केशप्रत्यारोपणाकडे वाढतोय कल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 08:57 PM2018-09-26T20:57:21+5:302018-09-26T21:08:28+5:30

शिल्पा शेट्टीने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली, सलमानने हेअर ट्रान्सप्लांट केलं, म्हणून मीही करुन पाहीन, असं चित्र दिसून येत आहे. यामुळेच केशप्रत्यारोपण क्षेत्रातील उलाढाल गेल्या तीन वर्षात २५-३० टक्कयांनी वाढली आहे.

Moving towards hair transplantation | केशप्रत्यारोपणाकडे वाढतोय कल

केशप्रत्यारोपणाकडे वाढतोय कल

googlenewsNext
ठळक मुद्देकेशप्रत्यारोपण करुन घेण्याचे वय आता ४०-४५ वर्षे वयावरुन २० वर केशप्रत्यारोपण केंद्रांमधून फसवणूक झाल्याच्या घटनाही अनेकदा उघड अपेक्षित खर्च - ५० हजार ते ५ लाख रुपये  रुग्णाच्या शरीरातील इतर भागातील केसांचे डोक्यावर प्रत्यारोपण

प्रज्ञा केळकर-सिंग   
पुणे : केस गळण्याचं प्रमाण वाढलंय....टक्कल पडू लागलंय...केस कमी झाल्यामुळे चारचौघांमध्ये जाण्याची लाज वाटते, अशा एक ना अनेक समस्यांनी सध्याच्या तरुणांना घेरलं आहे. कोणी घरगुती उपाय सांगितले की त्याकडे दुर्लक्ष करुन अडव्हान्स ट्रीटमेंटच बरी, हा आजचा बदललेला दृष्टीकोन! त्यातच बॉलीवूड कलाकारांचा तरुणांवर भारी पगडा, त्यामुळे ट्रान्सप्लांटची जणू फॅशनच आली आहे. शिल्पा शेट्टीने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली, सलमानने हेअर ट्रान्सप्लांट केलं, म्हणून मीही करुन पाहीन, असं चित्र दिसून येत आहे. यामुळेच केशप्रत्यारोपण क्षेत्रातील उलाढाल गेल्या तीन वर्षात २५-३० टक्कयांनी वाढली आहे. केशप्रत्यारोपण करुन घेण्याचे वय आता ४०-४५ वर्षे वयावरुन २० वर आले आहे.   
    सध्याचा जमाना प्रेझेंटेशनचा आहे. या जमान्यात स्वत:ला अपडेट ठेवण्याचा आटापिटा सुरु असताना सौंदर्याची परिमाणेच बदलली आहेत. आपल्याला प्रेझेंटेबल राहता यावे, यासाठी सौंदर्याच्या प्रत्येक कसोटीवर खरे उतरण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.  केशप्रत्यारोपण करुन घेणा-यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ९० टक्के तर स्त्रियांचे प्रमाण १० टक्के आहे. हेअर ट्रान्सप्लांट ही गरज असली तरी सर्वस्व नाही, यादृष्टीने समुपदेशन करण्याची गरजही काळानुसार भासू लागली आहे.   
    निष्णात डॉक्टरकडून केशप्रत्यारोपण करुन न घेता जाहिरातींना बळी पडून केशप्रत्यारोपण केंद्रांमधून फसवणूक झाल्याच्या घटनाही अनेकदा उघड झाल्या आहेत. प्रदूषण, दूषित पाणी, अनुवंशिक समस्या, संप्रेरकांमधील बदल, ताणतणाव, औषधांचे अतिरिक्त सेवन, हिमोग्लोबीनचे प्रमाण अशा विविध कारणांमुळे केस गळण्याचे अथवा टक्कल पडण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. केस गळणे अथवा टक्कल पडल्यामध्ये बरेचदा तरुण नैराश्याने ग्रासले जातात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, कामाचा दर्जा खालावतो. यावर मात करण्यासाठी केशप्रत्यारोपणाचा मार्ग निवडला जातो, अशी माहिती डॉक्टरांनी लोकमतशी बोलताना दिली.   
    डॉ. पुष्कर देशपांडे म्हणाले, यापूर्वी केशप्रत्यारोपणासाठी ४० वर्षे वयानंतर लोक यायचे. आता वयोमर्यादा २०-२२ वर्षे वयापर्यंत खाली आली आहे. वाढते ताणतणाव, प्रदूषण, थायरॉईड अशा विविध कारणांनी टक्कल पडण्याचे अथवा केस गळण्याचे तरुणांमधील प्रमाण वाढले आहे. सध्याचे युग प्रेझेंटेशनचे असल्याने सौंदर्याच्या परिभाषा बदलल्या आहेत. टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो, चेह-याचा आकार बदलतो. काही वेळा चेहरा विद्रूप दिसू लागतो. कमी वयात केस गळाल्याने व्यक्तिमत्वावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे केशप्रत्यारोपण करुन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. केशप्रत्यारोपण करुन घेणा-या ५ पुरुषांमागे १ महिला असे प्रमाण आहे. महिलांमध्ये टक्कल पडण्यापेक्षा केस गळण्याची समस्या जास्त उदभवलेली पहायला मिळते.  इतर प्रत्यारोपणांमध्ये दुस-या व्यक्तीचा अवयव रुग्णामध्ये प्रत्यारोपित करता येतो. केसांमधील डीएनए इतर कोणाशीही जुळत नसल्याने रुग्णाच्या शरीरातील इतर भागातील केसांचे डोक्यावर प्रत्यारोपण केले जाते, अशी माहिती डॉ. आकाश चौधरी यांनी दिली.   
----------------------   
केशप्रत्यारोपण १ ते ५ अशा ग्रेडमध्ये विभागलेले असते. केस गळण्याच्या अथवा टक्कल पडण्याच्या ग्रेडप्रमाणे सिटिंग ठरवले जातात. ज्याप्रमाणे झाडांची मुळे व्यवस्थित असतील तर झाडांची वाढ चांगली होते, त्याचप्रमाणे केसांच्या मुळांमधील स्टेम सेल व्यवस्थित लावले तर टक्कल कमी होऊ शकते. आजकाल गल्लोगल्ली केशप्रत्यारोपण केंद्रांचा सुळसुळाट झाला आहे. अशा ठिकाणी बरेचदा रुग्णांना फसवणुकीचा अनुभव येतो. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच प्रत्यारोपण करुन घेणे केव्हाही चांगले. केश प्रत्यारोपणासाठी प्रत्येक फॉलिकलमागे ३०-५० रुपये खर्च येतो. त्यानुसार ग्राफ ठरवला जातो. - डॉ. पुष्कर देशपांडे, प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ   
---------------   
केशप्रत्यारोपणाचे वय - २० ते ४५ वर्षे  अपेक्षित खर्च - ५० हजार ते ५ लाख रुपये  प्रमाण : पुरुष-९०%, महिला - १० %   वार्षिक व्यवसायात वाढ - २५-३० टक्के   
 -----------------   
सौैंदर्याचे निकष बदलले असले, प्रेझेंटेशनचे युग आले असले तरी सौैंदर्य म्हणजे सर्वस्व नाही. तरुण-तरुणी सौैंदयार्बाबत कमालीचे सजग झाले आहेत. एकमेकांशी स्पर्धा करताना त्याचा अतिरेक होणार नाही, आपली फसवणूक होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. कोणतीही प्लास्टिक सर्जरी करताना निष्णात डॉक्टरांची खात्री करुन घ्यावी.    
- निमिषा सावंत, समुपदेशक  

Web Title: Moving towards hair transplantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.