तरूणांमध्ये वाढली आहे डिप्रेशनची समस्या, 'अशी' असतात लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 10:24 AM2019-03-20T10:24:00+5:302019-03-20T10:24:16+5:30

डिप्रेशन हा असा आजार आहे, जो कुणालाही होऊ शकतो. त्यासाठी काही वयाची अट नाही.

Symptoms of depression in youngsters | तरूणांमध्ये वाढली आहे डिप्रेशनची समस्या, 'अशी' असतात लक्षणे!

तरूणांमध्ये वाढली आहे डिप्रेशनची समस्या, 'अशी' असतात लक्षणे!

Next

डिप्रेशन हा असा आजार आहे, जो कुणालाही होऊ शकतो. त्यासाठी काही वयाची अट नाही. प्रौढांच्या इतकेच लहान मुले आणि किशोरावस्थेतील मुले देखील या आजाराने प्रभावित होऊ शकतात. हा आजार फक्त महिलांनाच होतो असे नाही तर सर्व वयाच्या पुरूषांना देखील तो होऊ शकतो.

नानावटी हॉस्पिटलच्या क्लिनिकल फिजियॉलॉजिस्ट डॉ. नेहा पटेल यांनी सांगितले की, डिप्रेशनची लक्षणे अनेक प्रकारे दिसतात. फक्त अश्रू आणि दुःखी असणे इतक्यापुरते हे मर्यादित नाही. डिप्रेशन हे कुठेतरी पार्श्वभूमीवर दबक्या पावलांनी येत असू शकते आणि अचानक एखाद्या प्रसंगामुळे ते तुमचा ताबा घेऊ शकते. हा प्रसंग इतरांच्या नजरेतून खूप साधा किंवा त्यावर तोडगा काढण्याजोगा असतो पण प्रभावित व्यक्तीवर मात्र त्याचा खूप विपरीत परिणाम होऊन जातो. 

किशोरवयीन मुलांना बर्‍याचदा लक्ष केंद्रित करण्यास त्रास होतो, निराश वाटते, खूप जास्त चिंता सतावते. त्यांना कशानेच उभारी वाटत नाही आणि कित्येकदा ती आपले मित्र आणि कुटुंबियांपासून देखील दुरावतात आणि जादा किंवा अवाजवी अशा अपराधी भावनेने ग्रासतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेणे त्यांना जड जाते. पूर्वी ज्या गोष्टी करणे अगदी सोपे होते, त्याच गोष्टी आता खूप कठीण वाटू लागतात.

पौगंडावस्थेतील डिप्रेशनने पीडित मुले कधी कधी जास्त झोपतात, त्यांच्या आहारच्या सवयी बदलतात, आक्रमक आणि किरकिरी होतात, एरवी त्यांना आवडणार्‍या कामातून त्यांची रुची नाहीशी होते. ही मुले शाळा, कॉलेज बुडवतात, आपल्याच खोलीत एकटी एकटी राहतात तसेच विविध प्रकारच्या नशेच्या आहारी जाऊ शकतात व स्वतःला इजा करून घेऊ शकतात. 

डिप्रेशनचे निदान होण्यासाठी काही निकष पूर्ण व्हावे लागतात व त्यासाठी एखाद्या व्यावसायिकाला भेटणे हे उत्तम. इथे काही लक्षणे दिली आहेत, जी दिसल्यास सावध झाले पाहिजे.

अशी अनेक परिबळे असतात, ज्यामुळे डिप्रेशन येऊ शकते उदा. अगदी लहानपणी चा ट्रॉमा (आघात), आनुवंशिक प्रवृत्ती तसेच शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदल, मेंदूत रासायनिक असंतुलन व इतर आरोग्य समस्यांमुळे बर्‍याचदा डिप्रेशन येऊ शकते. शाळेतील कामगिरी, बरोबरीच्या लोकांबरोबर असलेला सामाजिक दर्जा, नातेसंबंध, कुटुंबातील तंटा, भावनिक किंवा शारीरिक रित्या झालेले दुर्लक्ष, विस्कळीत कुटुंब या सर्व गोष्टी डिप्रेशन येण्यास जबाबदार ठरू शकतात. या परिबळांव्यतिरिक्त, सोशल मीडिया देखील अशा व्यक्तिला स्वतः कुचकामी असल्याची भावना देण्यात मोठी भूमिका बजावू शकतो. उदा. हव्या तेवढ्या लाइक्स वा फॉलोअर्स न मिळणे, सोशल मीडियावर आपले जीवन अगदी योग्य, काटेकोर असल्याचे दाखवण्याचा खटाटोप, एखादा दुवा हातून सुटून जाण्याची भीती आणि आपर्याप्ततेची जाणीव. 

डिप्रेशन ही एक गंभीर मानसिक स्थिती आहे आणि जर त्यावर उपचार केला नाही तर ही परिस्थिती आणखी बिघडू शकते व त्यातून इतर समस्या उद्भवू शकतात. उपचारांसाठी आणि व्यावसायिक मार्गदर्शनासाठी डॉक्टरकडे जाणे महत्त्वाचे आहे. मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचा संकोच वाटून घेऊ नये, तो तुम्हाला वेगळ्या कोनातून गोष्टींकडे बघायला शिकवतो. समाज काय म्हणेल या भीतीने उपचार घेण्याचे टाळू नये. थेरपीमुळे किशोरवयीन मुलांना ते निराश का आहेत हे समजण्यास आणि तणावपूर्ण परिस्थितींचा सामना कसा करायचा हे समजून घेण्यास मदत होते. अनेक प्रकारच्या थेरपी आहेत त्यापैकी कला आधारित थेरपी सारख्या थेरपी त्या पीडित व्यक्तीसाठी खरोखर उपयुक्त सिद्ध होतात.

औषधे घेतल्याने डिप्रेशनची काही लक्षणे दूर होतात. थेरपी सोबत नेहमी काही औषधेही दिली जातात. डिप्रेशनच्या उपचारात मदत करणार्‍या इतरही काही उपयुक्त पद्धती आहेत. सकस आहार घेणे, एखादा मैदानी खेळ नित्यनेमाने खेळणे, एका डायरीत भावावस्थांची नियमित नोंद करून किंवा एखाद्या सपोर्ट ग्रुपमध्ये सामील होऊन देखील मदत मिळू शकते. डिप्रेशनचा सामना करताना ग्रुप थेरपी ही एक प्रभावी पद्धत ठरली आहे.

पालक म्हणून तुम्ही कोणतेही पूर्वग्रह न ठेवता मोकळे मन ठवावे आणि आपल्या किशोरवयीन मुलांना त्यांचे अनुभव व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करावे, त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकावे आणि त्यांना असा विश्वास द्यावा, की ते एकटे नाहीत.

Web Title: Symptoms of depression in youngsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.