आरोग्यासाठी जीवनसत्त्व सी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 02:00 AM2019-01-28T02:00:16+5:302019-01-28T02:00:31+5:30

एका प्रसिद्ध जर्नलमध्ये असे संशोधन झाले आहे कीं चायनीज पदार्थ सतत खाण्यात ठेवले तर चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम होऊ शकतो.

Vitamin C for Health | आरोग्यासाठी जीवनसत्त्व सी

आरोग्यासाठी जीवनसत्त्व सी

Next

- डॉ. कांचन खैराटकर

सध्या भारतात चायनीज पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते आहे. एका प्रसिद्ध जर्नलमध्ये असे संशोधन झाले आहे कीं चायनीज पदार्थ सतत खाण्यात ठेवले तर चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम होऊ शकतो. कधी भारतीय रेस्टॉरंट सिंड्रोम ऐकले आहे का हो !

काय आहे हा सिंड्रोम? यामध्ये घशास अचानक सूज येणे , चक्कर येणे, पोटात दुखणे आणि वारंवार खाज येणे अशी लक्षणे चायनीज पदार्थांच्या सेवनोत्तर होतात. त्याचे कारण त्यातील घटक मोनोसोडियम ग्लुटामेट हा आहे. त्याला टेस्ट मेकर म्हणजे उत्कृष्ट चव निर्माण करणारा आहे, बर मान्य ! मग जे चवीसाठी उत्कृष्ट ते आरोग्यासाठी घातक कसे? कारण फक्त चवीचा विचार करून आहार बनविणे ही भारतीय संस्कृती नाही. आपली आहार संस्कृती ही वय, काल, देश, संस्कार आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करून बनलेली आहे मग वसंत ऋतूत सुंठवडा असेल, कडक उन्हात खजुराचे सरबत असेल किंवा वेगवेगळे मुरांबे असतील, चातुर्मास आणि वर्षा ऋतुत हिंग तूप असेल, ऋतु, सण, वार आणि आहार अगदी आखीव -रेखीव!

मला अनेकदा हा प्रश्न स्वत:ला पडतो की, इतके वैविध्य असताना वेगळीकडे का आस धरावी? ‘वेगळी चव’ इतपत ठीक पण तो आयुष्याचा भाग कसा काय व्हावा? असो ! आपला आजचा विषय आहे पुढील जीवनसत्त्व सी...

जीवनसत्त्व सी हे बहुधा सर्व फळांत आणि भाज्यांत आढळते. हे पाण्यात विरघळणारे असल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली की याचेही प्रमाण कमी होते. मानवी शरीरात हे आपोआप निर्माण केले जात नाही, त्यामुळे शरीरात बाहेरून पूरक प्रमाणात घेणे आवश्यक आहे. पूर्वी दमूनभागून, उन्हातान्हात फिरुन आल्यानंतर, खेळ खेळून आल्यानंतर लिंबू सरबत दिले जायचे. आईचा आवाजच असायचा ‘चला, सरबत प्यायला.’ आज असे चित्र खूपच कमी पाहायला मिळते. लिंबू सरबत ही अतिशय उत्तम परंपरा आहे.
भाज्या जास्त वेळ साठवून ठेवणे, चिरून खूप वेळाने वापरणे, खूप शिजविणे या प्रक्रियेने हे जीवनसत्त्व कमी होते तेव्हा बाजारातून चिरून ठेवलेल्या भाज्या आणताना विचार करणे अत्यावश्यक आहे शिवाय फ्रिजमध्ये किती दिवस ठेवायच्या याचाही विचार करायला हवाच ना! फळे आणि भाज्याचा हवेशी संपर्क आला की सी जीवनसत्त्व कमी होते.
आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती, कोलॅजन निर्मिती, हृदयसंस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था यांच्या उत्तम कार्यासाठी याची आवश्यकता असते. सध्याच्या नवीन संशोधनानुसार हे कर्करोगप्रतिबंधक आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. मुख्यत्वे इ जीवनसत्त्वाला याचे पूरक कार्य आहे. उत्तम अ‍ँटी आॅक्सिडंट आहे. धूम्रपान करणारे, धावपळ, ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींनी हे जीवनसत्त्व घेणे अत्यावश्यक आहे.

आता आपण पुढील जीवनसत्त्व पाहूया ते म्हणजे बी जीवनसत्त्व. या जीवनसत्त्वात अनेक जीवनसत्त्वांचा समावेश होतो. विटॅॅमिन बी १, रिबोफ्लेव्हिन बी २, निअ‍ॅसिन बी ३, पँटोथेनिक अ‍ॅसिड बी ५, पायरिडॉक्सिन बी ६, बायोटीन बी ७, फॉलिक अ‍ॅसिड बी ९, आणि कोबॅलॅमिन बी १२, यालाच बी कॉम्प्लेक्स म्हणतात.

आपल्याकडे पूर्वी विरजण लावण्याची पद्धत होती. शेजारील काकू, मावशी, आजी अशी अनेक नाती या निमित्ताने निर्माण व्हायची. विरजण लावणे म्हणजे दही लावणे आणि अगदी नैसर्गिकरीतीने बर का ! या दह्यात ब १२ तयार होते! ताजे दही, ताक यापासून ब १२ मिळते.

दही भात, दही पोहे, दही बुंदी, दही चकली, अहो दही आणि मस्त लसूणदाण्याची चटणी आणि कडक भाकरी! अहाहा!
चला, मग मस्त दही लावायला आजपासूनच सुरुवात करुयात का! अहो सगळ्या जीवनसत्त्वांनी युक्त असा हा आपला पारंपरिक आहार आहे. आजपर्यंत आपण जीवनसत्त्व अ, ड, इ,के,सी आणि बी पाहिले आणि त्या सर्वांनी युक्त विविधरंगी पारंपरिक आहार पाहिला. चला, तर मग नवीन सुरुवात करूयात आणि आरोग्यासाठी पोषणयुक्त पारंपरिक आहाराचा स्वीकार करूयात !

शरीरातील चयापचय क्रिया, अनेक पेशींची वाढ , ऊर्जा, पचनसंस्था, मेंदूचे कार्य, हॉर्मोन आणि त्यांचे सुरळीत कार्य, पेशीचे संघटन आणि कार्य (स्नायू पेशी), मज्जासंस्था कार्य यासाठी या जीवनसत्त्वाची मदत होते. नैराश्याला प्रतिबंध होतो.
पूर्ण धान्य, बदाम, कारळे, शेंगदाणे, पालक, सर्व हिरव्या भाज्या, अंडी, मासे, ताजी फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यामध्ये बी जीवनसत्त्व असते.

लिंबू वर्ग, संत्रे, मोसंबी, लिंबू, द्राक्षे, कोबी, फ्लॉवर, पालक आणि सर्व फळे आणि भाज्या यात विटामीन सी असते .

(लेखिका आयुर्वेदतज्ज्ञ आहेत)
 

Web Title: Vitamin C for Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.