श्रीलंकेत डेंग्यूमुळे 225 लोकांचा मृत्यू

By admin | Published: July 4, 2017 02:18 PM2017-07-04T14:18:10+5:302017-07-04T14:18:10+5:30

श्रीलंकेत डेंग्यू या तापाच्या साथीचा अनेकांचा संसर्ग झाला आहे. डेंग्यू सारख्या भीषण आजाराचा सामना श्रीलंकन सरकारला करावा लागतोय

225 deaths due to dengue in Sri Lanka | श्रीलंकेत डेंग्यूमुळे 225 लोकांचा मृत्यू

श्रीलंकेत डेंग्यूमुळे 225 लोकांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. 4 - श्रीलंकेत डेंग्यू या तापाच्या साथीचा अनेकांचा संसर्ग झाला आहे. डेंग्यू सारख्या भीषण आजाराचा सामना श्रीलंकन सरकारला करावा लागतोय. यंदाच्या वर्षात डेंग्यूमुळे जवळपास 225 लोकांचा मृत्यू झाला. तसेच 76 हजारांहून अधिक जण आजारी पडले आहेत.

या पार्श्वभूमीवर श्रीलंकन सरकारनंही खबरदारी घेतली आहे. श्रीलंकन प्रशासनानं कचरा हटवणं, तलावातील औषधाची फवारणी करणे अशा प्रकारच्या उपाययोजना राबवल्या आहेत. सफाईच्या कामासाठी जवळपास 400 अधिका-यांना तैनात केलं आहे. कोलंबोचे मुख्य चिकित्सा अधिकारी यांनीही डेंग्यूच्या वाढत्या साथीवर चिंता व्यक्त केली आहे.

मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. रुवन विजयमू म्हणाले, गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. मात्र प्रशासनानं त्या प्रमाणात साफसफाई न केल्यामुळे डेंग्यू या तापाची साथ पसरली आहे. लोक आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवत नाहीत ही बाब खेदजनक आहे. काही जण तर स्वतःच्या घरात सफाईसाठी आलेल्या अधिका-यांना प्रवेशही करू देत नाहीत. खरं तर हे योग्य नाही.

(डेंग्यू, मलेरिया डासांच्या अळ्या सापडल्या)
(डॉक्टरांनाच डेंग्यू-मलेरियाचा धोका!)
पावसाळा सुरू झाल्यावर ब-याचदा डेंग्यू सारखे आजार डोकं वर काढतात. डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेतर्फे करण्यात येते. पाण्याची टाकी डास प्रतिबंधक नसणे, विहीर डास प्रतिबंधक न करणे, कारंजे किंवा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी डास प्रतिबंधाच्या दृष्टीने काळजी न घेणे इत्यादी कारणांमुळे डेंग्यूची साथ पसरते


घराशेजारीच मलेरिया, डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती

गेल्या दोन वर्षांत एकूण डेंग्यू व मलेरियाबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली होती. या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डेंग्यू विषाणू वाहक डासांच्या अळ्या प्राधान्याने फेंगशुई झाड, बांबू प्लँट्स, मनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडे, घराच्या सज्जामध्ये (गॅलरी) किंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या ताटल्या, वातानुकूलन यंत्रणा, रेफ्रिजरेटर डिफ्रॉस्ट ट्रे या ठिकाणी असलेल्या स्वच्छ पाण्यात आढळून आल्या आहेत.
विहिरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे, कूलिंग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचवलेल्या पाण्यात मलेरिया पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होते. घराशेजारील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लॅस्टिक यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साचते व या स्वच्छ पाण्यातही डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू त्वरित नष्ट कराव्यात.
अनेक घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम वापरले जातात. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात डासांच्या अळ्या आढळून येतात. याकरिता पाण्याचे पिंप हे आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवावे. यासाठी सदर पिंप पूर्णपणे उलटे करून ठेवल्यानंतर काही वेळाने हे पिंप कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावे. कोरड्या फडक्याने पिंप आतून पुसत असताना, ते दाब देऊन पुसावे जेणेकरून पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील. नंतर या पिंपात पाणी भरल्यावर न विसरता, स्वच्छ कपड्याद्वारे पिंपाचे तोंड बांधून ठेवावे, जेणेकरून सदर पिंपात डासांची मादी अंडी घालू शकणार नाहीत. नागरिकांनी त्यांच्या घरामध्ये व घराशेजारील परिसरात साठविलेले किंवा साचलेले पाणी सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या अंतर्गत घरातील पाणी साठवण्याची भांडी एक दिवस कोरडी ठेवणे अपेक्षित आहे.

Web Title: 225 deaths due to dengue in Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.