पाकिस्तानात आढळले 2300 वर्षे जुने बौद्ध विहार, अडीच हजारांहून अधिक कलाकृतीही सापडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 03:09 PM2021-12-19T15:09:54+5:302021-12-19T16:06:45+5:30

या मंदिरासोबतच नाणी, अंगठ्या, भांडी आणि ग्रीसचा राजा मिनंदर याच्या काळातील खरोष्ठी भाषेत लिहिलेल्या साहित्यासह 2700 हून अधिक बौद्ध कलाकृती देखील सापडल्या आहेत.

2300 year old buddha temple found in pakistan khyber pakhtunkhwa state | पाकिस्तानात आढळले 2300 वर्षे जुने बौद्ध विहार, अडीच हजारांहून अधिक कलाकृतीही सापडल्या

पाकिस्तानात आढळले 2300 वर्षे जुने बौद्ध विहार, अडीच हजारांहून अधिक कलाकृतीही सापडल्या

googlenewsNext

कराची:पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात पाकिस्तानी आणि इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाला 2,300 वर्षे जुने बौद्ध विहार/मंदिर (Buddha Temple Pakistan) सापडले आहे. या विहारासोबतच इतर काही मौल्यवान कलाकृतीही सापडल्या आहेत. हे विहार खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यातील बाजीरा शहरात सापडले आहे. या बिहाराचे वर्णन पाकिस्तानातील बौद्ध काळातील सर्वात जुने विहार म्हणून केले जात आहे.

या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'पाकिस्तान आणि इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांनी वायव्य पाकिस्तानमधील एका ऐतिहासिक ठिकाणी संयुक्त उत्खननादरम्यान 2,300 वर्षे जुने बौद्ध काळातील विहार शोधून काढले आहे. याशिवाय इतर मौल्यवान कलाकृतीही सापडल्या आहेत. स्वातमध्ये सापडलेले हे विहार पाकिस्तानातील तक्षशिला येथील मंदिर आणि विहारांपेक्षाही जुने आहे.

2700 हून अधिक कलाकृती सापडल्या
या विहाराव्यतिरिक्त, नाणी, अंगठ्या, भांडी आणि ग्रीसचा राजा मिनंदर याच्या काळातील खरोष्ठी भाषेत लिहिलेल्या साहित्यासह 2700 हून अधिक बौद्ध कलाकृती देखील सापडल्या आहेत. स्वात जिल्ह्यातील बाजीरा या ऐतिहासिक शहरात  उत्खननादरम्यान आणखी पुरातत्व स्थळे सापडतील, असा विश्वास इटालियन तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तानमधील पुरातत्व स्थळे जगातील विविध धर्मांसाठी खूप महत्त्वाची आहेत, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानमधील इटालियन राजदूत आंद्रे फेरारिस यांनी दिली.

याआधीही शोध झाले आहेत

2020 च्या सुरुवातीला पाकिस्तानमधील पुरातत्वशास्त्रज्ञांना उत्खननात विष्णू मंदिर परिसराचे अवशेष सापडले होते. हा शोध स्वात परिसरातच लागला होता. या अवशेषांवरुन असे दिसून आले की येथे किमान 1000 वर्षे जुने हिंदू मंदिर होते. हे मंदिर पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी शोधले होते. बरीकोट घुंडईच्या डोंगरांमध्ये उत्खननाच्या वेळी हे मंदिर सापडले होते. त्यावेळी खैबर पख्तुनख्वाच्या पुरातत्व विभागाचे फजले खालिक यांनी हे मंदिर भगवान विष्णूचे असल्याचे सांगितले होते.
 

Web Title: 2300 year old buddha temple found in pakistan khyber pakhtunkhwa state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.