वर्चस्व कायम राखण्यास भारत उत्सुक, सुपर फोर फेरीत पाकिस्तानविरुद्ध लढत आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 03:01 AM2017-10-21T03:01:58+5:302017-10-21T03:03:39+5:30

कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाला शनिवारी १० व्या पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेत सुपर फोरच्या तिस-या व अखेरच्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

 India are keen to maintain dominance, today in the Super Four stage against Pakistan | वर्चस्व कायम राखण्यास भारत उत्सुक, सुपर फोर फेरीत पाकिस्तानविरुद्ध लढत आज

वर्चस्व कायम राखण्यास भारत उत्सुक, सुपर फोर फेरीत पाकिस्तानविरुद्ध लढत आज

Next

ढाका : कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाला शनिवारी १० व्या पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेत सुपर फोरच्या तिस-या व अखेरच्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत विजय मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे.
अलीकडची कामगिरी व वर्चस्व याचा विचार करता स्पर्धेत अव्वल मानांकित भारतीय संघ १३ व्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानविरुद्ध प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करणार आहे. अलीकडच्या कालावधीत भारताने पाकिस्तानविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. मनप्रीतसिंगच्या नेतृत्वाखालील संघ शेजारी राष्ट्राच्या संघावरील मजबूत पकड कायम राखण्यास प्रयत्नशील आहे.
सुपर फोरच्या पहिल्या लढतीत कोरियाविरुद्ध १-१ ची बरोबरी वगळता भारतीय संघाने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी काही शानदार मैदानी गोल नोंदविले असून भारतीय संघाने लौकिकाप्रमाणे ‘वन टच’हॉकीचे प्रदर्शन केले आहे.
कोरियाविरुद्धची लढत भारतीय संघाला सावध करण्यासाठी पुरेशी होती. भारतीय संघ नवे मुख्य प्रशिक्षक सोर्ड मारिने यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली स्पर्धा खेळत आहे. कोरियाविरुद्धचा अनिर्णीत निकाल भारतीय संघाला इशारा देण्यास पुरेसा ठरला. गुरुवारी खेळल्या गेलेल्या सुपर फोरच्या दुसºया लढतीत भारताने चमकदार कामगिरी करीत मलेशियाचा ६-२ ने पराभव केला. भारतीय संघाने सुपर फोरमध्ये एक विजय व एका अनिर्णीत निकालासह चार गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यानंतर मलेशिया (३ गुण), कोरिया (२ गुण) आणि पाकिस्तान (१ गुण) यांचा क्रमांक आहे. भारतीय संघला शनिवारी खेळल्या जाणाºया लढतीत बरोबरीवर समाधान मानावे लागले तरी रविवारी खेळल्या जाणा-या अंतिम लढतीसाठी भारतीय संघाचे स्थान पक्के होईल. कारण भारतीय संघाचे गोलअंतर अन्य संघाच्या तुलनेत सरस आहे. पण, पाक संघाकडे गमावण्यासारखे काही नसल्यामुळे आम्हाला कमकुवत लेखू नका असा जगाला इशारा देण्यासाठी ते सज्ज झाले असतील. पाकिस्तानसाठी मात्र स्पर्धेची पुढील वाटचाल सोपी नाही. कारण अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवण्यासाठी त्यांना भारताविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल आणि त्याचसोबत सुपर फोर फेरीतील अन्य सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.
भारताचा अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग सोपा झाला आहे, पण पाकिस्तानचा कमी लेखण्याची चूक करता येणार नाही. सध्याच्या फॉर्मव्यतिरिक्त कुठल्याही भारत-पाक हॉकी सामन्याचा निकाल खेळाडू मैदानावरील दडपण कसे झुगारतात यावर अवलंबून असतो. भारतीय संघाला मात्र या लढतीत सकारात्मक निकालाची आशा आहे. या व्यतिरिक्त अन्य कुठलाही निकाल त्यांना पचनी पडणार नाही.
भारतासाठी या स्पर्धेत सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आघाडीची फळी आहे. त्यात आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, एस.व्ही. सुनील, ललित उपाध्याय आणि युवा गुरजंत सिंग यांनी शानदार मैदानी गोल नोंदविले आहेत. सुपर फोरच्या अन्य लढतीत कोरियापुढे मलेशियाचे आव्हान राहील. (वृत्तसंस्था)

Web Title:  India are keen to maintain dominance, today in the Super Four stage against Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.