ठळक मुद्देपंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर या दुसऱ्या कार्यकाळामध्ये सुरुवातीपासूनच आरोप आणि टिकेचा भडिमार होत आहे. त्यांच्या सरकारने ब्रेक्झिट बाबत घेतलेली संदिग्ध भूमिका नेहमीच वादात राहिली आहे.प्रीती पटेल या मूळच्या भारतीय वंशाच्या असून त्यांचा जन्म 29 मार्च 1972 साली इंग्लंडमध्ये झाला

लंडन- इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री प्रीती पटेल यांना निलंबित करण्याची तयारी सुरु केली आहे. प्रीती पटेल या सध्या आफ्रिका दौऱ्यावर असून त्यांना तात्काळ माघारी येण्याचे आदेश पंतप्रधान मे यांनी दिले आहेत. इस्रायली नेत्यांशी आणि अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्याचे त्यांनी मान्य केल्यानंतर या घडामोडी लंडनमध्ये घडत आहेत.
प्रीती पटेल यांनी ऑगस्ट महिन्यातील इस्रायलमध्ये झालेल्या बैठकांनंतर पुन्हा 7 सप्टेंबर रोजी इस्रायलचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गिलाड एर्डेन यांची लंडनमध्ये तर परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी युवल रोटेम यांची न्यू यॉर्कमध्ये भेट घेतली असे सांगण्यात येते. इस्रायलच्या बैठकांमध्ये कोणतेही ब्रिटिश अधिकारी उपस्थित नव्हते किंवा पटेल यांनी या बैठकांची योग्य नियमांनुसार कोणतीही माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली नव्हती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासह अनेक इस्रायली नेते, अधिकाऱ्यांशी झालेल्या 12 हून अधिक बैठकांबाबत पटेल यांनी योग्य स्पष्टीकरण न दिल्याबद्दल त्यांना आता आपले पद गमवावे लागणार असे मत इंग्लंडमध्ये विविध माध्यमे व्यक्त करत आहेत. पटेल यांच्या निमित्ताने इंग्लंडमधील विरोधी पक्षांना थेरेसा मे यांच्यावर टीका करण्याची संधी मिळाली आहे. पटेल यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती अाहे. त्यांनी इस्रायली नेत्यांच्या बैठका घेऊन इस्रायलला गोलन हाईटसमध्ये आर्थिक मदत देण्यासाठी बोलणी केली असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर या दुसऱ्या कार्यकाळामध्ये सुरुवातीपासूनच आरोप आणि टिकेचा भडिमार होत आहे. त्यांच्या सरकारने ब्रेक्झिट बाबत घेतलेली संदिग्ध भूमिका नेहमीच वादात राहिली आहे. त्यातच डिफेन्स सेक्रेटरी मायकल फॉलन यांना लैगिंक अत्याचाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला आहे. मायकल यांनी 2 नोव्हेंबर रोजी पद सोडले आता पटेल यांनाही पदावरुन बाजूला करण्यात आले तर एका आठवड्याच्या काळात थेरेसा मे यांना दोन मंत्र्यांना गमवावे लागेल. 
प्रीती पटेल या मूळच्या भारतीय वंशाच्या असून त्यांचा जन्म 29 मार्च 1972 साली इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे आई-वडिल युगांडामधून आशियाई नागरिकांना हाकलण्याच्या इदी अमिन दादाच्या मोहिमेच्या थोडे आधीच इंग्लंडमध्ये येऊन स्थायिक झाले. पटेल यांना सर्वात प्रथम डेव्हिड कॅमेरुन यांनी कॅबिनेटमध्ये संधी दिली तर थेरेसा मे यांनीही त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान कायम ठेवले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.