रायन अलशेबल : सिरियातून परागंदा तरुण जर्मनीत महापौर..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 07:42 AM2023-06-01T07:42:11+5:302023-06-01T07:42:47+5:30

आपण जिवंत राहू की नाही, असेही अनेक प्रसंग त्याच्यावर गुदरले, पण सुदैवानं म्हणा किंवा त्याच्या जिद्दीनं म्हणा, कसाबसा तो जर्मनीमध्ये पोहोचला आणि....

know journey of Ryyan Alshebl the Syrian refugee who became mayor of a conservative German village | रायन अलशेबल : सिरियातून परागंदा तरुण जर्मनीत महापौर..

रायन अलशेबल : सिरियातून परागंदा तरुण जर्मनीत महापौर..

googlenewsNext

सिरिया हा मध्य-पूर्वेतील एक अरब प्रजासत्ताक देश. गेली कित्येक वर्षे झाली, या देशात यादवी सुरू आहे. या संघर्षात आजवर हजारो लोक मृत्युमुखी पडले आणि लक्षावधी लोकांना आपल्याच देशातून परागंदा व्हावं लागलं. जगात सध्या जे सर्वात असुरक्षित देश मानले जातात त्यात सिरिया अग्रस्थानी आहे. 

याच सिरियामधील रायन अलशेबल हा एक तरुण. नैर्ऋत्य सिरियातील सुवेदा येथे तो राहत होता. भविष्याची अनेक सुंदर स्वप्नं त्यानं पाहिली होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं फायनान्स आणि मॅनेजमेंटच्या डिग्रीसाठी ॲडमिशन घेतली. पण हे सगळं सोडून त्याला आपल्या देशातून पळून जावं लागलं. कारण देशात सुरू असलेलं यादवी युद्ध. वयाच्या २१व्या वर्षी आपले तीन मित्र आणि आपल्यासारख्याच अनेक सिरीयन नागरिकांबरोबर त्यानं देश सोडला. त्याच्या आईवडिलांनीही त्याला मोठ्या कष्टानं निरोप दिला.

या प्रवासात आपण जिवंत राहू की नाही, असेही अनेक प्रसंग त्याच्यावर गुदरले, पण सुदैवानं म्हणा किंवा त्याच्या जिद्दीनं म्हणा, कसाबसा तो जर्मनीमध्ये पोहोचला. त्यावेळी त्याच्याकडे ना फुटकी कवडी होती, ना कुठली महत्त्वाकांक्षा त्याच्यात उरली होती. ना जर्मन भाषा  येत होती, ना कुठलं ध्येय समोर दिसत होतं.. आता जगायचं कसं, हाच सगळ्यात मोठा प्रश्न त्याच्यासमाेर होता, पण हाच रायन केवळ आठ वर्षांत जर्मनीतील ओस्टेलहाइम या एका शहराचा महापौर बनला! अपक्ष म्हणून लढताना सर्वाधिक मतं त्यानं मिळवली! 

रायन म्हणतो, मी कुठे होतो आणि कुठे पोहोचलो आहे! हा माझ्या नशिबाचा जसा प्रवास आहे, तसाच जर्मन लोकांच्या मोठेपणाचा आणि विश्वबंधुत्वाचाही एक आरसा हा प्रवास समोर ठेवतो. एका ‘परदेशी’ माणसाला माझ्या जर्मन बांधवांनी ज्या आपलेपणानं स्वीकारलं एका छोट्या शहराचा महापौर बनवलं त्याला तोड नाही!..

ज्या परिस्थीतीत रायननं एका नव्या धाडसाला प्रारंभ केला, तो प्रवास अतिशय चित्तथरारक आहे. त्याचा हा प्रवास त्याच्याच शब्दांत ऐकायला हवा..

