२६/११ हल्ल्यात पाकचाच हात, नवाज शरीफ यांनी प्रथमच दिली जाहीर कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:30 AM2018-05-13T01:30:29+5:302018-05-13T01:30:29+5:30

मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानमध्ये अनिर्बंधपणे सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला

Pakistan's hand for 26/11 attacks, Nawaz Sharif declared for the first time | २६/११ हल्ल्यात पाकचाच हात, नवाज शरीफ यांनी प्रथमच दिली जाहीर कबुली

२६/११ हल्ल्यात पाकचाच हात, नवाज शरीफ यांनी प्रथमच दिली जाहीर कबुली

Next

इस्लामाबाद : मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानमध्ये अनिर्बंधपणे सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला, अशी जाहीर कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी सत्ता गेल्यानंतर प्रथमच दिली आहे. या हल्ल्याच्या संदर्भात पूर्णपणे काखा वर करण्याची पाकिस्तानची अधिकृत भूमिका किती धादांत खोटेपणाची आहे, हेच शरीफ यांच्या कबुलीने स्पष्ट होते.
‘डॉन’ या पाकिस्तानमधील अग्रगण्य वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात शरीफ यांनी ही अप्रत्यक्ष कबुली दिली. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद आणि मौलाना मसूद अझर यांच्या अनुक्रमे जमात-उद-दावा व जैश-ई-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे प्रत्यक्ष नामोल्लेख करता शरीफ म्हणाले, पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हवेतर त्यांना शासनबाह्य कृती करणारे (नॉन स्टेज अ‍ॅक्टर्स) म्हणा. पण अशा मंडळींना सीमा ओलांडून मुंबईला जाऊन १५०हून अधिक लोकांचा बळी घेण्यास मोकळीक दिली जाते हे सर्वस्वी चुकीचे आहे, अस्वीकार्य आहे. शेजारी देशांत जाऊन असा हिंसाचार करणाऱ्यांना पाकिस्तान सरकारचीही छुपी साथ असल्याचे सूचित करत शरीफ यांनी मुंबई हल्ल्याशी संबंधित खटला अद्याप पूर्ण का झाला नाही, असाही सवाल केला. पाकिस्तानच्या या धोरणाचा जगभरात निषेध होत आहे. पाकिस्तान स्वत:च्याच वागण्याने जगात एकाकी पडला आहे. आज जागतिक राजकारणात अफगाणिस्तानवर लोक विश्वास ठेवतात; पण पाकिस्तानवर नाही, असेही ते म्हणाले.
मुंबईवर हल्ला झाला तेव्हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे युसूफ रझा गिलानी पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यानंतर शरीफ सत्तेवर आले; पण भारताविरुद्ध दहशतवादाचा वापर करण्याचे पाकिस्तानचे धोरण कायम राहिले. आताही शरीफ यांच्याच पक्षाकडे पाकिस्तानची सत्ता आहे. परंतु व्यक्तिश: त्यांना कोणत्याही सरकारी पदावर राहण्यास किंवा पक्षाचे अध्यक्ष राहण्यासही अपात्र ठरविले आहे.

न्यायसंस्था आणि लष्कर यांच्या सक्रिय हस्तक्षेपास आक्षेप घेत शरीफ म्हणाले, दोन-तीन समांतर सरकारे काम करणार असतील तर देशाचा कारभार चालू शकत नाही. हे थांबायला हवे. देशात फक्त एकच, राज्यघटनेनुसार स्थापन झालेले सरकार असू शकते.

Web Title: Pakistan's hand for 26/11 attacks, Nawaz Sharif declared for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.