पालिकेकडे फक्त एकच ‘फॉगिंग मशीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:26 PM2018-09-30T22:26:39+5:302018-09-30T22:27:09+5:30

शहरात स्वाईन फ्लु, स्क्रब टायफस व डेंग्यूचा प्रकोप वाढत असतानाच यावर रोकथाम करण्यासाठी नगर परिषदेकडे आवश्यक त्या सुविधांचा अभाव आहे. आजघडीला नगर परिषदेकडे शहरात फवारणी करण्यासाठी किटकनाशक नाही.

Only one 'fogging machine' | पालिकेकडे फक्त एकच ‘फॉगिंग मशीन’

पालिकेकडे फक्त एकच ‘फॉगिंग मशीन’

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात आजारांचा उद्रेक : आता खरेदी करणार कीटकनाशक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरात स्वाईन फ्लु, स्क्रब टायफस व डेंग्यूचा प्रकोप वाढत असतानाच यावर रोकथाम करण्यासाठी नगर परिषदेकडे आवश्यक त्या सुविधांचा अभाव आहे. आजघडीला नगर परिषदेकडे शहरात फवारणी करण्यासाठी किटकनाशक नाही. तर फॉगिंग करण्यासाठी फक्त एकच मशीन असल्याची माहिती आहे. यावरून नगर परिषद शहरवासीयांच्या आरोग्याप्रती किती सजग आहे याची प्रचिती येते.
दोन दिवसांपूर्वी शहरातील एका व्यक्तीचा स्क्रब टायफसने मृत्यू झाला असून डेंग्यूचेही रूग्ण आढळून येत आहेत. शिवाय स्वाईन फ्लुसह स्क्रब
टायफस व डेंग्यूच्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे शहरवासीयांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी शहराची सफाई व किटकनाशक फवारणी करण्याची गरज आहे. हिवताप विभागाकडून ग्रामीण भागात फवारणी करून आजारांची रोकथाम केली जाते. मात्र नगर परिषदेला शहरवासीयांच्या आरोग्याशी काहीच घेणे देणे नसल्याचे दिसते.
कारण, आजघडीला नगर परिषदेकडे शहरात फवारणीसाठी किटकनाशक नसल्याची धक्कादायक माहिती आहे. नगर परिषद आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ तारखेलाच बीटीआय द्रव्य संपले. त्यामुळे आता आजारांचा उद्रेक वाढत असताना शहरात फवारणी करण्यासाठी नगर परिषदेकडे किटकनाशक नाही. प्राप्त माहितीनुसार, हिवताप विभागाकडून नगर परिषद स्वच्छता विभागाने हे द्रव्य आणले होते. यातून नगर परिषद आरोग्य विभाग व नगर परिषद प्रशासन किती तत्परतेने कार्य करीत आहे हे दिसून येते.
एवढेच काय, शहरात फॉगिंग करण्यासाठी नगर परिषदेकडे एकच मशीन आहे. अशात शहरातील २१ प्रभागांत फॉगिंग करण्यातही नगर परिषद हतबल आहे. यावर हिवताप विभागाकडून तीन मशीन मागणार असल्याचे आरोग्य निरीक्षकांनी सांगीतले. एकंदर नगर परिषद आरोग्य विभागाचा कारभार हिवताप विभागाच्या भरवशावरच चालतो, हेच येथे म्हणावे लागणार आहे. हे सर्व घडत असताना मात्र नगर परिषदेत सर्वच आपापल्या धुंदीत असल्याचे बघावयास मिळते. २२
सोमवारपासून फॉगिंग व फवारणी
शहरातील स्थिती बघता सोमवारपासून (दि.१) शहरात फॉगिंग व फवारणी केली जाणार असल्याचे आरोग्य निरीक्षकांनी सांगीतले. यासाठी हिवताप विभागाकडून तीन फॉगिंग मशीन मागणार. तर सोमवारीच किटकनाशक खरेदी करणार असेही त्यांनी सांगीतले. विशेष म्हणजे, किटकनाशक खरेदीही थेट केली जाणार असल्याचे यातून दिसून येते. एकंदर नियमांची एैशीतैशी करून नगर परिषदेत अधिकारी व कर्मचारी आपला मनमर्जी कारभार चालवित असल्याचेही म्हणणे वावगे ठरणार नाही.

Web Title: Only one 'fogging machine'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य