मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनगर आरक्षणासाठी गोंधळ; दाखवले पिवळे झेंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 09:20 PM2019-02-06T21:20:51+5:302019-02-06T21:25:41+5:30

भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गट व शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना धनगर-हटकर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पिवळे झेंडे दाखवत गोंधळ घातला.

Yellow flags shown by the party workers for dhanagar reservation in CM rally in hingoli | मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनगर आरक्षणासाठी गोंधळ; दाखवले पिवळे झेंडे

मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनगर आरक्षणासाठी गोंधळ; दाखवले पिवळे झेंडे

हिंगोली : भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गट व शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना धनगर-हटकर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पिवळे झेंडे दाखवत गोंधळ घातला. यावेळी आमचेच शासन केंद्राकडे आरक्षणासाठी शिफारस करेल, असे आश्वासन देत सभेनंतर या कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या.

रामलीला मैदानावर आयोजित या सभेस ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री दिलीप कांबळे, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ.तान्हाजी मुटकुळे, माजीमंत्री सूर्यकांता पाटील, माजी खा. शिवाजी माने, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी आ.गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मिलींद यंबल, फुलाजी शिंदे, कैलास काबरा आदींची उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच पिवळे झेंडे घेवून काहींनी गोंधळ सुरू केला. तेव्हा या पिवळ्या झेंड्यांचा अर्थ मी समजतो. धनगर-हटकर समाजाच्या आरक्षणाची केंद्र शासनाकडे हेच सरकार पाठवेल, असे सांगून कार्यक्रमानंतर भेटण्याचे आवाहन केले. फडणवीस पुढे म्हणाले, यापूर्वीचे सरकार हे अप्पलपोटे होते. त्यांनी आपल्यापुरतेच पाहिले. आम्ही शेतकरी, गोरगरिबांसाठी काम करीत आहोत. सतत चार वर्षांपासून दुष्काळ पडत आहे. ५0 हजार कोटींची मदत या काळात दिली. तीही मागच्या सरकारप्रमाणे मार्च-एप्रिलमध्ये नव्हे, जानेवारीतच दिली. तीन वर्षांत १२ हजार कोटींचा पीकविमा दिला.

कर्जमाफीची योजना शेवटच्या शेतकरी लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत बंद केली जाणार नाही. तर शेतीमाल हमीभावाने खरेदी साडेआठ हजार कोटींची केली. पूर्वीच्या सरकारने पंधरा वर्षांत साडेचारशे कोटींची खरेदी केली होती. तर केंद्र शासनाने आता प्रत्येक शेतक-याला सहा हजार पेन्शन सुरू केली. त्यात वाढही होवू शकते, असेही फडणवीस म्हणाले. शेतीमालाला सुरुवातीला कमी व नंतर जास्त भाव मिळतो. मात्र असे न होण्यासाठी योजनेवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात ३0 हजार किमीचे रस्ते केले. ५ लाख लोकांना घरे दिली. तेवढ्यांना आगामी वर्षभरात देण्याचा प्रयत्न आहे. तर हिंगोलीचा रस्त्यांचा १00 कोटींचा प्रस्ताव मान्य करून तीन टप्प्यांत निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तर आ.तान्हाजी मुटकुळे यांचा विकासकामांसाठी पाठपुरावा व निधी आणल्याबाबत त्यांचे कौतुक केले.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, भाजप सामान्यांसाठी काम करते. आमच्या सरकारमध्ये दलालांना थारा नाही. दलालांचे सरकार गेले अन् आमचे आले. आता विरोधक व दलाल आमच्याविरुद्ध ओरडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. मात्र जनता पाठीशी आहे. जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, गॅस योजना, कर्जमाफीतून सामान्यांची कामे केल्याने आपल्याकडे कुणी ढुंकूनही पाहणार नसल्याची भीती विरोधकांना आहे. त्यामुळे ही सगळी धडपड आहे. यांनी दारू, मटन दिल्यावर ते थोडेच पाच वर्षे टिकणार आहे. मात्र आमची विकासाची कामे पुढील पाच पंचवीस वर्षे दिसतील. त्यामुळे भविष्याचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी पालकमंत्री कांबळे यांनी जिल्ह्यात झालेल्या विकास कामांत मुख्यमंत्र्यांनी भरभरून दिल्याचे सांगितले. प्रास्ताविकात आ.तान्हाजी मुटकुळे यांनी रस्ते विकासासाठी १0३ कोटी व नर्सी नामदेव संस्थानसाठी २५ कोटींची मंजुरी देण्याची मागणी केली. आभार नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी मानले.

Web Title: Yellow flags shown by the party workers for dhanagar reservation in CM rally in hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.