वॉशिंग्टन : अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतात एका माथेफिरूने मुस्लीम मुलीचे (वय १७) अपहरण करून तिची हत्या केली. या मुलीचा मृतदेह तळ्यात आढळला. द्वेषातून घडलेला हा गुन्हा असण्याची शक्यता आहे.
नबरा हुसैन असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी डार्विन मार्टिनेझ टोरेस (वय २२) या संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. रेस्टोन येथे राहणारी नबरा पहाटेच्या सहरीसाठी (रोजा सुरू होण्याआधी) मैत्रिणींसह स्थानिक उपाहारगृहात गेली होती. तेथून परतताना एक कारचालक त्यांच्या दिशेने येऊ लागला. नबराच्या मैत्रिणी मशिदीकडे पळाल्या. परंतु आपली एक मैत्रीण गायब असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी ही माहिती आॅल ड्युलेस एरिया मुस्लीम सोसायटीला दिली. नंतर पोलिसांना कळविताच बेपत्ता नबराचा शोध सुरू झाला. अनेक तासांच्या शोधानंतर पोलिसांना एका तळ्यात नबराचा मृतदेह आढळून आला. तो नबराचा असल्याची खात्री पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नबराचा शोध घेत असताना संशयित त्या भागात संशयास्पदरीत्या कार चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आले. घटनास्थळी एक बेसबॉल बॅटही आढळली आहे. एका ठिकाणी आम्हाला काही पुरावे सापडले. त्यामुळे नबरावर तेथेच हल्ला झाला असावा. (वृत्तसंस्था)