अॅमेझॉन कर्मचारी तब्बल ५५ तासांच्या ड्युटीनंतर इतके थकले की गेले थेट हॉस्पिटलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 12:32 PM2017-11-27T12:32:46+5:302017-11-27T12:46:36+5:30

कामाचा अतिताण कधीही घातकच असतो. त्याने कामामध्ये ना दर्जा राहतो आणि नाही ध्येय.

Amazon employees done 55 hours duty and went to hospital | अॅमेझॉन कर्मचारी तब्बल ५५ तासांच्या ड्युटीनंतर इतके थकले की गेले थेट हॉस्पिटलमध्ये

अॅमेझॉन कर्मचारी तब्बल ५५ तासांच्या ड्युटीनंतर इतके थकले की गेले थेट हॉस्पिटलमध्ये

ठळक मुद्देकोणत्याही कंपनीला पुढे जायचं असेल  तर त्यांची सगळ्यात मोठी संपत्ती असते ती म्हणजे त्यांचे कर्मचारीअॅमेझॉन या जगप्रसिद्ध कंपनीने नेमका हाच नियम पायदळी तुडवलेला दिसतो. कारण ते सलग ५५ तास कर्मचाऱ्याला काम करायला लावताहेत.या अतक्या अति कामामुळे जर उद्या कोणाच्या जीवावर बेतले तर कंपनी जबाबदारी उचलणार आहे का

इंग्लंड - मोठमोठ्या ऑफर असल्यावर तुम्हीही ऑनलाईन शॉपिंग करत असाल. मग आपण केलेली ऑर्डर लवकरात लवकर येण्याची तुम्ही वाट पाहत असाल. दिलेल्या वेळेत ऑर्डर नाही पोहोचली की तुम्ही तक्रारही करत असाल. पण जर तुम्ही असं करत असाल तर जरावेळ थांबा. तुम्ही केलेली ऑर्डर लवकरात लवकर पोहोचावी याकरता ऑनलाईन कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांवर इतका अन्याय करताएत की त्यांना माणूस म्हणून जगणंही कठीण झालंय. अॅमेझॉन कंपनीतून असाच एक प्रकार समोर आलाय. दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी अॅमेझॉनने त्यांच्या कर्मचाऱ्यांवर तब्बल ५५ तासांची ड्युटी लावली आहे. सलग ५५ तास ड्युटी केल्यावर कर्मचारी घरी न जाता अॅम्ब्युलन्सने थेट हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

आणखी वाचा - शॉपिंगचे आॅनलाइन ‘अ‍ॅडिक्शन’

एका कर्मचाऱ्याने सांगितल्यानुसार, ‘एक प्रोडक्ट पॅक करायला केवळ ९ सेकंद दिलेले असतात. प्रत्येक तासाला तब्बल ३०० प्रोडक्ट पॅक करण्याचं टार्गेट प्रत्येक कर्मचाऱ्याला दिलेलं आहे.’ इंग्लडमधल्या टिलब्युरी या छोट्याशा शहरात अॅमेझॉनचं गोदाम आहे. तिकडे, सगळे प्रोडक्ट पॅक केले जातात. आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त खेचून घेण्यासाठी त्यांना वेळेत डिलिव्हरी करणं गरजेचं असतं. त्यामुळेच अॅमेझॉन कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करतेय. त्यातील एका कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे गोदामात प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्हीचं जाळं लावण्यात आलंय. जेणेकरून कर्मचाऱ्यांची प्रत्येक हालचाल टिपण्यात येते. कामाच्या वेळेत कोणीही बसू शकत नाही, एवढंच नव्हे तर मोकळ्या वेळेतही कोणी रेंगाळताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. एवढं सगळं करूनही त्यांच्या हाती केवळ तुटपुंजा पगार येतोय. 

