उधारीवरच धावली ‘लालपरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:13 PM2019-04-15T22:13:57+5:302019-04-15T22:14:26+5:30

भंडारा- गोंदिया लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्र कर्मचारी तसेच मतदान साहित्यांची ने-आण करण्यासाठी गोंदिया आगारातील ५२ बसेसचा पुरवठा करण्यात आला होता. यासाठी आगाराने प्रत्येकी बस २२ हजार रूपयांची मागणी निवडणूक विभागाकडे केली होती. मात्र आगाराला एक रूपयाही देण्यात आला नाही. परिणामी, उधारीवरच गोंदिया आगारातील ‘लालपरी’ धावल्याची माहिती आहे.

'Lalpary' runs on borrowing | उधारीवरच धावली ‘लालपरी’

उधारीवरच धावली ‘लालपरी’

googlenewsNext
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : गोंदिया आगारातील ५२ बसेसचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा- गोंदिया लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्र कर्मचारी तसेच मतदान साहित्यांची ने-आण करण्यासाठी गोंदिया आगारातील ५२ बसेसचा पुरवठा करण्यात आला होता. यासाठी आगाराने प्रत्येकी बस २२ हजार रूपयांची मागणी निवडणूक विभागाकडे केली होती. मात्र आगाराला एक रूपयाही देण्यात आला नाही. परिणामी, उधारीवरच गोंदिया आगारातील ‘लालपरी’ धावल्याची माहिती आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणुक गुरूवारी (दि.११) पार पडली. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवरून ही निवडणूक घेतली गेली. निवडणुकीसाठी मतदान कर्मचारी व मतदान साहित्य केंद्रस्थळी सोडणे तसेच मतदान प्रक्रीया आटोपल्यावर कर्मचारी व मतदान साहित्य स्ट्रॉँगरूम मध्ये सोडण्यासाठी निवडणूक विभागाकडून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस घेतल्या जातात. त्यानुसार, यंदाही महामंडळाच्या बसेस बूक करण्यात आल्या होत्या.
जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया, तिरोडा व साकोली आगारातून बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. यात, गोंदिया आगारातून ५२ बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. यातील २९ बसेस आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघात तर २३ बसेस गोंदिया विधानसभा मतदारसंघात देण्यात आल्या होत्या. १० तारखेला मतदान कर्मचारी व मतदान साहित्य संबंधीत विधानसभा मतदान संघात सोडणे तसेच ११ तारखेला मतदान प्रक्रिया आटोपल्यावर कर्मचारी व मतदान साहित्य स्ट्रॉंगरूम मध्ये सोडण्याची बसेसची जबाबदारी होती.
विशेष म्हणजे, गोंदिया आगाराने निवडणुकीसाठी दिलेल्या ५२ बसेसपोटी प्रत्येकी २२ हजार रूपये प्रमाणे पैशांची मागणी निवडणूक विभागाकडे केली होती. मात्र आगाराला बसेससाठी पैसे देण्यात आले नाही. परिणामी, आगाराच्या बसेस उधारीवरच धावल्या व आपली सेवा दिली. राज्य परिवहन महामंडळ अगोदरच तोट्यात असताना आता निवडणुकीसाठी देण्यात आलेल्या बसेसचे पैसे अडकून पडल्याने आगाराची डोकेदुखी वाढली आहे.
२०१५ व २०१७ मधील पैसे अद्याप थकीत
राज्य परिवहन महामंडळाकडून निवडणूक कामासाठी बसेस भाड्याने दिल्या जातात. असे असतानाच सन २०१५ मधील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत तसेच सन २०१७ मधील ग्रामपंचायत निवडणुकीतील भाड्याची रक्कम मात्र आता पर्यंत थकून असल्याची माहिती आहे. महामंडळाचे आठ लाख ७४ हजार १२८ रूपये अशाप्रकारे थकून असल्याची माहिती असून वारंवार पत्रव्यवहार व मागणी करूनही महामंडळाला अद्याप रक्कम मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यात आता लोकसभा निवडणुकीचे पैसेही अडकले आहेत.

Web Title: 'Lalpary' runs on borrowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.