सावधान!!! एकाच तेलात वारंवार खाद्यपदार्थ तळाल, तर कॅन्सरजवळ जाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 02:04 PM2023-11-01T14:04:39+5:302023-11-01T14:05:07+5:30

सणासुदीचा आनंद लुटा; पण आरोग्याशी समझोता करू नका

Be careful!!! If you repeatedly fry food in the same oil, you will approach cancer! | सावधान!!! एकाच तेलात वारंवार खाद्यपदार्थ तळाल, तर कॅन्सरजवळ जाल!

सावधान!!! एकाच तेलात वारंवार खाद्यपदार्थ तळाल, तर कॅन्सरजवळ जाल!

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दिवाळी जवळ आली की गोडधोड तसेच चमचमीत पदार्थ बनविण्याची लगबग सुरू होते. त्यामध्ये तळून केलेल्या चकल्या, करंज्या, शंकरपाळ्या यांचाही समावेश असतोच. मात्र, बऱ्याचदा एकदा तळायला वापरलेले तेल हे वारंवार वेगवेगळे पदार्थ तळण्यासाठी वापरले जातात; पण हे माहीत आहे का की, ही सवय तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना कॅन्सरसारख्या दुर्धर विकाराच्या जवळ घेऊन जाऊ शकते. स्वतः आरोग्यतज्ज्ञांकडून ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. तेव्हा सणासुदीचा आनंद नक्की लुटा; पण आरोग्याशी समझोता करू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

स्वयंपाकाचे तेल पुन्हा-पुन्हा गरम केल्याने त्याची रचना बदलते आणि त्यात एक्रोलिन नामक एक विषारी, तसेच कर्करोगजन्य रसायन तयार होते. एकाच तेलात वारंवार तळलेले पदार्थ खाल्ल्यास उच्च रक्तदाब, एथेरोस्क्लेरोसिस, अल्झायमर, यकृत रोग यांसारख्या आजारांची भीती असते.

एकदा तेल वापरलं की, त्याचा नंतर खाण्यात वापर करा; मात्र ते वारंवार गरम करू नका कारण यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात ट्रान्स फॅट तयार होतात. त्याच्या सेवनाने तुमचा कोलेस्ट्रॉल वाढतो; तसेच कॅन्सर होण्याचीही भीती असते. तेव्हा एकदा वापरलेले तेल शक्यतो वापरूच नका. घरामध्ये प्रॅक्टिकली असे करता येत नाही तेव्हा निदान त्या तेलाचा पुन्हा-पुन्हा तळण्यासाठी तरी वापर करू नका. सोबतच बाहेरचे खाणे टाळा कारण तिथे एकच तेल किती वेळा वापरले असेल याबाबत आपल्याला काही कल्पना नसते. हे सगळं करणं जरी जीवावर येतं असलं तरी ते जीवावर नक्कीच बेतणार नाही. 
- डॉ. निती देसाई, डाएटिशियन

वेगवेगळे तेल, साधेल आरोग्याचा मेळ

  • आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुम्ही मिश्रित तेलाचा वापर करू शकता. 
  • जसे की तांदळाचा कोंडा (राइस ब्रान) तेल आणि सोया. 
  • पूर्व भारतामध्ये वेगवेगळ्या भाज्या, डाळी तसेच अन्नपदार्थ तयार करण्यासाठी कधी मोहरी, कधी शेंगदाणा, कधी करडई, कधी सूर्यफूल, तर कधी खोबऱ्याचे तेल वापरले जायचे. 
  • आपणही असेच करू शकतो; पण प्रत्येकवेळी आहारामध्ये वेगवेगळ्या तेलांचा वापर करा, असेही डॉ. देसाई सांगतात.


तळलेल्या तेलाचे बनते बायोडिझेल ...

भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने RUCO (रिपर्पज युज्ड कुकिंग ऑइल) लॉन्च केले आहे. या उपक्रमात वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलाचे संकलन करत त्याचे बायोडिझेलमध्ये रूपांतर केले जाते. त्यानुसार रुकोचे तळलेल्या तेलाबाबत गाईडलाइन्स:

  • तळण्यासाठी वनस्पती तेलाचा वापर करा.
  • तेलात पदार्थ तळताना त्याचे तापमान कमी ठेवा त्यातून धूर येईपर्यंत ते गरम करू नका.
  • तळलेल्या तेलात पदार्थाचे छोटे छोटे तुकडे पडून ते करपत राहतात. त्यामुळे ते वेळोवेळी गाळा.
  • तळण्यासाठी स्टेनलेस स्टील किंवा फ्रायरचा वापर करा.
  • तळण्यासाठी वापरलेले तेल शक्यतो दोन दिवसातच संपवा.

Web Title: Be careful!!! If you repeatedly fry food in the same oil, you will approach cancer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.