर इतर छावणीपेक्षा वेगळा दिसून येतो. तसेच बांबू आणि ताडपत्री वापरून येथे राधाकृष्णाचे एक साधे मंदिरही या लोकांनी तेथे उभे केले आहे. जर छावणीमध्ये काही गोंधळ निर्माण झाला तर या कुटुंबा संरक्षण देणे अवघड होईल म्हणून बांगलादेश सरकारने या कुटुंबांना छावणीच्या बाहेरच ठेवलेले आहे.

Web Title: RED CROSS CHIEF SAYS MYANMAR NOT READY FOR ROHINGYA RETURNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.