हृदयविकाराचा झटका टाळता येण्यासारखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 08:02 PM2019-02-13T20:02:26+5:302019-02-13T20:08:08+5:30

हार्ट अटॅक कुणाला कधी येईल याची काही खात्री नाही असे म्हणताच सामान्य माणूस दचकतो पण हृदयाचा झटका का व कुणाला कधी येतो हे जाणून घेतले तर नक्कीच आपण निरोगी, सुदृढ जीवन जगू शकतो. लहानमुलापासून वयोवृद्धापर्यंत हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदय म्हणजे चार कप्प्यांचे व झडपांचा एक पंप आहे. शुद्ध रक्त जे फुफ्फुसाकडून प्राप्त झालेले आहे ते शरीराच्या सर्व अवयवांना पुरवठा करणे व वापरुन झाल्यावर तेच अशुद्ध (प्राणवायूविरहित) रक्त पुन्हा फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी पाठविणे हेच अतिमोलाचे कार्य हृदय करते. हृदयाची स्पंदने (ठोके) म्हणजेच नाही जी हातापायावर तपासली जाते. प्रत्येक अवयवाला त्याची कार्यपद्धती सुरळीत चालू ठेवण्यासाठी रक्तपुरवठा लागतो. त्याप्रमाणे हृदयालादेखील रक्तपुरवठा लागतो. तो कोरोनरी या रोहिणीद्वारे केला जातो. हृदयाच्या स्नायूंना या ना त्या कारणास्तव रक्तपुरवठा कमी पडला की ते काम करीत नाही. याचा अर्थ असा की ते फेल होते, यालाच हार्ट अटॅक (हृदयाचा झटका) म्हणतात.

Heart attack can be preventable! | हृदयविकाराचा झटका टाळता येण्यासारखा!

हृदयविकाराचा झटका टाळता येण्यासारखा!

googlenewsNext
ठळक मुद्देलहानमुलापासून वयोवृद्धापर्यंत हृदयविकाराचा झटका येऊ शकतोसर्व रोगांपैकी हृदयाच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ३० ते ४०%