गेल्या काही वर्षात अॅमेझॉनचा टर्नओव्हर वाढलाय. हा टर्न ओव्हर वाढण्यामागे जे‌वढा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची हात आहे, तेवढाच हातभार या कनिष्ठ वर्गतील कर्मचाऱ्यांचाही आहे. यु.केतील अॅमेझॉनचा व्यवसाय गेल्या वर्षभरात ७.३ डॉलर मिलिअनने वाढला आहे. केवळ २४ हजार कर्मचाऱ्यांच्या जीवावर  हा व्यवसाय वृद्धींगत झालाय. हे २४ हजार कर्मचारी संपूर्ण यु.केतून आलेल्या ऑर्डर पॅक करतात. मात्र एवढं करूनही त्यांच्या हातात पोटापुरतेही पैसे येत नाहीत. जगभरातील सगळ्याच शाखेतील अॅमेझॉनचे कर्मचारी अशाच परिस्थितीतून जात आहेत. इटली आणि जर्मनीतील कर्मचाऱ्यांनी त्यांना मिळत असलेला पगार आणि कारखान्यातील निकृष्ठ वातावरण यावर आंदोलन छेडलं आहे. टिलब्युरीतल्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, ‘आम्ही जिथे काम करतो तिथे अजिबात नैसर्गिक प्रकाश येत नाही. त्यामुळे ५५ तास ड्युटी करताना आम्हाला दिवस आहे की रात्र झालीय याचाही पत्ता लागत नाही. कर्मचाऱ्यांकडून एवढा वेळ काम करुन घेत असताना कंपनीने कर्मचाऱ्यांना निदान त्यांच्या मुलभूत गरजा तरी भागवल्या पाहिजेत.’ 

आणखी वाचा - दिवाळीच्या आनंदाचे भारवाहक!, सणांमुळे मिळतो पैसा; कुरिअर बॉइजना मोठी मागणी

दुसऱ्या कर्मचाऱ्याने तर थेट कंपनीच्या टर्नओव्हरच दावा केलाय. तो म्हणतोय की, ‘अॅमेझॉन जगभरातील श्रीमंत का होतेय माहितेय? कारण ते कर्मचाऱ्यांचा खून करताहेत. आम्हाला आमचं जीवनच जगता येत नाहीए. आम्ही घरी नसल्याने आमच्या घरातल्यांना, मित्रमंडळींना आम्ही मेलोय, आमचं अस्तित्वच संपलंय असं वाटू लागलंय.’ टार्गेटच्या नावाखाली देण्यात आलेली ५५ तासांची ड्युटी वगळता, इथं कर्मचारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात. या मधल्या काळात अर्ध्या अर्ध्या तासाचे केवळ दोनच ब्रेक दिले जातात. त्याचप्रमाणे कंपनीने दिलेल्या कंम्प्लेंट बोर्डवरही कर्मचाऱ्यांनी कामाच्या तासाबाबत तक्रारी नोंदवल्या असल्या तरीही त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही.

कोणत्याही कंपनीला पुढे जायचं असेल  तर त्यांची सगळ्यात मोठी संपत्ती असते ती म्हणजे त्यांचे कर्मचारी. त्यामुळे कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा पुरवणं गरजेचं असतं. अॅमेझॉन या जगप्रसिद्ध कंपनीने नेमका हाच नियम पायदळी तुडवलेला दिसतो. एखादी व्यक्ती सलग ५५ तास काम करूच कशी शकते? २४ तासातले निदान ६ तास झोपण्याचे असतात, पण या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला आठवडाभर झोपच न मिळाल्याने त्यांनी गोदामातच डोकं टेकलं आणि थेट हॉस्पिटलमध्येच भरती व्हावं लागलं. या अति कामामुळे जर उद्या कोणाच्या जीवावर बेतले तर कंपनी जबाबदारी उचलणार आहे का असाही सवाल उपस्थित केला जातोय. 

सौजन्य - www.mirror.co.uk

Web Title: Amazon employees done 55 hours duty and went to hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.