If you have a continuous habit of drinking coffee ... | ​कॉफी पिण्याची सतत सवय असल्यास सावधान...

सकाळी उठल्या उठल्या कॉफी प्यायल्याशिवाय अनेकांना फ्रेशच वाटत नाही. कॉफी प्यायल्यानंतर शरीराला मिळणारा तजेला काही वेगळाच असतो. ऑफिसमध्ये असताना देखील आरामात चार-पाच कप कॉफीचे प्यायले जातात. तुम्हाला थकवा आला असेल किंवा काम करताना झोप येत असेल तर त्यावर कॉफी हा रामबाण उपाय मानला जातो. पण कॉफीचे सतत सेवन करणे हे शरीरासाठी घातक असते. 
अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये कलाकार सतत कॉफीचे घोट घेत असताना आपल्याला दिसतात. तसेच आपले आवडते कलाकार कॉफीची जाहिरात करतात. त्यामुळे काही जण आपला आवडता कलाकार ज्या ब्रँडची जाहिरात करतो. त्या ब्रँडची कॉफी पितात. काही जण तर कॉफी पिणे हे स्टेटस सिम्बॉल मानतात. सध्या सगळीकडे कॉफी शॉपचे पेव फुटले आहे. कॉफी शॉपमध्ये कितीही तास बसून मजा-मस्ती करता येते. त्यामुळे तरुण तर या कॉफी शॉपला पहिली पसंती देतात. तसेच चित्रपटांमध्ये कॉफी डेटवर जोडपी जाताना दिसतात. त्यामुळे या कॉफी डेटचे फॅड देखील चांगलेच वाढले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, कॉफीचे अतिसेवन केल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कॉफी मध्ये कॅफिन असते. कॅफिनचे अतिसेवन शरीरासाठी अपायकारक असते. अनेक वेळा रात्री अभ्यास करायचा असल्यास अथवा काम करायचे असल्यास कॉफीचे सेवन केले जाते. याचे कारण म्हणजे कॉफी हे निद्रानाश करते. त्यामुळे ज्यांना झोप कमी येत असेल त्यांनी तर कॉफीचे सेवन कधीच करू नये.  
कॉफी जास्त वेळा प्यायली तर तुम्हाला प्रचंड अॅसिडीटी देखील होते. तसेच कॉफीमुळे अनेकवेळा तुम्हाला भूक देखील लागत नाही. कॉफीचे अनेक दुष्परिणान असल्याने या सगळ्या कारणांमुळे कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे.  
कॉफी शरीरास अपायकारक आहे म्हणून ती पिऊच नये असे म्हणणे चुकीचे ठरेल. पण अनेकांना दिवसातून सहा-सात कप कॉफी पिण्याची सवय असते. त्यांनी ती सवय बदलण्याची गरज आहे. दिवसातून एखाद कप कॉफी प्यायली तर काहीही फरक पडत नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास ती गोष्ट शरीराला त्रासच देते ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. 
Web Title: If you have a continuous habit of drinking coffee ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.