तंबाखू व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून चोरट्यांनी साडेबारा लाखांची रोकड लुटली

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: March 20, 2024 01:06 PM2024-03-20T13:06:03+5:302024-03-20T13:11:35+5:30

या घटनेमुळे हिंगोलीमधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

The tobacco businessman went home after recovering his debt; Thieves put chutney in his eyes and robbed 12.5 lakhs in cash | तंबाखू व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून चोरट्यांनी साडेबारा लाखांची रोकड लुटली

तंबाखू व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून चोरट्यांनी साडेबारा लाखांची रोकड लुटली

हिंगोली : दुकानातील उधारी जमा झालेली साडेबारा लाखांची रक्कम घेऊन घराकडे निघालेल्या एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून खाली पाडले. त्यानंरत चाकूचा धाक दाखवून पैशाची बॅग घेऊन तिघांनी पळ काढला. ही घटना हिंगोली शहरात १९ मार्च रोजी रात्री १०:१५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

हिंगोली शहरातील भाजीमंडई येथे आनंद हरिप्रसाद अग्रवाल (रा. एनटीसी हिंगोली) यांचे अग्रवाल जर्दा स्टोअर्स नावाचे दुकान आहे. दुकानात जर्दा, सिगारेट, सुपारी यांची होलसेल व किरकोळ विक्री करतात.  १९ मार्च रोजी त्यांनी व्यापाऱ्यांना दिलेल्या जर्दा, सिगारेट, सुपारी या मालाची वसुली केली होती. दिवसभर १२ लाख ५० हजारांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम बँकेत जमा करावयाची असल्याने मंगळवारी रात्री १० वाजता दुकान बंद करून  ते पैशांची बॅग घेऊन घरी निघाले होते. त्यांच्यासोबत दुकानातील नोकर सुनील सरकटे होता. ते दुचाकीने अग्रसेन चौक मार्गे सचिन टेलर यांच्या दुकानासमोरून आशा सायकल स्टोअर्स दुकानाकडे जात असताना पाठिमागून एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी आवाज दिल्याने अग्रवाल व त्यांच्या नोकराने मागे वळून पाहिले. याच वेळी तिघांनी अग्रवाल व नोकराच्या डोळ्यात चटणी टाकत दुचाकीवर लाथ मारली. त्यामुळे अग्रवाल व नोकर दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर एकाने चाकूचा धाक दाखवित १२ लाख ५० हजार रूपयांची रोकड असलेली पैशाची बॅग ओढून घेत दुचाकीवर बसून तिघांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत लुटारू पळून गेले होते. 

तोंडाला बांधला होता काळा रूमाल 
डोळ्यात चटणी टाकून पैशाची बॅग घेऊन पळालेल्या तिघांपैकी एकाने तोंडाला काळा रूमाल बांधला होता. अग्रवाल यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ते पसार झाले होते. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी आनंद अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: The tobacco businessman went home after recovering his debt; Thieves put chutney in his eyes and robbed 12.5 lakhs in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.