हार्ट अटॅक कुणाला कधी येईल याची काही खात्री नाही असे म्हणताच सामान्य माणूस दचकतो पण हृदयाचा झटका का व कुणाला कधी येतो हे जाणून घेतले तर नक्कीच आपण निरोगी, सुदृढ जीवन जगू शकतो. लहानमुलापासून वयोवृद्धापर्यंत हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदय म्हणजे चार कप्प्यांचे व झडपांचा एक पंप आहे. शुद्ध रक्त जे फुफ्फुसाकडून प्राप्त झालेले आहे ते शरीराच्या सर्व अवयवांना पुरवठा करणे व वापरुन झाल्यावर तेच अशुद्ध (प्राणवायूविरहित) रक्त पुन्हा फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी पाठविणे हेच अतिमोलाचे कार्य हृदय करते. हृदयाची स्पंदने (ठोके) म्हणजेच नाही जी हातापायावर तपासली जाते. प्रत्येक अवयवाला त्याची कार्यपद्धती सुरळीत चालू ठेवण्यासाठी रक्तपुरवठा लागतो. त्याप्रमाणे हृदयालादेखील रक्तपुरवठा लागतो. तो कोरोनरी या रोहिणीद्वारे केला जातो. हृदयाच्या स्नायूंना या ना त्या कारणास्तव रक्तपुरवठा कमी पडला की ते काम करीत नाही. याचा अर्थ असा की ते फेल होते, यालाच हार्ट अटॅक (हृदयाचा झटका) म्हणतात.
कोरोनरी रोहिणीत कुठलाही झालेला बिघाड याला कारणीभूत ठरतो. ८० ते ९५% रुग्णात हृदयाचा झटका येण्याचे कारण कोरोनरीत रक्ताची गाठ (थ्रोम्बस) जाऊन बसणे हेच आहे. नियमित रक्तप्रवाहातील अडथळ्याने हृदयाचे स्नायू कमकुवत बनून ‘मायोकार्डीयल इश्चेमियानंतर सडतात, त्याला मायोकार्डियल नेकरोसीस म्हणतात, ज्यामुळे २० ते ४० मिनिटात रुग्णास हृदयात झटका येतो.
छातीत दुखून कळ मारून हृदयाचा झटका येण्यास साधारणपणे सहा तास लागतात. या दरम्यानच्या काळातच अतिहृदयदक्षता विभागात काळजी घेऊन तत्परतेने इलाज केल्याने फायदा होतो. या सहा तासांच्या कालावधीस ‘टाईम विण्डो’ म्हणतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, अति परिश्रम, संवेदनशीलता, थंडी, अन्न जी अन्जायनाच्या अटॅकसाठी कारणीभूत ठरतात. नंतर हृदयविकाराच्या झटक्यात परावर्तीत होतात. सर्वसाधारणपणे हृदयाचा झटका बसल्या बसल्या आराम अवस्थेत येतो. ज्यामुळे रोग्याला झोपेतूनही जाग येते. गंभीर जखमेवाटे रक्त वाहून, शस्त्रक्रियेनंतर अथवा बधिरीकरण औषधांच्या विपरीत परिणामामुळे रुग्ण शॉकमध्ये जातो व घटलेल्या रक्तदाबामुळे हृदयाचा झटका येतो.
हृदयाच्या झटक्याची ओळख ३०% रुग्णांमध्ये छातीत दुखून अन्जायनाचा त्रास हृदयाच्या झटक्यापूर्वी होतो जो ७०% रुग्णात होत नाही. काही रुग्णांना छातीत जोराची कळ आल्यासारखे दुखते तर काहींमध्ये मामुली छातीत दुखून हृदयविकाराचा झटका आल्याचे संकतेही नसते. छातीत मध्यभागी अचानक उठणारी कळ ही विविध प्रमाणात असते जी डाव्या खांद्याकडून डाव्या हाताकडे जाते व कधी कधी ही कळ तोंड (जबडा), पाठ इथपर्यंत जाते व पोटापर्यंतही पसरू शकते. याचवेळी रोग्याला घाम फुटू लागतो. छातीतले दुखणे २० मिनिटे अथवा जास्त वेळ राहून जीभेखाली सॉरबीट्रेटची गोळी ठेवली की पूर्णपणे किंवा थोडेफार कमी होते हीच ओळख विशेष मानली जाते.
छातीत दाबल्यासारखे होते व आम्लपित्त वाढल्यावर जसे ऊर जळल्यासारखे होते त्याप्रमाणे छातीत दुखते. रुग्ण घाबरून चिंतेत मृत्यू ओढवल्याचा अनुभव घेतो. छातीत दुखणे सतत अथवा अधूनमधून उठणे घातक ठरते. अनेकांमध्ये थकल्यामुळे रुग्ण चिडचिड करू लागतो, श्वास थांबल्यासारखे होऊन त्याला हृदयविकाराचा झटका येतो. चक्कर येणे, गळून जाणे, खाली पडणे, मळमळ होऊन वांती होणे ही हृदयविकाराच्या झटक्याची पूर्वसूचनाच समजली जाते. खुद्द हृदयालाच रक्तपुरवठा कमी पडल्याने स्नायूंना आकुंचन व प्रसरण पावण्यासाठी पुरेसा प्राणवायू मिळत नसल्याने वरील पूर्वसूचना मिळते. छातीत अर्ध्या तासापेक्षा जास्त दुखणे अन्जायनामुळे म्हणण्यापेक्षा हृदयविकाराचा झटकाच आहे असे मानणे या शास्त्राचा नियमच झाला आहे.
१५ ते ३०% रुग्णात विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत. ज्यामुळे हृदयाच्या झटक्याचे निदान अवघड होते व ५% रुग्णांना हृदयविकाराचा झटका आल्याचे काहीच कळत नाही. याला सायलेण्ट हार्ट अटॅक (नकळत छुपा हृदयविकाराचा झटका) म्हणतात. अशा प्रकारचा अटॅक मधुमेही वयस्क रुग्णास येतो. कधी कधी पोटात दुखणेही हृदयविकाराचा झटका असू शकतो. जे हृदयरोगतज्ज्ञाला बरोबर समजते. काहींना श्वास लागून धडधड होते. कार्डिओग्राम तात्काळ काढल्यावर हृदयविकाराच्या झटक्याचे निदान नक्की होते. छातीत दुखल्याने रुग्ण घाबरतो. प्रथमत: त्याचा रक्तदाब वाढतो, नाडी जलद होते व शेवटी रक्तदाब कमी होतो अथवा घटतो, ज्यामुळे रोग्याचे हातपाय थंड पडतात.
हृदयाच्या झटक्याचे दुष्परिणाम तात्काळ मृत्यू हा सर्वसाधारण रोग्यांना भेडसावणारा प्रश्न आहे. रोग्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू ओढवणे हा घातपाताचा परिणाम आहे. पहिल्या २४ तासात व त्यातल्या त्यात १२ तासात मृत्यूचे प्रमाण अधिक असते. ७५% मृत्यू हे हृदयाचा झटका आल्याच्या पहिल्या तासातच ओढवतात. सर्व रोगांपैकी हृदयाच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ३० ते ४०% आहे. याचे कारण शॉक, हार्ट फेल व हृदयाच्या स्पंदनात बिघाड आदी आहेत. याचबरोबर रक्ताची गाठ, प्राणवायूची कमी, श्वास घेण्यास अडथळा व औषधांचा वाईट परिणाम आदींमुळेही हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णास मृत्युमुखी पडावे लागते. तात्काळ अतिहृदयदक्षता विभागात काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. आधुनिक प्रगत विज्ञान युगात ‘हार्ट ब्रिगेड’ ची सोय ही सामान्यांच्या जादा उपयोगी पडते.
स्ट्रेप्टोकायनेज अथवा यूरोकायनेज हे ३५०० ते १५,००० रुपयांचे महागडे इंजेक्शन छातीत दुखू लागल्याच्या सहा तासांच्या आत दिल्यावर कोरोनरीतील रक्ताची गाठ विरघळून जाते व रोग्याला तात्काळ आराम पडू लागतो.
हृदयाचा झटका येण्यापूर्वी हृदयाला प्राणवायू कमी पडून होणाऱ्या इश्वेमीठ हार्टडिसीजला वाढू न देण्यासाठी काही प्रतिबंध करणे अतिशय आवश्यक आहे. १) शरीरातील स्निग्ध पदार्थाचे (चरबीचे) प्रमाण मर्यादित असणे आवश्यक आहे. २) सिगारेट किंवा विडी ओढणे पूर्णपणे थांबवले पाहिजे. ३) उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी रक्तदाब पथ्य करून व गोळ्या घेऊन नियंत्रित ठेवावा. ४) शारीरिक व मानसिक ताणतणाव कमी करणे लाभदायक ठरते. ५) परिश्रमाचे काम करणे अथवा नियमित व्यायाम (योगा/मेडिटेशन) करणे केव्हाही फायद्याचे आहे. ६) लठ्ठ व्यक्तींनी लठ्ठपणा कमी करावा. ७) महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने व सिगारेट ओढल्याने रक्तात होणारी गाठ न होण्याची काळजी घ्यावी.
-डॉ. रोहिदास वाघमारे, कार्डिओलॉजिस्ट, जे. जे. रुग्णालय, मुंबई.

Web Title: Heart attack can be preventable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.