Ganpati Festival : जर्मनीमध्ये गणरायाचा गजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:56 PM2018-09-20T12:56:35+5:302018-09-20T13:09:26+5:30

जर्मनीमधील म्युनिक शहरात महाराष्ट्र मंडळ म्युनिकतर्फे आयोजित गणेशोत्सवाचा कार्यक्रम नुकताच उत्साहाने साजरा करण्यात आला.

Ganesh Chaturthi Celebration in Germany | Ganpati Festival : जर्मनीमध्ये गणरायाचा गजर!

Ganpati Festival : जर्मनीमध्ये गणरायाचा गजर!

जर्मनीमधील म्युनिक शहरात महाराष्ट्र मंडळ म्युनिकतर्फे आयोजित गणेशोत्सवाचा कार्यक्रम नुकताच उत्साहाने साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या सभासद दीपाली गोंडचवर यांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या श्रीगणेशाच्या अतिशय सुबक मूर्तीचे वाजतगाजत आगमन झाले. मंडळाचेच सभासद पराग लपालीकर यांनी स्वतः पौरोहित्य करून साग्रसंगीत पूजा केली. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तीनशेच्या आसपास मराठी आणि अमराठी भारतीयांनी श्रीगणेशाची अतिशय उत्साहात आणि भक्तिभावाने आरती केली. 

ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांनी सादर केलेला फिटे अंधाराचे जाळे हा संगीतमय कार्यक्रम या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. फिटे अंधाराचे जाळे या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांची एकापेक्षा एक सरस आणि सुप्रसिद्ध गाणी तर सादर केलीच पण श्रीधरजींनी स्वतः संगीतबद्ध केलेली अनेक गाणी ज्यामध्ये भावगीते, चित्रपटगीते, अभंग, भक्तीगीते या सर्वांचा अतिशय सुरेख असा संगम होता. विशेष म्हणजे श्रीधरजींनी फक्त गाणी ऐकवली असं नाही तर त्या गाण्यामागची कथा सुद्धा उलगडून सांगितली. त्यांना आलेले अनुभव, त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी, बाबूजींच्या आठवणी सांगुन त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

श्रीधरजींना म्युनिक मधल्या स्थानिक मराठी कलाकारांनी सुद्धा साथ संगत केली. यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल तो शिल्पा मोघे आणि निषाद फाटक या कलाकारांचे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही महाराष्ट्र मंडळ म्युनिकचे सदस्य असलेल्या रसिका आणि धनराज यांनी अतिशय रंजकपणे केले. महाराष्ट्र मंडळातर्फे विविध वयोगटातल्या लहान मुलांसाठी कार्यशाळेचे आयोजन याच परिसरात असलेल्या वेगळ्या हॉलमध्ये केले होते. मुलांनीही उस्फुर्तपणे यात भाग घेतला. या कार्यक्रमाला म्युनिक मधील भारतीय दूतावासाचे उत्साही प्रमुख श्री सुगंध राजाराम यांचीही आवर्जून उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाचे अध्यक्ष श्री आशुतोष सोहोनी, श्री योगेश वाडकर (सचिव) आणि अभिजीत माने (खजिनदार) यांनी सर्वांचे आभार मानले. 

श्रीगणेशाची संध्याकाळी वाजत-गाजत मिरवणूक काढून श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दरवर्षी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्व मराठी मंडळींना एकत्र आणणाऱ्या महाराष्ट्र मंडळ म्युनिकला दिवसेंदिवस प्रत्येक कार्यक्रमात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या यशामागे अर्थातच महाराष्ट्र मंडळाच्या सर्व कार्यकारी सभासदांचे - प्रवीण पाटील, अपर्णा लपालीकर, आशिष मोघे, विपीन गोंडचवर आणि सुषमा गायकवाड यांचे विशेष परिश्रम आहेत.

Web Title: Ganesh Chaturthi Celebration in Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.