Firing in US, Indian nationals killed and another seriously injured | अमेरिकेत गोळीबार, भारतीय वंशाचा नागरिक ठार, दुसरा गंभीर जखमी

जॉर्जिया- अमेरिकेतील जॉर्जियामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये भारतीय वंशाच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे आणि दुसरी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. दोन्ही गोळीबार वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये झाले आहेत.

परमजीत सिंग या ४४ वर्षाच्या व्यक्तीचे प्राण या गोळीबारात गेले आहेत. परमजीत सिंग यांना मारल्यानंतर गोळीबार करणारा माणूस १० मिनिटांमध्ये एल्म स्ट्रीट फूड अँड बिव्हरेज या स्टोअरमध्ये गेला. या स्टोअरमध्ये ३० वर्षांचा युवक पार्थी पटेल याच्यावर गोळ्या झाडून तेथील पैसेही मारेकरऱ्याने चोरले. पार्थी पटेल यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी संशयीत म्हणून लॅमर राशद निकोल्सन याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर हत्या, लूट असे विविध आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.निकोल्सनला फ्लॉईड कौंटी कारागृहात ठेवण्यात आले आहे. फ्लॉइड कौंटीचे पोलीस प्रमुख जेफ जोन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकोल्सन हा प्रथम एका स्टोअरमध्ये गेल्याचे सीसीटीव्हीच्या चित्रीकरणातून स्पष्ट झाले आहे. तेथे त्याने परमजित सिंग यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. तसेच तेथे आणखी एक महिला उपस्थित होती, मात्र ती जखमी झालेली नाही. निकोल्सनवर याआधीही अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत.