बाप रे... उबेरचालकाकडून ३ मिनिटांच्या पार्कींगसाठी तब्बल ३ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 03:59 PM2023-12-25T15:59:39+5:302023-12-25T16:00:11+5:30

तब्बल ३ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. 

3 lakh fine from Uber driver for parking for 3 minutes in manchester mark | बाप रे... उबेरचालकाकडून ३ मिनिटांच्या पार्कींगसाठी तब्बल ३ लाखांचा दंड

बाप रे... उबेरचालकाकडून ३ मिनिटांच्या पार्कींगसाठी तब्बल ३ लाखांचा दंड

वाहतूक कोंडीमुळे वाहन पार्कीग ही मोठी समस्या बनली आहे. अनेकदा शहरातील प्रमुख मार्गांवर पार्कीगची सोय नसल्याने वाहन कुठे पार्क करावे, असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. तर, बस स्टँड, रेल्वे स्थानक आणि विमानतळावरही पार्कींगसाठी विशेष सोय केलेली असते. मात्र, पार्कींग फुल झाल्यानंतर वाहन पार्कींगसाठी अडचण होते. अशावेळी, नाहक पोलिसांच्या दंडाचा भार वाहनधारकांच्या खिशावर पडतो. नुकतेच एका उबेरचालकास तीन मिनिटांच्या वाहन पार्कींगसाठी तब्बल ३ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. 

इंग्लंडच्या मँचेस्टर शहरातील ही घटना असून उबेर ड्रायव्हर विमानतळावर प्रवाशांना सोडवण्यास गेला असता, तीन मिनिटे विमानतळावर गाडीसह असल्याने त्यास हा दंड ठोठावण्यात आला आहे. या घटनेमुळे ड्रायव्हर चालकाने संताप व्यक्त केला आहे. लँडलाईबल वेबसाईटच्या वृत्तानुसार, मार्क कॉनर असं या उबेर कारचालकाचे नाव असून १ डिसेंबर रोजी ही घटना घडली. मार्कने लिवरपूल येथून मँचेस्टर विमानतळावर काही प्रवाशांना आपल्या कारमधून नेले होते. त्यावेळी, तो ड्रॉप ऑफ झोनमध्ये थांबला होता. 

सर्वसाधारणपणे या जागी ५ मिनिटे थांबल्यास वाहनचालकांकडून ५ पौंड दंड आकारला जातो. मात्र, मार्कच्या महिनाभराच्या कमाईपेक्षाही जास्त रक्कम त्याच्याकडून आकारण्यात आल्याचे मार्कने म्हटलं आहे. मार्कला या दंडाबद्दल आणि वसुलीबाबत काहीच माहिती नव्हते. मात्र, ज्यावेळी, त्याने स्वत:चं बँक खातं पाहिलं त्यावेळेस ३ मिनिटांच्या गाडी पार्कसाठी त्याच्याकडून तब्बल ३,१३२ पाऊंड दंड आकारणी करण्यात आल्याचं त्याच्या निदर्शनास आले. भारतीय चलनानुसार ही रक्कम ३ लाख ३० हजार एवढी आहे. म्हणून, मार्क ज्या जागी ३ मिनिटांसाठी थांबला होता, ती जगातील सर्वात महागडी पार्कींग ठरली.

दरम्यान, घडल्या प्रसंगाबाबत मार्कने एअरपोर्ट अॅथोरिटीकडे तक्रार केली असून त्यांनी मार्कला पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र, अद्यापही त्याचे पैसे परत करण्यात आले नाहीत. आता, माध्यमातून हे वृत्त सगळीकडे पसरल्यानंतर विमानतळ अॅथोरिटीने मार्क यांस झालेल्या असुविधेबद्दल खेद व्यक्त करत लवकरात लवकर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करुन दंडाचे पैसे रिफंड केले जातील, असे सांगितले आहे. 

Web Title: 3 lakh fine from Uber driver for parking for 3 minutes in manchester mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.