'ऑक्सफर्ड'च्या विद्यानगरीत रंगला OMPEG चा तृतीय वर्धापनदिन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 03:29 PM2019-05-09T15:29:41+5:302019-05-09T15:45:18+5:30

ऑक्सफर्ड या विद्यानगरीमध्ये शनिवारी UK मधील महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजक समूहाचा (OMPEG)  तृतीय वर्धापन सोहळा थाटामाटात साजरा झाला.

OMPEG Celebrates Third Anniversary | 'ऑक्सफर्ड'च्या विद्यानगरीत रंगला OMPEG चा तृतीय वर्धापनदिन!

'ऑक्सफर्ड'च्या विद्यानगरीत रंगला OMPEG चा तृतीय वर्धापनदिन!

Next

केदार लेले (लंडन)

यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन OMPEG ही महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था लंडनमध्ये २०१६ रोजी स्थापन केली. सदर लेखात जाणून घेऊयात OMPEGच्या तृतीय वर्धापनदिनाच्या सोहळ्याबद्दल! 

ऑक्सफर्ड या विद्यानगरीमध्ये शनिवारी (२७ एप्रिल) प्रसन्न संध्याकाळी UK मधील महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजक समूहाचा (OMPEG)  तृतीय  वर्धापन सोहळा थाटामाटात साजरा झाला. या सोहळ्यात जवळपास १५० प्रथितशील महाराष्ट्रीयन उद्योजक आणि व्यावसायिक उत्साहाने सामील झाले होते.

शनिवारी दुपारी २ वाजल्यापासून स्वयंसेवकांची  लगबग आणि ४ नंतर सभासदांचे (नियोजित वेळेवर) आगमन काही निराळेच संकेत देत होते. या सोहोळ्यात सहभागी होणे किती अगत्याचे व अनिवार्य आहे याची जाणीव व जे सहभागी होऊ शकले नाहीत त्यांची उणीव प्रकर्षाने भासत होती.  

सर्वदूर प्रचलित गैरसमजाला तडा देत सोहळ्याची सुरुवात नियोजित वेळेवर होऊन संपूर्ण कार्यक्रम पूर्वनियोजित क्रमाने पार पडला. कार्यक्रमामध्ये  व्यावसायिक व उद्योजक सभासदांचा  लक्षणीय सहभाग , अनुभव कथन व समालोचन हे यावर्षीच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू होते.

प्रथितशील मार्गदर्शक, उद्योजक अभय हवालदार यांनी उपस्थितांना 'व्यवसायाचा श्रीगणेशा , व्यवसायाकरीत अत्यावश्यक भांडवल   उभारण्याकरिता येणारी आवाहने' याची समपर्क व  विस्तृत माहिती दिली. अनेक उद्योजकांनी 'व्यवसायाकरिता भांडवल कसे मागायचे' हा न्यूनगंड दूर झाला अशी उदबोधक पावती देऊन अभय हवालदार यांचे आभार मानले. 

लंडनमधील भारतीय उच्चयुक्तमधील व्यवसाय व उद्योग विभागामधील प्रथम अधिकारी राहुल नांगरे यांच्या विशेष उपस्थितीने कार्यक्रमाला राजाश्रय प्राप्त झाल्याचे अनेक उपस्थितांनी नमूद केले.  राहुल नांगरे यांनी OMPEG  सभासद तसेच कार्यकारी मंडळाला उच्चायुक्तालयामधून शक्यतो सर्व मदत व मार्गदशन करण्याची खात्री देऊन सोहोळ्यामधे नवचैतन्य जागृत केले. 

OMPEG मधील कार्यशील सभासदांमधून ' Chanakya ', 'Dare to Dream', 'Fire in the Belly' व ' Eagles Nest' अशा प्रभंगामधून उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवांकित करण्यात आले. गेल्या आर्थिक वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी , व्यावसायिक नेतृत्व ,व्यवसाय वृद्धी हे निकष वापरून यथायोग्य सभासद निवडणे हे कार्यकारी समिती समोर मोठे आवाहान होते. 

समूहाचा गेल्या तीन वर्षाच्या कार्याचा आढावा व निकट भविष्यामधील प्रारूप आराखडा याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.  या सोहोळ्यामध्ये २५/३० नवीन सदस्य उपस्थित होते. अनेक नवसदस्यांनी  OMPEG , त्याच्या कक्षा , कार्यसिमा व भावी उपक्रम याबद्दलची माहिती संस्थेच्या आजी/माजी सदस्यांकडून घेऊन, OMPEG चे क्रियाशील सदस्य होण्याचा निर्णय घेतला. उपस्थित सभासंदांनी OMPEG कार्यकारी स्वयंसेवकांचे याप्रसंगी सप्रेम आभार व्यक्त केले. 

व्यवसाय व कार्यक्षेत्र वृद्धिंगत करण्यासाठी सहविचारी सभासदांशी चर्चा, हास्यविनोद अश्या हलक्याफुलक्या वातावरणामध्ये सर्वांनी भोजनाचा व भोजनानंतरच्या वेळेचा सदुयोग करून स्वयंसेवक व इतर सभासदांना OMPEG या संस्थेचे अस्तित्व व कार्य याची खात्री करून दिली. 

OMPEG ची तोंडओळख

व्यवसाय वृद्धीसाठी संस्था काढून ती ३ वर्षे सातत्याने चालवणे आणि त्यामधून इंग्लंड मधील  स्थायिक महाराष्ट्रीयन मंडळींना व्यवसाय करता प्रवृत्त करणे, व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन, मदत करणे आणि व्यवसाय वाढीसाठी विविध उपक्रमांमधून व्यासपीठ निर्माण करून देणे. हे सगळे ऐकून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही कदाचित. पण OMPEG ने हे शक्य करून दाखवले आहे. ही जगाच्या पाठीवरील पहिली अशा पद्धतीने महाराष्ट्रीयन मंडळींकरता व्यवसायवृत्ती वाढवण्यास सक्रिय काम करणारी संस्था आहे. 

संस्थेचे १२५ पेक्षा जास्त वर्गणीदार सदस्य आहेत. या मध्ये २५ % महिलांचा समावेश आहे आणि सर्व महिला सदस्य व्यवसाय करत आहेत. मागील ३ वर्षात सदस्यांनी सहभाग घेऊन ३० पेक्षा जास्त कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.  या विविध कार्यक्रमाद्वारे अंदाजे १००० महाराष्ट्रीयन मंडळी या संस्थेशी जोडली गेली आहेत.

 

Web Title: OMPEG Celebrates Third Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.