श्रीदेवीच्या अकाली मृत्यूमधून प्रत्येकानेच 'हा' बोध घ्यायला हवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 04:51 PM2018-02-26T16:51:08+5:302018-02-26T16:51:08+5:30

एखादी प्रसिद्ध व्यक्ती गेली की एक गजर होऊन, चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी किंवा वाईट सवयी त्यागण्यासाठी जाग येते. बऱ्याचदा घड्याळी गाजराप्रमाणेच हे गजर बंद करून आपण पुन्हा झोपी जातो ही गोष्ट वेगळी. 

What should we learn from Sridevi's sudden death | श्रीदेवीच्या अकाली मृत्यूमधून प्रत्येकानेच 'हा' बोध घ्यायला हवा!

श्रीदेवीच्या अकाली मृत्यूमधून प्रत्येकानेच 'हा' बोध घ्यायला हवा!

googlenewsNext

डॉ. नितीन पाटणकर

श्रीदेवीच्या अकाली निधनाचे सर्वांना दु:ख झाले. हे असे अचानक मरण का आले यावर चर्चा सुरू झाली. कोणी प्रसिद्ध व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला की अशी चर्चा होते ही एक समाजोपयोगी गोष्ट आहे. प्रसिद्ध व्यक्तींच्या अनेक गोष्टी या लोकांना विविध माध्यमातून माहीत होतात. त्यात चांगल्या सवयी आणि वाईट सवयी दोन्ही प्रसिद्ध होतात. मृत्यूनंतर या सवयींवर चर्चा झडल्याने अनेक जण जागरूक होतात. या निमित्ताने एक गजर होऊन, चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी किंवा वाईट सवयी त्यागण्यासाठी जाग येते. बऱ्याचदा घड्याळी गाजराप्रमाणेच हे गजर बंद करून आपण पुन्हा झोपी जातो ही गोष्ट वेगळी. 

श्रीदेवी हार्ट अटॅक येऊन गेली की ‘SCD’ म्हणजे ‘सडन कार्डिॲक डेथ’ मुळे गेली यावर ऊहापोह चालू आहे. कुठचाही दीर्घकालीन आजार असो, घ्यावी लागणारी काळजी समान असते. आहार, व्यायाम, व्यसन आणि तणाव यांच्याशी निगडित गोष्टी या मुख्य असतात. या सर्वातील योग्य बदल हे साधल्याने नुकसान तर होत नाही. हे बदल केल्याने मरण टळेल असे नाही पण दीर्घकालीन आजार नियंत्रणात मात्र येतात. श्रीदेवीने आयुष्यभर आहार, व्यायाम सांभाळला, व्यसनांपासून दूर राहिली; तरीही तिला अकाली मृत्यूने गाठले. कुणाची तरी पोस्ट आहे की या तुलनेत खुशवंतसिंग बघा, व्यसन, आहार, व्यायाम, कशाचीही पर्वा न करता राहिला तर ९९ वर्षे जगला. मान्य. मग आपल्या मुला नातवंडाना, बायको किंवा नवऱ्याला आपण खुशवंतसिंग यांची जीवनशैली स्वीकारायला सांगाल की श्रीदेवीची ? ‘दैवं चैवात्र पंचमम्’ असे श्रीकृष्णाने देखील म्हटले आहे. तेव्हा दैवाचा कौल तर्कदुष्ट असेल तरी आपण काय करायचे हा निर्णय घेणे आपल्या हातात असते. 

या सर्व दीर्घकालीन आजारात तणाव नियंत्रण आणि तणावमुक्ती हा महत्वाचा पण अत्यंत दुष्प्राप्य प्रकार आहे. हे तणाव हेच या सर्व रोगांना रसद पुरवतात, मोठे करतात. मला काय हवे आणि त्यासाठी काय किंमत मोजायला लागेल हे स्पष्ट असले की तणाव कमी होतो. श्रीदेवीच्या जाण्यानंतर आलेल्या लिखाणात; तिने चिरतरुण दिसण्यासाठी केलेले प्रयत्न ज्यात विविध शस्त्रक्रिया, डाएटस् इत्यादी गोष्टींचा उल्लेख आहे. बऱ्याच जणांनी हा चिरतारुण्याचा हव्यास तिच्या जिवावर बेतला हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. याला काही ठोस पुरावा नाही. एवढेच असेल तर हे सर्व करणाऱ्या डॉक्टर्स, आहारतज्ज्ञ यांच्या  विरोधात आत्तापर्यंत कारवाई होऊन हे प्रकार बंद पडले असते. 

या लिखाणातील आणखी एक मुद्दा, ‘ असले डाएट आणि शस्त्रक्रिया स्त्रिया करून घेतात कारण पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीने, सुंदर, तरूण, सुडौल अशी पुरषांची अपेक्षा असते. हे गृहितक प्रत्येकाने तपासून बघायला हवे. चांगलं दिसण्याच्या कितीतरी छटा आहेत. दागिने आणि कपडे यांनी माणसांचे सौंदर्य खुलते. सौंदर्य प्रसाधने ही सौंदर्य वृद्धीची पुढची पायरी झाली. यांत विविध रसायने वापरली जातात. त्यांचे ही काही परिणाम होतातच. या पुढे आल्या शस्त्रक्रिया, डाएटस् आणि औषधे. या पैकी काय वापरायचे, हे वापरून मला काय मिळवायचे आहे हे प्रत्येकाला कळत असते. जाणूनबुजून धोका पत्करून मला काही मिळवायचे असते. हा अत्यंत वैयक्तिक मामला आहे. स्टिरॉइड्सचा भरपूर वापर करून मिळवलेले स्नायू आणि पुरषी सौंदर्य आणि प्रसाधने आणि शस्त्रक्रियेने मिळविलेले हे रिस्क पेक्षा बेनेफिटस् मोठे असल्याशिवाय कोणी घेत नाही. 

ही रिस्क घ्यायला हवी का नको हे ठरविण्यासाठी मदत करण्या इतपतच इतरांचा रोल असतो. 
ज्याला किंवा जिला वाटते की या गोष्टी रिस्की आहेत, त्यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून द्यायला हवे की हे काहीही न करता, यशस्वी किंवा समाधानी जीवन जगतां येते. श्रीदेवीने जे काही केले ते पूर्ण समजून केले. कदाचित त्याची किंमत तिने मोजली असेल किंवा हे तिचे प्राक्तन असेल. ज्यांना ही किंमत कोणासही द्यावी लागू नये असे वाटत असेल त्यांनी दीपस्तंभ व्हायला हवे. यांततरी पुरुषप्रधान संस्कृती कशाला मधे आणायची. जर ह्या गोष्टी पुरुषांच्या गरजा म्हणून होत असतील तर याला आपल्या स्त्रीत्वाचा वापर करून, वासना चाळवून फायदा उकळणे असेही कोणी म्हणेल. स्त्रीला आपल्या अंगभूत गुण आणि कौशल्यावर विश्वास नाही असे म्हणावे लागेल. हे म्हणणे म्हणजे इरावती कर्वे, दुर्गा भागवत, कमला सोहोनी, हिराबाई बडोदेकर, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई, सुनीता देशपांडे अशा अनंत माणसांचा अपमान केल्यासारखे होईल.
 

Web Title: What should we learn from Sridevi's sudden death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.