प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:52 AM2019-02-09T11:52:36+5:302019-02-09T11:53:02+5:30

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जाणार आहे. मात्र याचा लाभ केवळ एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Prime Minister Kisan Sanman Nidhi Yojana; Benefits of single person in family | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार लाभ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार लाभ

Next
ठळक मुद्देमहाऑनलाईनवर डॉटा होणार अपलोड

अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने १ फेब्रुवारी घेतला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जाणार आहे. मात्र याचा लाभ केवळ एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या याद्या तयार करताना याच आधारावर त्या करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता व त्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारने अर्थसंकल्पात निवडणुकीच्या तोंडावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जाणार आहे. ही रक्कम तीन टप्प्यात जमा केली जाणार असून याचा पहिला २ हजार रुपयांचा हप्ता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जमा केला जाणार आहे. त्यानंतर दुसरा हप्ता एप्रिल व तिसरा हप्ता जून महिन्यात दिला जाणार आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असून मार्च महिन्यात केव्हाही आचार संहिता जाहीर होवू शकते. त्यामुळे त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता जमा व्हावा, यासाठी सरकारची धावपळ सुरू आहे. यासाठीच त्यांनी महसूल, कृषी आणि सहकार विभागाची यंत्रणा कामाला लावली आहे. पुढील पंधरा दिवस सर्व कामे बाजुला ठेवून २ हेक्टरपर्यंत खातेदार शेतकऱ्यांच्या याद्या तयार करुन त्याची गावपातळीवर छाननी करण्याचे निर्देश दिले आहे. याद्या तयार झाल्यावर त्यांचे १० ते १५ फेब्रुवारीपर्यंत गाव पातळीवर वाचन सुध्दा केले जाणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारीपर्यंत या याद्या थेट शासनाच्या महाऑनलाईन या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. सर्व डॉटा अपलोड झाल्यानंतर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा केला जाणार आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळावा, यासाठी याद्या तयार करताना कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि त्यांचे अठरा वर्षाखालील मुले असे गृहीत धरण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे शेतीचे वेगवेगळे सातबारा असले तरी एकाच कुटुंबात राहत असल्याने वरील सुत्राप्रमाणेच त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

छत्तीसगड,मध्यप्रदेशच्या पूर्वी मदत देण्याचा प्रयत्न
मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या योजनेचा लाभ मिळण्यास दोन तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार जमा करुन त्याचा निवडणुकीत लाभ मिळवून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे शासकीय यंत्रणेला या कामासाठी युध्द पातळीवर कामाला लावण्यात आले आहे.

१ फेब्रुवारी २०१९ नंतरच्यांना लाभ नाही
केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा १ फेब्रुवारी २०१९ ला केली. त्यामुळे यानंतर २ हेक्टरपर्यंतचे सातबारा तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्या शेतकऱ्यांकडे २ हेक्टर शेती आहे त्यांनाच या योजनेचा लाभ देण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहे.

रविवारी सुरू राहणार कामे
केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केवळ निवडणुकीत लाभ मिळवून घेण्यासाठीच केल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. त्यामुळेच रविवारी सुटी असली तरी या दिवशी याद्या तयार करण्याचे काम सुरू राहणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Prime Minister Kisan Sanman Nidhi Yojana; Benefits of single person in family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार