कर्करोगाबद्दल असलेले काही समज-गैरसमज!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 04:51 PM2019-01-30T16:51:10+5:302019-01-30T16:57:15+5:30

कर्करोगापासून सावध राहण्यासाठी किंवा त्यावर उपचार सुरू असताना काय खावे, खाऊ नये, काय काळजी घ्यावी याबाबत अनेक मेसेजेस सोशल मीडियावर येतात.

Common Cancer Myths and Misconceptions | कर्करोगाबद्दल असलेले काही समज-गैरसमज!

कर्करोगाबद्दल असलेले काही समज-गैरसमज!

- रश्मी जोशी

कर्करोगापासून सावध राहण्यासाठी किंवा त्यावर उपचार सुरू असताना काय खावे, खाऊ नये, काय काळजी घ्यावी याबाबत अनेक मेसेजेस सोशल मीडियावर येतात. मात्र त्या मेसेजेसना कोणतीही वैज्ञानिक बैठक नसते. कर्करोगाबद्दल असलेले काही समज-गैरसमज जाणून घेऊ.

समाजात कसे वावरावे, मित्र कसे जोडावे, काय खावे- खाऊ नये, चाळीशी - पन्नाशीनंतर निरोगी-निरामय आयुष्यासाठी अनेक युक्त्या असलेले खूप संदेश मोबाइलवर भरभरून येतात. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रे, नियतकालिके, दूरदर्शनवरही अनेक असलेल्या-नसलेल्या समस्यांवर खात्रीलायक इलाजांचा भडीमार मेसेजेस्मधून होत असतो. हल्ली सर्वाधिक चर्चा असलेल्या कर्करोगावर उपाय सांगणारे संदेशही यात असतात. कर्करोगापासून बचावासाठी ताजी फळे खा, पपईची पाने खा, कोरफडीचा रस प्या, फक्त दूध पिऊन राहा असे अनेक उपाय सांगितलेले असतात. यातील बहुतेक गोष्टी या ऐकीव, चुकीच्या व अर्धवट माहितीवर आधारीत असतात. असेच काही कर्करोगाबाबतचे समज-गैरसमज जे शास्त्रीय, वैद्यकीय संशोधनातून खोटे ठरले आहेत, ते जाणून घेऊ या.

1. कर्करोग संसर्गजन्य आहे : कुठलाही कर्करोग संसर्गजन्य नाही. काही कर्करोग हे व्हायरसमुळे होतात. (ह्युमन पॅपीलोमा व्हायरस)मुळे गर्भाशयमुखाचा वा गुदद्वाराचा कॅन्सर होतो. यौन संबंधातून हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे स्थलांतरीत होतो. याचप्रमाणे हेपाटिटीस बी व हेपाटिटीस सी यांची लागण ज्या व्हायरसमुळे होते तोही दूषित रक्त, दूषित सुया व असुरक्षित संभोगामुळे पसरु शकतो. हाच व्हायरस यकृताच्या कर्करोगासही कारणीभूत ठरतो.

2. कुटुंबातील एकाला कर्करोग झाला तर इतर व्यक्तींनाही तो होतोच : हे खरे आहे की कुटुंबात जवळच्या नातेवाईकाला (मुलींच्या बाबतीत आई, आजी, मावशी, आत्या) कर्करोग झाल्यास तो होण्याची शक्यता वाढते. पण तो होणारच हे खरे नाही. गर्भाशयाचा किंवा स्तनाचा कर्करोग अनुवांशिक असू शकतो. तो होण्याआधी नियमित तपासणी, योग्य औषधोपचार वा शस्त्रक्रियेने पूर्णपणे टाळता येतो.

3. कॅन्सरच्या पेशी साखरेवर वाढतात : कॅन्सर झालेल्या रुग्णाला साखर खाणे पूर्णपणे थांबविण्याचा सल्ला दिला जातो. पण साखर खाल्ल्याने कॅन्सर वाढतो व तो भराभर पसरतो हे खोटे आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. शरीरामधील सर्वच पेशींना म्हणजे सर्वसाधारण पेशी व कर्करोगाच्या पेशींना वाढीसाठी, विभाजनासाठी, कार्यासाठी साखरेपासून मिळणाऱ्या उर्जेची गरज असते. कर्करुग्णांनी अचानक साखर खाणे बंद केले तर त्याला उर्जा कमी मिळून अशक्तपणा जाणवू शकतो. अर्थात अती साखर खाल्ल्याने माणसाचे वजन वाढून, लठ्ठपणा, मधुमेहसारखे आजार होऊन त्यातून अनेक व्याधी व कर्करोग होण्याची शक्यता नक्कीच वाढते.

