सिंचन प्रकल्पांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 09:38 PM2018-02-03T21:38:48+5:302018-02-03T21:39:35+5:30

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलावानी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या अधिक बिकट होण्याचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांना आत्तापासूनच जनावरांच्या चाºयासह पाण्याची समस्या भेडसावित आहे.

 The irrigation projects reached by the ground | सिंचन प्रकल्पांनी गाठला तळ

सिंचन प्रकल्पांनी गाठला तळ

Next
ठळक मुद्देप्रकल्पांमध्ये केवळ १६ टक्के पाणीसाठा : पाणी टंचाईचे संकट गडद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलावानी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या अधिक बिकट होण्याचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांना आत्तापासूनच जनावरांच्या चाºयासह पाण्याची समस्या भेडसावित आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. परिणामी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईची ओरड होत आहे. ३ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ६९ तलाव व जलाशयात केवळ १६.३५ टक्के पाणीसाठा होता. मागील दोन वर्षांतील याच कालावधीतील पाणीसाठ्यावर नजर टाकल्यास यंदा सर्वात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. ६९ तलावांपैकी २९ तलावांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. तर ११ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. यावरुन यंदा पाण्याची समस्या किती गंभीर असणार याचा अंदाज लावला जात आहे. अद्यापही तीव्र उन्हाळ्याला सुरूवात व्हायची आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात अजून घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागात आत्तापासून पाणी टंचाईची ओरड होत आहे. मात्र यावर उपाय योजना करण्यासंदर्भात प्रशासनाने अद्यापही कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे प्रशासन पाणी टंचाईच्या समस्येवर किती गंभीर आहे हे दिसून येते. ज्या प्रकल्पांमध्ये १० टक्के सुध्दा पाणी नाही, त्यात चोरखमारा, खैरबंदा, कलपाथरी, भदभद्या, डोंगरगाव, गुमडोह, कालीमाटी, पिपरीया, पांगडी, रिसाला, सेरेपार, ओवारा, भानपूर, बोपाबोडी, चिरचाडी, फुलचूर, चिरचाडबांध, गिरोला, कोसबीबकी, ककोडी, काटी, कोकणा, खाडीपार, माहुली, मालीजुंगा, मेंढा, नांदलपार, पळसगाव, सौंदड, तेढा आदी प्रकल्पांचा समावेश आहे.
मध्यम प्रकल्पात ११ टक्के पाणी
जिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये ११.७९ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४६.२२ पाणीसाठा होता. मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत होत असते. मात्र यंदा प्रकल्पांनी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने सर्वांचीच चिंता वाढविली आहे.
लघु प्रकल्पात २० टक्के पाणीसाठा
जिल्ह्यात २२ लघु प्रकल्प असून यामध्ये केवळ २०.९९ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५८.७३ टक्के पाणीसाठा होता. तर ३८ मामा तलावांमध्ये २०.९० टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४७.६५ टक्के पाणीसाठा होता.

Web Title:  The irrigation projects reached by the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.