रायन सांगतो, ज्यावेळी मी माझा देश सोडायचा निर्णय घेतला त्यावेळीही माझ्याकडे फारसं काही नव्हतं. होते ते फक्त आई-वडिलांचे आशीर्वाद, त्यांनी जमवलेले आणि असेल नसेल ते सारे रुमालात गुंडाळून दिलेली पैशांची एक पुरचुंडी आणि त्यांच्या सदिच्छा. नाही, म्हणायला पाठीवर आणखी एक सॅक होती आणि त्यात माझ्या कपड्यांसह इतर काही जीवनावश्यक गोष्टी होत्या. युरोपात आपल्याला आश्रय मिळू शकेल म्हणून मी त्या दिशेनं प्रवासाला सुरुवात केली. आधी कसंबसं लेबेनॉन क्रॉस केलं. त्यानंतर तुर्कीला पोहोचलो. 

त्यानंतर पुढे कसं जायचं हा प्रश्नच होता.. तुर्कस्तान पार करायची कोणतीही सोय नव्हती, हाती पैसे नव्हते.. शेवटी एक बोटवाला ग्रीसच्या लेसबॉस या बेटावर घेऊन जाण्यासाठी तयार झाला. तुर्कीपासून हे बेट फक्त ४७० मैल! पण त्यासाठी त्याचे खिसे भरावे लागणार होते. शेवटी आईनं दिलेला तो रुमाल बाहेर काढला. त्यातले सर्वच्या सर्व पैसे त्याला देऊ केले. एक हजार डॉलरमध्ये सौदा ठरला! त्याचं कारणही तसंच होतं. २०१५च्या सुमारास सिरिया आणि इराकमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे दोन्ही देशांतील हजारो लोक तुर्कीमार्गे ग्रीसमध्ये शिरण्यासाठी, या छोट्याशा बेटावर पोहोचण्यासाठी अक्षरश: चेंगराचेंगरी करीत होते..  

छोट्याशा रबरी बोटीनं आमचा प्रवास सुरू झाला.. या बोटीची क्षमता होती जास्तीत जास्त १५ लोकांची, पण त्यात ५० लोक कोंबून भरलेले होते! माणसांचं ‘स्मगलिंग’ करणाऱ्या अशा अनेक बोटी याआधी बुडाल्याही होत्या. वाऱ्याबरोबर बोट हेलकावे खात होती. त्यात पाणी जात होतं. बोट केव्हाही बुडण्याची शक्यता होती. वजन कमी करावं म्हणून शेवटी माझं सर्वस्व असलेली माझी एकमेव बॅग मीही पाण्यात टाकली. आता अंगावरच्या कपड्यांशिवाय माझ्याकडे काहीही नव्हतं!.. लेसबॉसच्या बेटावर पोहोचल्यानंतर बाल्कनची सामुद्रधुनी पार करून रायन आणि काही सुदैवी लोक महत्प्रयासानं युरोपात पोहोचले.

मी जिवंत कसा काय आहे? 
रायन म्हणतो, जर्मनीच्या तत्कालीन चान्सलर ॲन्जेला मर्कल यांनी लाखो निर्वासितांना जर्मनीत आश्रयाला परवानगी दिली म्हणूनच आम्ही येथे येऊ शकलो. लेसबॉस ते ऑस्ट्रिया या १२०० मैलांच्या प्रवासात तर अंगावरच्या कपड्यांशिवाय दुसरा कपडाही नव्हता. सगळाच प्रवास क्षणोक्षणी जीवन-मरणाची परीक्षा पाहणारा होता. खायला अन्नाचा कण नव्हता आणि श्वास घेण्याचं त्राणही शरीरात नव्हतं. सुदैवानं या प्रवासात रेडक्रॉसची मदत मिळाली, त्यांनी दिलेल्या बेसिक वैद्यकीय सुविधा आणि थोडंफार अन्न यामुळेच आम्ही जिवंत राहू शकलो. सिरिया ते जर्मनी आणि तिथल्या एका छोट्या शहराचा महापौर.. हा साराच प्रवास अविश्वसनीय आणि दैवी आहे..

Web Title: know journey of Ryyan Alshebl the Syrian refugee who became mayor of a conservative German village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.