लाहोर, दि. 13 - ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत फाशी देण्यात आलेल्या महान क्रांतिकारक भगतसिंह यांच्याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. भगतसिंह यांच्यावर ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा आरोप लावण्यात आला होता त्या अधिकाऱ्याची हत्या त्यांनी केली नव्हती, असा दावा पाकिस्तानमधील एका वकिलाने केला आहे. इम्तियाज रशीद कुरेशी असे या पाकिस्तानी वकिलाचे नाव आहे.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकाला न्याय मिळवून देण्यासाठी या वकिलाने पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यांनी यासंदर्भात गेल्या वर्षीही याचिका दाखल केली होती. पण त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झाली नव्हती. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यांत पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांना लाहोर उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने विनंती करीत अ‍ॅड. कुरेशी यांच्या याचिकेवर सुनावणीसाठी खंडपीठातील न्यायाधीशांची संख्या वाढवावी अशी विनंती केली होती.

भारताचे तुकडे होऊ नये यासाठी भगतसिंह लढत होते, असे अ‍ॅड. कुरेशी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. भगतसिंह यांची या आरोपातून सरकारचे पुनरावलोकन आणि सुव्यवस्थेचे सिद्धांत वापरून सुटका करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे. त्याचबरोबर भगतसिंह यांचा देशपातळीवरील पुरस्काराने गौरव करण्यात यावा, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक भगतसिंह यांना 86 वर्षांनंतर न्याय मिळवून देण्यासाठी इम्तियाज रशीद कुरेशी लढा देणार आहेत. यासंदर्भात सोमवारी न्यायालयात त्यांनी नव्याने याचिका दाखल केली आहे. अ‍ॅड. इम्तियाज रशीद कुरेशी सध्या लाहोरमधील भगतसिंह मेमोरिअल फाऊंडेशन चालवतात.