4. कर्करोगाचे उपचार आजारापेक्षा भयंकर : कर्करोगावरचे उपचार म्हणजे मुख्यत्वे किमोथेरपी व रेडीएशन. रुग्णाला अनेकदा याचे वेगवेगळे दुष्परिणाम भोगावे लागतात. हे उपचार कर्करोगाच्या पेशींबरोबर शरीरातील सामान्य पेशींवरही परिणाम करतात. आता वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे हे उपाय बरेच सुसह्यझाले आहेत. तोंडाची चव जाणे, उलट्या होणे, जेवणाची इच्छा न होणे यासारखे परिणाम कमी करतात येतात. रेडिएशन ही फक्त गाठ आलेल्या जागी केंद्रीत करून त्याच्या पासून होणारा अपाय रोखता येतो. कॅन्सरच्या उपचारांबरोबरच जर त्याचे दुष्परिणाम कमी करणारे औषधोपचार केले तर दोन्हीचा मिळून चांगला परिणाम होतो.

5. कर्करोग बरे करणारे औषध बाजारात येऊ देत नाहीत : या समजात काहीच तथ्य नाही. सर्व कॅन्सर पूर्णपणे बरे होऊ शकतील असे एक हमखास औषध आजपर्यंत तरी उपलब्ध नाही. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. व्यक्तीनुसार औषधं ठरतात. कॅन्सर होऊच नये, त्याचे लवकर निदान व्हावे व त्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी औषधशास्त्रातील व वैद्यकीय क्षेत्रातील असंख्य तज्ज्ञ अक्षरश: झटत आहेत.

6. प्रत्येक उपचार प्रत्येक रुग्णाला आवश्यक : हा एक गैरसमज आहे. प्रत्येक रुग्णाला प्रत्येक प्रकारच्या तपासणीची जसे रक्त तपासणी, स्कॅनिंग, एमआरआयची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे प्रत्येकाला शस्त्रक्रिया, रेडिएशन व किमोथेरपीची गरज नसते. प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीप्रमाणे, त्याला झालेल्या कर्करोगाच्या प्रकाराप्रमाणे उपाययोजना ठरविली जाते. अर्थातच तज्ज्ञ डॉक्टर ठरवतात. रुग्णाच्या अथवा त्याच्या नातेवाईकाच्या मनात काही शंका असल्यास त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करावी. वाटल्यास दुसऱ्या तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा. रुग्णाची प्रकृती, वय व आर्थिक क्षमता लक्षात घेऊन इलाज कसे व कुठे करायचे हे प्रत्येकाने ठरवावे.

7. कर्करोगाकडे दुर्लक्ष करावे : हे अजिबात योग्य नाही. स्तनातील गाठ, तोंडातील बरी न होणारी जखम, घटणारे वजन, सततचा खोकला असे कुठलेही लक्षण आढळल्यास आपल्या डॉक्टरांना सांगून, त्यांच्याशी बोलून, समजून घेऊन तपासणी करून घ्यावी. लवकर निदान व योग्य उपचारच आपले प्राण वाचवू शकतात.

8. सकारात्मक विचारसरणीने कॅन्सर बरा होऊ शकतो : कॅन्सरचा इलाज सुरु असताना सकारात्मक विचार ठेवले तर रुग्णाचे जीवन नक्कीच सुधारू शकते. पण फक्त सकारात्मक राहून कॅन्सर बरा होऊ शकत नाही. योग्य उपचार घेणे गरजेचे असतात. असे अनेक प्रश्न, समज, गैरसमज रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या मनात असतात.

(लेखिका आधाररेखा प्रतिष्ठानच्या विश्वस्त आहेत.)

Web Title: Common Cancer Myths and Misconceptions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.