Progress can be made if every person is healthy | प्रत्येक व्यक्ती निरोगी राहिल्यास प्रगती शक्य
प्रत्येक व्यक्ती निरोगी राहिल्यास प्रगती शक्य

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : रावणवाडी आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा असून यासाठी आरोग्य सेवेची पायाभूत यंत्रणा मजबूत करणे गरजेचे आहे. देश व समाजासाठी प्रत्येकच व्यक्तीचे जीवन समान व महत्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्ती निरोगी राहिल्यास देश, क्षेत्र व त्या परिवाराची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम रावणवाडी येथे ५ कोटींच्या निधीतून मंजूर प्राथमिक आरोग्य केद्र इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी शुक्रवारी (दि.८) ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, आमच्या प्रयत्नाने गोंदिया तालुका हेल्थ वेलनेस योजनेत आला आहे. त्यातच आता ग्राम सिवनी, लोहारा, तुमखेडा खुर्द, फुलचूरपेठ, बाजारटोला, पिंडकेपार, घिवारी, चांदनीटोला, खळबंदा, मोगर्रा येथे नवीन उपकेंद्र मंजूर करविले असून लवकरच त्यांची सुरूवात होणार असल्याचे सांगीतले.
याप्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती रमेश अंबुले यांनी, रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाचा व्याप जास्त होता व कार्यक्षेत्र सुमारे ३०-३५ गावांचे होते. आमदार अग्रवाल यांनी ग्राम खमारी येथे वेगळे आरोग्य केंद्र मंजूर करवून दिल्याने रावणवाडी केंद्रावरील कामाचा व्याप कमी झाला. गोंदिया तालुक्यात आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने प्रत्येकच क्षेत्रात क्रांतीकारी कार्य होत असल्याचे मत व्यक्त केले.
प्रास्ताविकातून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी, रावणवाडी येथील आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली होती व त्यामुळे रूग्णांना असुविधा होत होती. मात्र आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने नवीन इमारत मंजूर झाली असून येत्या १ वर्षात बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, गेंदलाल शरणागत, विजय लोणारे, खुशबू टेंभरे, रजनी गौतम, प्रकाश डहाट, प्रमिला करचाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वी.एम.चौरागडे, गमचंद तुरकर, टेकचंद सिंहारे, अंकेश हरिणखेडे, जे.सी.तुरकर, सुर्यप्रकाश भगत, नरेंद्र चिखलोंडे, ईश्वर पटले, किशोर वासनिक, चिंतामन चौधरी, वाय.पी.रहांगडाले, अनिल नागपुरे, लक्ष्मण तावाडे, केशव तावाडे, सूरज खोटेले, संतोष घरसेले यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.

५०० रूग्णांची आरोग्य तपासणी
५ कोटी रूपयांच्या निधीतून मंजूर करण्यात आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे निमित्त साधून नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील ५०० हून अधीक रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.


Web Title: Progress can be made if every person is healthy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.