लंडनमध्ये मशिदीजवळ भाविकांच्या गर्दीत घुसवली व्हॅन, 1 ठार, 10 जखमी

By Admin | Published: June 19, 2017 10:42 PM2017-06-19T22:42:53+5:302017-06-19T22:43:20+5:30

रमजानच्या विशेष प्रार्थनेनंतर मशिदीतून बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या गर्दीत एकाने भरधाव व्हॅन घुसवली.

1 killed, 10 injured in London van derailed in nearby crowded mosque | लंडनमध्ये मशिदीजवळ भाविकांच्या गर्दीत घुसवली व्हॅन, 1 ठार, 10 जखमी

लंडनमध्ये मशिदीजवळ भाविकांच्या गर्दीत घुसवली व्हॅन, 1 ठार, 10 जखमी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 19 - रमजानच्या विशेष प्रार्थनेनंतर मशिदीतून बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या गर्दीत एकाने भरधाव व्हॅन घुसवली. यात एक ठार, तर दहा जण जखमी झाले. उत्तर लंडनमध्ये सोमवारी ही घटना घडली. गेल्या चार महिन्यांत ब्रिटनला हादरविणारा हा चौथा दहशतवादी हल्ला आहे. सेव्हन सिस्टर्स रोडवरील मुस्लिम वेल्फेअर हाऊसजवळ मध्यरात्रीनंतर मुस्लिम भाविक रस्त्यावर पडलेल्या माणसाला मदत करीत होते. तेव्हा हल्लेखोराने त्यांच्या घोळक्यात व्हॅन घुसवली. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर आठ जण जखमी झाले.

किरकोळ दुखापतीमुळे अन्य दोघांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. घटनास्थळी असलेल्या लोकांनी व्हॅनचालकाला (वय ४८) पकडले. नंतर पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून त्याला अटक केली. हा मुस्लिमांवर हेतुपुरस्सर करण्यात आलेला हल्ला असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही धक्कादायक घटना असून, पोलीस दहशतवादी कृत्याच्या अनुषंगाने तपास करीत आहेत, असे गृहमंत्री अ‍ॅम्बर रूड यांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीवर लोकांनी आधीच प्रथमोपचार केले होते. त्यामुळे त्या व्यक्तीचा व्हॅनच्या धडकेने मृत्यू झाला, असा निष्कर्ष लगेच काढता येणार नाही, असे सहायक पोलीस आयुक्त नील बसू यांनी सांगितले. या घटनेला दहशतवादी हल्ला मानण्यात येत असून, दहशतवाद प्रतिबंधक पथक याचा तपास करीत आहे.

या घटनेत आणखी कोणाचा हात असल्याचे आतापर्यंत समोर आलेले नाही, असेही ते म्हणाले. या घटनेचे साक्षीदार अब्दुल रहमान यांनी सांगितले की, व्हॅनचालक ‘मला सर्व मुस्लिमांना ठार मारायचे आहे’, असे म्हणत होता. व्हॅनमधून बाहेर आल्यानंतर त्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही त्याला पकडले. मी त्याच्या पोटात गुद्दा मारला. त्यानंतर मी आणि इतरांनी त्याला जमिनीवर पाडले. पोलीस येईपर्यंत आम्ही त्याला पकडून ठेवले, असेही ते म्हणाले. दुसऱ्या एका साक्षीदाराने सांगितले की, आम्हाला वेगात धडक देण्यासाठीच व्हॅन आमच्या दिशेने आणण्यात येत होती. अटक केल्यानंतर व्हॅनचालक ‘मी पुन्हा हे करेन, मी पुन्हा हे करेन’, असे म्हणत होता. हल्ल्यामागील कारणाचा छडा लावण्यासाठी दहशतवाद प्रतिबंधक पथकाकडून तपास सुरू आहे. लंडन हे अनेक धर्म आणि राष्ट्रीयत्वांचे शहर आहे. एखाद्या समुदायावरील हल्ला हा आम्हा सर्वांवरील हल्ला आहे. दहशतवादी आमच्यात फूट पाडून आम्हाला दहशतीखाली जगण्यास भाग पाडण्यात यशस्वी होऊ शकणार नाहीत, असे पोलीस आयुक्तांनी म्हटले. ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी या दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असल्याचे यापूर्वी म्हटले होते.

Web Title: 1 killed, 10 injured in London van derailed in nearby crowded mosque

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.